वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, भारत आणि युरोपमधल्या शेतकरी, एमएसएमई, नवोन्मेषक, स्टार्ट अप्स आणि व्यवसायांसाठी अमाप संधी खुल्या करणारा : वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक ताकदीला बळकटी देणारा असल्याचे सांगत, बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी अँटवर्प-ब्रुज बंदर भारत-युरोपमधला महत्त्वाचा दुवा असल्याचे केले अधोरेखित
भारत आणि बेल्जियम, रत्ने आणि आभूषणे, सेमीकंडक्टर्स, हरित हायड्रोजन,संरक्षण, प्रगत वस्तुनिर्माण आणि कृषी व अन्न प्रक्रिया या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत करू शकतात : पीयूष गोयल
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, जागतिक जीडीपीच्या एक चतुर्थांश आणि जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 2 अब्ज लोकांच्या बाजारपेठेला एकत्र आणणारा-पीयूष गोयल
गेल्या दशकात भारत-युरोपीय महासंघ यांच्यातला व्यापार दुप्पट होऊन जवळपास 140 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर, अँटवर्प-ब्रुज बंदर भारतीय निर्यातीसाठी युरोपमध्ये प्रवेशद्वार म्हणून बजावू शकते भूमिका
Posted On:
04 SEP 2026 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, भारत आणि युरोपमधल्या शेतकरी,मत्स्यपालक, एमएसएमई, लघुद्योग, नवोन्मेषक, स्टार्ट अप्स, महिला उद्योजक,निर्मिती क्षेत्र आणि सेवा पुरवठादारांसाठी अमाप संधी खुल्या करणारा असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराबाबत मुंबईत आयोजित भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवादाला ते संबोधित करत होते. यावेळी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करत या कराराबाबत अत्यंत कौशल्याने वाटाघाटी करण्यात आल्या असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी पूर्णत्वाला आलेला भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, 25 वर्षांपासून प्रक्रियेत होता, असे गोयल यांनी सांगितले. हा करार 2 अब्ज लोकांना एकत्र आणणारा असून जागतिक जीडीपीच्या एक चतुर्थांश, जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश आणि 24 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या बाजारपेठेचे प्रतिनिधीत्व करतो. युरोपीय महासंघातले सर्व 27 देश या कराराच्या बाजूने आहेत आणि आवश्यक औपचारिक बाबी पूर्ण करून हा करार लवकरात लवकर अंमलात आणण्यास उत्सुक आहेत, असे त्यांनी सांगितले. युरोपच्या संदर्भात अशा प्रकारचा एकमताचा पाठिंबा दुर्मिळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे, भारतातील सर्वच घटकांनी भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराला मनापासून पाठिंबा दिला आहे.
यावेळी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार व्यापाराला बळकटी देईल आणि कंपन्या, युवा प्रतिभा आणि गुंतवणुकीसाठी संधी खुल्या करेल. तसेच दोन्ही अर्थव्यवस्थांची आव्हानात्मक स्थितीत टिकाव धरण्याची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे बळकट करेल, असे त्यांनी सांगितले. अँटवर्प-ब्रुज बंदर भारत-यूरोपमधला महत्त्वाचा लॉजिस्टिक दुवा असल्याचे अधोरेखित करत हा करार हिरे, अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण, सागरी सेवा, हरित हायड्रोजन आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले. भारत आणि युरोपीय वस्तूंच्या 95 टक्क्यांहून अधिक निर्यातीवरील टॅरिफ रद्द होईल अथवा कमी होईल, असे त्यांनी नमूद केले.
