ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026–27 चे 17 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आयोजन
Posted On:
03 SEP 2026 5:00PM by PIB Mumbai
मुंबई, 3 सप्टेंबर 2026
भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा निर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडने 'एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026–27 चे आयोजन केले असून या प्रश्नमंजुषेच्या मुंबई प्रादेशिक फेरीत सहभागी होण्यासाठी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. ही स्पर्धा युवा विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कुतूहल, विश्लेषणात्मक विचार आणि निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला एक राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे.
मुंबई प्रादेशिक फेरी 17 सप्टेंबर 2026 रोजी भारत रत्नम – मेगा सीएफसी, गेट क्र. 4 आणि 5, 6 वा मजला, सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400096 येथे आयोजित केली जाईल.
"व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या जगतातील काहीही आणि सर्वकाही" (Anything and Everything from the World of Business and Management) ही या वर्षीच्या प्रश्नमंजुषेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही स्पर्धा व्यावसायिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सहभागींच्या ज्ञानाची परीक्षा घेईल. प्रत्येक संघात दोन विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
प्रादेशिक फेरीची सुरुवात एका लेखी फेरीने होईल, त्यानंतर पहिल्या सहा सर्वोत्तम संघांसाठी ऑन-स्टेज मल्टीमीडिया प्रादेशिक महाअंतिम फेरी (फिनाले) आयोजित केली जाईल. मुंबई प्रादेशिक फेरीतील पहिले दोन संघ राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरतील.
प्रादेशिक फेरीत विजेत्या ठरणाऱ्या संघाला 60,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे 40,000 रुपये आणि 20,000 रुपये दिले जातील. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या संघांना प्रत्येकी 8,000 रुपये मिळतील. प्रश्नमंजुषेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेक्षक बक्षिसे देखील दिली जातील.
राष्ट्रीय स्तरावर, विजेत्या संघाला 1,00,000 रुपये मिळतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे 60,000 रुपये आणि 40,000 रुपये दिले जातील. पात्र ठरलेल्या इतर संघांना उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जातील.
स्पर्धेसाठी कोणतीही नोंदणी किंवा सहभाग शुल्क नाही आणि संस्था अनेक संघांचे नामनिर्देशन करू शकतात. विद्यार्थी निश्चित केलेल्या नोंदणी लिंकद्वारे किंवा electronquiz2025@ntpc.co.in वर आपले तपशील पाठवून नोंदणी करू शकतात. नोंदणीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे.
विद्यार्थी समुदायाशी संवाद साधण्यासाठी आणि युवा मनांना त्यांचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना वाढविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एनटीपीसी 2004 पासून इलेक्ट्रॉन क्विझचे आयोजन करत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306410)
अभ्यागत कक्ष : 8