ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत स्वयं-सहाय्यता गट-बँक लिंकेज आणि वैयक्तिक उद्योगासाठी अर्थसहाय्याचा घेण्यात आला आढावा
महिला उद्योजकांसाठी जलद, पुरेसा आणि सुलभ कर्जाचा ठोस आराखडा- शिवराज सिंह
विकसित भारताच्या निर्मितीत महिला सक्षमीकरण ही प्राथमिक गरज- शिवराज सिंह चौहान
3 कोटींवरून 6 कोटी लखपती दीदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार- शिवराज सिंह
5 वर्षांत स्वयं सहाय्यता गटांना 10 लाख कोटी रुपये, दीदींना वैयक्तिक 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज- शिवराज सिंह
दर 3 महिन्यांनी व्हर्च्युअल, दर 6 महिन्यांनी प्रत्यक्ष आढावा: वचनबद्धतेची कालबद्ध पद्धतीने देखरेख- शिवराज सिंह चौहान
जिथे गरिबी जास्त, तिथे कर्ज जास्त: दीदींना हेल्पलाइनद्वारे मिळेल मदत- शिवराज सिंह
बँक स्तरावर प्रशिक्षण आणि संवेदनशीलता: खासगी बँकर्सना जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकांना उपस्थिती अनिवार्य करावी लागेल- शिवराज सिंह
'आत्मवत् सर्वभूतेषु' ची भावना: सर्वांनी भावनिकरीत्या एकत्र येऊन भगिनींचे आयुष्य बदलावे- केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
कोणतेही लक्ष्य अशक्य नाही, संकल्प करा आणि तो पूर्ण करा; बँकर्सच्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
03 SEP 2026 8:07PM by PIB Mumbai
मुंबई/नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत 'दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन' (DAY-NRLM) अंतर्गत स्वयं सहाय्यता गट -बँक लिंकेज आणि वैयक्तिक उद्योगासाठी अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. या वेळी महिला उद्योजकांसाठी जलद, पुरेसा आणि सुलभ कर्जाचा ठोस आराखडा तयार करण्यात आला, तसेच हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देशही शिवराज सिंह यांनी दिले. या बैठकीत एसएचजी दीदी, बँकर्स, राज्य ग्रामीण आजीविका मिशन (SRLM) अधिकारी, भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) आणि इतर भागधारकांनी एकत्र येऊन कर्ज प्रक्रियेतील अडथळे, प्रादेशिक विषमता आणि त्यावरील उपायांवर सविस्तर चर्चा केली.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वयं सहाय्यता गटांच्या दीदींसाठी बँक कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठीचा एक ठोस आराखडा तयार करण्यात आला. या बैठकीत संबंधित आकडेवारीचा आढावा घेण्यासोबतच, कर्ज मंजुरीतील विलंब, दस्तऐवजांची किचकट प्रक्रिया, कर्जाची छोटी मर्यादा आणि बँक शाखांच्या पातळीवरील अडचणी अशा प्रत्यक्षातील समस्यांवरही चर्चा झाली.

या बैठकीला केंद्रीय ग्राम विकास आणि दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, ग्राम विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, महाराष्ट्राचे ग्राम विकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय ग्राम विकास विभागाचे सचिव रोहित कंसल, संयुक्त सचिव अमित कुमार शुक्ला आणि स्वाती शर्मा यांच्यासह ग्राम विकास विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यासोबतच वित्तीय सेवा विभाग, नीती आयोग, भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय कृषी आणि ग्राम विकास बँक (NABARD) तसेच निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (PFRDA) प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.
विकसित भारत आणि महिला सक्षमीकरण
या बैठकीला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबोधित केले. विकसित भारताच्या उभारणीसाठी महिला सक्षमीकरण ही प्राथमिक गरज असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. त्यादृष्टीनेच आजची बैठक ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, त्या दिशेने पुढे जाण्याचा एक गांभीर्याने केलेला प्रयत्न होता असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशासमोर मांडलेल्या संकल्पाचा दाखला त्यांनी दिला. देशात आतापर्यंत 3 कोटी लखपती दीदी बनल्या आहेत, आणि आता पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पानुसार ही संख्या 6 कोटींपर्यंत घेऊन जायची असल्याचे त्यांनी सांगितले. लखपती दीदी म्हणजे देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला पूर्ण न्याय देणे असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील दारिद्र्य पूर्णपणे दूर झाल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकार 6 कोटी लखपती दीदी घडवण्यासाठी वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे आणि आपले कर्तव्य हीच आपली ओळख बनवावी असे आवाहन त्यांनी केले. आपण जे काम करत आहोत, तो केवळ एक व्यवसाय किंवा उपजिविकेचे साधन नसल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. आपले अधिकारी मित्र तसेच बँकांशी जोडलेले सहकारी या सगळ्यांचीच देशसेवा आणि जनतेची सेवा करण्याप्रती एकसमान वचनबद्धता आहे, आणि हीच वचनबद्धता पुर्णत्वाला नेण्यासाठी आपण सगळे काम करत आहोत असे त्यांनी सांगितले.

हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण भावनिकरित्या जोडले जायला हवे, असे आवाहन त्यांनी सर्व संबंधित घटकांना केले. आपल्या भगिनींचे जीवन बदलणे हे केवळ कर्तव्यपूर्तीपुरते मर्यादित राहू नये तर हा बदल घडवून आणण्यासाठी मनापासूनचा दृढ निश्चय, जिद्द आणि उत्साह असणे आवश्यक आहे. जर आपण शक्य तितके सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने आपली कार्यक्षमता सुधारण्याचे मार्ग शोधले, तर आपण आपले उद्दिष्ट निःसंशयपणे अधिक वेगाने साध्य करू शकू.
3 कोटींचा टप्पा गाठणे तुलनेने सोपे होते, कारण अशा अनेक महिला होत्या ज्यांचे उत्पन्न आधीच 60,000, 70,000, 80,000 रुपयांच्या श्रेणीत होते; मात्र, आता 6 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 40,000 उत्पन्न असलेल्या दीदी, 30,000, उत्पन्न असलेल्या दीदी तसेच 50,000 रुपये उत्पन्न असलेल्या दीदींना 'लखपती' दर्जापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे; असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी नमूद केले. आपण जे साध्य केले आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी बँकर्सचे कौतुक करताना सांगितले. जवळपास प्रत्येक बँकेने यावर्षी आपल्या उद्दिष्टांच्या दीडपट, काहींनी तर दुप्पट कामगिरी केली आहे; याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, पण भविष्यातही आपल्याला पूर्ण उत्साहाने काम करत राहिले पाहिजे.

वचनबद्धतेचे नियोजनपूर्ण परीक्षण
शिवराज सिंह चौहान यांनी निर्देश दिले की, आजच्या बैठकीत नाबार्ड असो, भारतीय रिझर्व बॅंक असो, अन्य बँका असोत अथवा एसआरएलएम यांच्याकडून मिळालेली असोत, जी आश्वासने देण्यात आली आहेत, ती पूर्ण निष्ठेने आणि प्रयत्नांनी पूर्ण केली पाहिजेत. निश्चित केलेल्या कालमर्यादेत ही उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. कारण आता यासंबंधीचा तपशील एका टिपणीमध्ये नोंदवला गेला आहे आणि आपण यापुढे दर तीन महिन्यांनी एकदा आभासी पद्धतीने बैठक घेऊ. तसेच सहा महिन्यांत आपण प्रत्यक्षही भेटू; कारण भेटीगाठींचे सातत्य राखले गेल्यास, आपण निश्चितपणे नियोजित कालमर्यादेचे पालन करू शकू.
बँक स्तरावर प्रशिक्षण, संवेदनशीलता
केंद्रीय मंत्री चौहान यांनी नमूद केले की, आपण पाहतोय की दीदींना बँकिंग स्तरावर सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, त्या टप्प्यावर प्रशिक्षण आणि संवेदनशीलता वाढवण्यावर आपण प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत. एसआरएलएमच्या नियमित बैठका घेतल्या गेल्या पाहिजेत आणि बँकांनी त्यात गांभीर्याने सहभाग घेतला पाहिजे. विशेषतः खाजगी बँकांचे प्रतिनिधी अनेकदा बैठकांना, डी एल सी सी मध्ये अनुपस्थित राहतात अशा तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. त्यांनीही ही जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

