भूविज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 9 पदके जिंकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला सत्कार
विजेत्या विद्यार्थी प्रतिनिधीमंडळाशी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. सिंह यांनी नवी दिल्लीतल्या पृथ्वी भवन येथे संवाद साधत त्यांना दिले प्रोत्साहन
इटलीतल्या तुरिन येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकत या स्पर्धेच्या इतिहासातली आतापर्यंतची आपली सर्वाधिक पदकांची कमाई नोंदवली
Posted On:
04 SEP 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीतील लोधी रोड येथील पृथ्वी भवन येथे आयोजित एका विशेष सत्कार आणि प्रोत्साहन कार्यक्रमात, 19 व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड (आयईएसओ) 2026 मधील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार केला. डॉ. सिंह यांनी या मुलांशी संवादही साधला.
या मुलांनी मिळवलेले यश अनन्यसाधारण असल्याचे सांगत डॉ. जितेंद्र सिंह यांनी या युवा विजेत्यांबद्दल अतीव अभिमान व्यक्त केला आणि जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल त्यांचे, तसेच त्यांच्या पालकांचे आणि त्यांच्या शाळांचे अभिनंदन केले. डॉ. सिंह यांनी यावेळी मंत्रालयाचा दृष्टिकोन विषद केला. विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांद्वारे युवांचे सक्षमीकरण करणे, मूलभूत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आणि तरुण मनांना पृथ्वी प्रणाली विज्ञानविषयक अभ्यास करण्यास प्रोत्साहित करणे, यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
'टीम इंडिया स्कूल चिल्ड्रेन' मधील भारतीय विद्यार्थी प्रतिनिधींनी 19 व्या आयईएसओमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. इटलीतल्या तुरिन येथे 20 ते 27 ऑगस्ट 2026, या कालावधीत आंतरराष्ट्रीय भू-विज्ञान संस्थेच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेत 39 देशांमधले स्पर्धक होते. भारतीय विद्यार्थ्यांनी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा, इंटरनॅशनल टीम फील्ड इन्व्हेस्टिगेशन' आणि 'अर्थ सायन्स प्रोजेक्ट' या श्रेणींमध्ये एकूण नऊ पदकांची कमाई करत ऐतिहासिक यश मिळवले. यामध्ये 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे.
या प्रतिष्ठित ऑलिम्पियाडमधील सहभागापूर्वी सहभागींना कठीण राष्ट्रीय निवड प्रक्रियेतून जावे लागते आणि प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आंतरराष्ट्रीय विजयापर्यंतचा हा प्रवास पद्धतशीर राष्ट्रीय पाठबळ दर्शवतो.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या जनसंपर्क आणि जनजागृती कार्यक्रमांतर्गत 'अर्थ सायन्स ऑलिम्पियाड' (Earth Science Olympiad) आणि 'आयईएसओ' (IESO) सारख्या प्रमुख उपक्रमांच्या माध्यमातून, तसेच 'डीप ओशन मिशन', 'मिशन मौसम' आणि 'पृथ्वी' (PRITHVI) यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमांच्या जोडीने, पृथ्वी विज्ञान मंत्रालय नागरिकांमध्ये विज्ञानाविषयीची सखोल जागरूकता निर्माण करण्याचे आणि भू-शास्त्रज्ञ व संशोधकांच्या पुढील पिढीला प्रेरित करण्याचे कार्य अविरतपणे करत आहे.


* * *
माधुरी पांगे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306816)
अभ्यागत कक्ष : 7