भारत आणि बेल्जियम यांच्या अर्थव्यवस्था पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये एकमेकांना पूरक असल्याने त्यांच्यात आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मोठी संधी असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. भारत आणि बेल्जियमला प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांसह रत्ने आणि दागिने या क्षेत्रांत सहकार्याचा एक नवीन पैलू म्हणून 'सह-निर्मिती' आणि डिझाइनच्या शक्यता पडताळून पाहता येऊ शकतील असेही ते म्हणाले. तसेच, अँटवर्प, मुंबई आणि सुरत या प्रमुख हिरे उद्योगाच्या केंद्रांना केंद्रस्थानी ठेवून, तंत्रज्ञान आणि परस्पर मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणन प्रक्रियेत आणखी सहकार्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सेमीकंडक्टर क्षेत्रात 'डिझाइन-टू-फॅब्रिकेशन' (डिझाइनपासून उत्पादनापर्यंत) परिसंस्था निर्माण करण्यासाठी बेल्जियमच्या जागतिक दर्जाच्या मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स संशोधनाला भारताचा मोठा आवाका, कौशल्ये आणि प्रतिभा यांची जोड देता येईल, असे गोयल म्हणाले. अँटवर्प-ब्रूज येथील बंकरिंग आणि हरित जहाज वाहतूक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारताचे 'ग्रीन हायड्रोजन मिशन' युरोपला ऊर्जा पुरवू शकेल, असे नमूद करत त्यांनी या क्षेत्रात अधिक दृढ सहकार्याचे आवाहन केले.
गोयल यांनी जॉन कॉकरिलबरोबर झालेल्या सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचा संदर्भ देत संरक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्याची मोठी क्षमता असल्याचे सांगितले. यामध्ये ड्रोनरोधक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, दारुगोळ्याचा नेमका साठा आणि भारताने डिझाइन केलेल्या ब्रह्मोस आणि पिनाका क्षेपणास्त्रांसाठी पाश्चात्य निर्यात मार्गिकांचा समावेश आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील औद्योगिक संबंध पूर्वी कधी नव्हते इतके दृढ झाले असल्याचे ते म्हणाले. जॉन कॉकरिल भारताच्या बोफोर्स तोफांसाठी दारुगोळा तयार करते, हे देखील त्यांनी नमूद केले. नवीन परिस्थितीनुसार युरोपमधील वाढलेला खर्च आणि भारताचे स्वतःचे सुरक्षा वातावरण पाहता, एकत्र काम करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे ते म्हणाले.
गोयल यांनी कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संधीही अधोरेखित केल्या; यामध्ये बटाट्यावर प्रक्रियेपासून ते शीत साखळी आणि अन्न प्रक्रियेच्या इतर क्षेत्रांचा समावेश आहे. तंत्रज्ञान आणि शाश्वत कृषी-मूल्य साखळ्यांच्या माध्यमातून बेल्जियम आणि भारत संपूर्ण जगाला सेवा देऊ शकतील असेही ते म्हणाले.
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारातून (एफटीए) निर्माण झालेल्या संधींचे बेल्जियम हे प्रवेशद्वार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. अँटवर्प-ब्रूज बंदर हे युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सागरी बंदर असून या कराराचे फायदे प्रत्यक्षपणे युरोपमध्ये पोहोचवण्यासाठी किंवा तिथून भारतात पाठवण्यासाठी हे बंदर एक प्रवेशद्वार ठरेल, असे त्यांनी नमूद केले. बेल्जियमची जागतिक दर्जाची अंतर्गत जलवाहतूक (बार्ज), रेल्वेमार्ग आणि रस्त्यांचे जाळे; तसेच ब्रूजची सागरी संपर्क सुविधा, खोल पाण्याचे बंदर, 'रोल-ऑन/रोल-ऑफ' (रो-रो) आणि वाहन वाहतुकीशी संबंधित क्षमता यांचा सुरळीत मेळ घातल्यामुळे, हे बंदर भारतीय निर्यातदारांना युरोपमधील मध्यवर्ती औद्योगिक आणि ग्राहक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचा अद्वितीय मार्ग उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दशकभरात युरोपियन युनियनसोबतचा भारताचा व्यापार दुप्पट होऊन तो जवळपास 140 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला असल्याचे गोयल यांनी सांगितले. संरक्षणवाद, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, अन्न व इंधन पुरवठ्यातील समस्या, दोन युद्धे, अस्थिरता, अनिश्चितता आणि मोठी आव्हाने या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या अशांततेत वाहून जाणे किंवा विश्वास आणि निश्चिततेची बेटे निर्माण करणे हे दोनच पर्याय भारत आणि बेल्जियमसमोर होते, असे ते म्हणाले.