आर्थिक दुर्बल घटक जास्त असलेल्या भागांवर विशेष लक्ष
शिवराज सिंह म्हणाले की आपले लक्ष अधिक गरिबी, आर्थिक दुर्बल घटक जास्त असलेल्या भागांवर असले पाहिजे. अनेकदा, आधीच समृद्ध असलेल्या भागांमध्ये जास्त पैसा जातो आणि बँकांच्या शाखा अधिक वेगाने कर्ज देतात. पण जिथे सर्वात गरज आहे, "चला, तिथे दिवे उजळू जिथे अजूनही अंधार आहे." म्हणून आपले लक्ष निश्चितपणे त्या भागांवर असले पाहिजे.
'आत्मवत् सर्वभूतेषु'ची भावना: भावनिकरीत्या जोडून ध्येय साध्य करा
मंत्री चौहान म्हणाले की हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण भावनिकरीत्या जोडले गेलो पाहिजे. भारतीय संस्कृतीत आपण असे मानतो की 'आत्मवत् सर्वभूतेषु' - आपण सर्व एकाच चेतनेचा भाग आहोत. मग कोणी दुःखी का व्हावे? त्यांचे दुःख आपले दुःख का होऊ नये? 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजेच जगाचे कल्याण आणि 'सर्व भवन्तु सुखिनः' सर्व सुखी होवोत—ही आपल्या संस्कृतीची मूळ मूल्ये आहेत. जर आपण ही भावना आत्मसात करून हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या कामात खरा आनंद मिळेल. चांगल्या कामाबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. पण आता हे मोठे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने आपण एक आराखडा, एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे आणि त्या कालमर्यादेत ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कोणतेही ध्येय अशक्य नाही
केंद्रीय मंत्री चौहान यांनी भोपाळचे हिंदी गझलकार दुष्यंत कुमार यांच्या ओळी उद्धृत करत म्हटले, "आकाशाला छिद्र पाडता येत नाही असे कोण म्हणतो? मित्रांनो, पूर्ण ताकदीने दगड तर फेकून पाहा." कोणतेही ध्येय अशक्य नाही. आपण प्रयत्न केल्यास मानव विश्वावरही सत्ता गाजवू शकतो. आणि म्हणूनच आपल्यासारखे रक्तामांसाचे लोकच महान गोष्टी साध्य करतात. म्हणून आपण दिलेली वचने पूर्ण करण्याचा संकल्प करूया. आपण ठरवलेली उद्दिष्ट्ये आणि लक्ष्ये साध्य करूया आणि पंतप्रधानांनी केलेले संकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून दाखवूया.
3.5 कोटी लखपती दीदी, उद्दिष्ट 6 कोटी
DAY-NRLM अंतर्गत आतापर्यंत 10 कोटींहून अधिक ग्रामीण महिला 92–93 लाख बचत गटांमध्ये संघटित झाल्या आहेत. बँकांनी बचत गटांना आतापर्यंत एकूण 13.67 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत सुमारे 3.5 कोटी महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, हे 6 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. येत्या 5 वर्षांत बचत गटांना 10 लाख कोटी रुपये तर दीदींना वैयक्तिकरित्या कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी 1 लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे., असेही त्यांनी सांगितले.

वित्तीय समावेशन 2.0 चा कृती आराखडा
या बैठकीतील चर्चांचा समावेश ‘वित्तीय समावेशन 2.0’ या दृष्टिकोनाच्या आगामी कृती आराखड्यात केला जाणार आहे. बचत गटांना वेळेवर आणि पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणे, महिला उद्योजकांसाठी समर्पित वित्तपुरवठा तसेच ग्रामीण भारतात उच्चस्तरीय वित्तीय सेवांची उपलब्धता वाढवणे यावर या आराखड्याचा मुख्य भर असेल. दीदींना बँकेकडून कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी हेल्पलाइन, प्रक्रियेत सुधारणा आणि बँकर्ससोबत सातत्यपूर्ण समन्वयाच्या माध्यमातून प्रत्येक अडथळा दूर केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले. “दीदींना बँकेकडून कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” असेही ते म्हणाले. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण विकास, वित्तीय समावेशन आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/तुषार पवार/संदेश नाईक/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306527)
अभ्यागत कक्ष : 14