गोयल यांनी भारताच्या विस्तारत असलेल्या आर्थिक आणि तांत्रिक क्षमतांवर प्रकाश टाकताना सांगितले की, भारताच्या विकासगाथेची आता सुरुवात झाली आहे. क्रयशक्ती समानतेच्या (पीपीपी) आधारावर भारताची अर्थव्यवस्था आज 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची आहे आणि पीपीपी आधारावर 20 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या जीडीपी सह भारतीय अर्थव्यवस्था आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असे त्यांनी नमूद केले की. 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा 1.4 अब्ज भारतीयांचे घोषित ध्येय आणि सामूहिक संकल्प भारताची 4 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचा आहे, असेही ते म्हणाले.
या उद्दीष्टासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून भारतात सामूहिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यात सामाजिक उन्नयन, पायाभूत सुविधांची निर्मिती, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि जागतिक कंपन्यांसाठी भारताला आकर्षक ठिकाण बनवणे यांचा समावेश आहे. जागतिक कंपन्यांनी भारतात येऊन काम करावे, संशोधन आणि विकास करावा, संयुक्तपणे रचना करावी, सहनिर्मिती करावी आणि संयुक्तपणे उत्पादन करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि त्याचे भागीदार केवळ युरोप आणि भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी बाजारपेठ म्हणून एकत्रितपणे काम करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
गोयल यांनी सेमीकंडक्टर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर प्रकाश टाकला. सेमीकॉन इंडियाची पहिली आवृत्ती जगभरातील गुंतवणूकदारांच्या सहभागातून यशस्वी झाली होती, तर दुसरी आवृत्ती, सेमीकॉन इंडिया 2.0, नुकतीच 14 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण मोहीमेमुळे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात सुमारे 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता मिशन सुरू झाले असून ते स्टार्टअप्सना सेवा देत आहे, तसेच देश आपल्या महत्त्वपूर्ण खनिजे मिशन क्षेत्रातही सक्रिय आहे, असे त्यांनी सांगितले. भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम शांती कायद्याच्या माध्यमातून 60 वर्षांनंतर प्रथमच खाजगी क्षेत्रासाठी खुला झाला आहे, असेही ते म्हणाले. पुढील 20 वर्षात 100 गिगा वॅट अणुऊर्जा निर्मिती क्षमता उभारण्याचे नियोजन असून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून ही क्षमता बेसलोड म्हणून वापरली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताचे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्र, जे सध्या 8.5 अब्ज डॉलर्सवर आहे, ते पुढील आठ वर्षांत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले. या वाढीत प्रामुख्याने नवीन खाजगी उपक्रम, स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि अद्वितीय उपाय विकसित करणाऱ्या डिझायनर्सचा मोठा हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे जिथे एका खाजगी कंपनीने अंतराळात रॉकेट प्रक्षेपित केले आहे, तसेच पहिल्याच प्रयत्नात खाजगी क्षेत्राच्या उपक्रमाला यश मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे, असे गोयल यांनी सांगितले.
त्यांनी भारताच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संशोधन आणि विकास निधीचा देखील उल्लेख केला. युरोपच्या संदर्भात 12 अब्ज डॉलर्सची रक्कम कदाचित कमी वाटू शकते, परंतु भारताची ' क्रयशक्ती समानता' लक्षात घेता, सरकारी योगदान, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आणि भारताच्या शैक्षणिक क्षेत्राची क्षमता, याच्या एकत्रित बळावर, युरोपमधील कामगिरीच्या तोडीस तोड आणि जागतिक दर्जाचे असे 150 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याचे नावीन्यपूर्ण योगदान अत्यंत कमी खर्चात प्राप्त करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
गोयल यांनी बेल्जियम आणि युरोपियन युनियनला भारताबरोबर भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी नमूद केले की भारताचा प्रचंड विस्तार, इथली कौशल्यसंपन्नता, तरुणांमधील ऊर्जा, युवा लोकसंख्या आणि निर्णायक नेतृत्व यामुळे बेल्जियमचे तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि भांडवल याला भारतात उत्तम वाव मिळेल.
केंद्रीय मंत्री म्हणाले की महाराष्ट्र हे व्यवसायासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असलेले ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्य, भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी, औद्योगिक राजधानी आणि देशातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले.
गोयल यांनी पंतप्रधान ' डी वेव्हर' आणि बेल्जियमच्या कंपन्यांना, आधुनिक उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांच्या आधारे, मोकळ्या मनाने आणि खुल्या हृदयाने भारताबरोबर भागीदारी करण्याचे आवाहन केले. भारतीय समुदाय, विद्यार्थी आणि संशोधक या सर्व संधींच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेल्जियमला कुशल मनुष्यबळ आणि तरुणांची कमतरता भासत आहे, अशा क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची गतिशीलता वाढवणे, पात्रतेला परस्पर मान्यता, संयुक्त कौशल्य विकास आणि दुहेरी पदवी शिक्षण कार्यक्रम यासारखे उपक्रम वाढवण्याचे आवाहन केले.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि बेल्जियम यांच्यात अत्यंत आपुलकीचे व दृढ संबंध राहिले आहेत, असे गोयल यावेळी म्हणाले. स्वतंत्र भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या सुरुवातीच्या युरोपीय देशांपैकी बेल्जियम एक होता, हे अधोरेखित करत या उपक्रमाबद्दल भारत बेल्जियमच्या जनतेचा सदैव ऋणी राहील, असे त्यांनी सांगितले.
बेल्जियम-भारत आणि युरोपीय युनियन-भारत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान वेव्हर यांचे नेतृत्व, दिलेला पाठिंबा आणि केलेल्या सततच्या प्रयत्नांबद्दल गोयल यांनी त्यांचे आभार मानले; ज्या मुळे 25 वर्षांचा हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमात उल्लेख केलेल्या आपल्या अलीकडच्या बेल्जियम दौऱ्याचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, तिथल्या उद्योगांमध्ये खऱ्या अर्थाने एक नवी ऊर्जा जाणवली. बेल्जियमचे तंत्रज्ञान, नाविन्यता आणि भांडवल यांची भारताची गुणवत्ता, व्यापकता, तरुणाईची ऊर्जा, तरुण लोकसंख्या व निर्णायक नेतृत्व याच्याशी सांगड घालून भारत आणि बेल्जियम एकत्रितपणे अजेय स्पर्धात्मक ताकद निर्माण करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिऱ्याच्या निर्मितीचे रूपक वापरून गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. जमिनीच्या खाली अत्यंत प्रचंड दाबाखाली जसा नैसर्गिक हिरा तयार होतो, किंवा कार्बनच्या संचयनावर आधारित सातत्यपूर्ण प्रक्रियेतून प्रयोगशाळेत तयार होणारा हिरा घडतो; त्याचप्रमाणे सध्या ताण आणि अशांततेचा सामना करत असलेल्या जगात भारत व बेल्जियम मिळून हिऱ्यासारखेच चिरंतन, सुंदर आणि मौल्यवान काहीतरी घडवू शकतात, गोयल म्हणाले.
"भारत आणि बेल्जियमने मिळून हिऱ्याइतकेच टिकाऊ, सुंदर आणि अमूल्य असे काहीतरी निर्माण करू या. हा हिरा केवळ बेल्जियम आणि भारतासाठी, केवळ युरोपसाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी एक अनमोल हिरा ठरेल.", असे ते म्हणाले.
* * *
माधुरी पांगे/निलिमा चितळे/सोनाली काकडे/मंजिरी गानू/श्रद्धा मुखेडकर/राजश्री आगाशे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306829)
अभ्यागत कक्ष : 14