लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि सेशेल्स यांच्यात अनेक शतके जुने सांस्कृतिक संबंधांशी निगडित अतूट नाते आहे: लोकसभा अध्यक्ष


लोकसभा अध्यक्षांची सेशेल्सच्या संसदीय शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय बैठक

Posted On: 02 SEP 2026 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2026

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसद भवन परिसरात सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षा माननीय अझारेल योलान्डा अर्नेस्टा आणि सेशेल्सच्या प्रतिष्ठित संसदीय शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय संसदीय चर्चा केली.

माननीय अझारेल अर्नेस्टा यांचे स्वागत करताना, बिर्ला यांनी सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्ष  म्हणून त्यांच्या ऐतिहासिक निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे झालेल्या 'राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या  28 व्या परिषदेदरम्यान  अर्नेस्टा यांच्याशी झालेल्या भेटीचे स्मरण करत बिर्ला यांनी भारताच्या आध्यात्मिक परंपरांबद्दल, विशेषतः योगबद्दल असलेल्या त्यांच्या रुचीचे कौतुक केले. तसेच, त्यांच्या कालीमाता भक्तीचाही त्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला.

भारत आणि सेशेल्स यांच्यातील गहिऱ्या आणि चिरस्थायी मैत्रीबद्दल बोलताना  बिर्ला यांनी सेशेल्सला त्यांच्या स्वातंत्र्याचा 50  वा वर्धापनदिन आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की, भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंध हे केवळ राजनैतिक चौकटीपुरते मर्यादित नसून, ते अनेक शतके जुने  सांस्कृतिक व सभ्यताविषयक बंध आहेत जे  तेथील उत्साही भारतीय समुदाय आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील स्नेहपूर्ण  संबंधांमुळे अधिक समृद्ध झाले आहेत.

बिर्ला यांनी नमूद केले की, दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि परंपरांमुळे हे घनिष्ठ संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यांनी विशेषतः सेशेल्समध्ये भारताच्या आध्यात्मिक परंपरांबद्दल, आणि त्यातही विशेषतः 'योग'बद्दल असलेली गहिरी आणि वाढती रुची अधोरेखित केली. अर्नेस्टा यांची योगाबद्दलची वैयक्तिक आवड लक्षात घेऊन, त्यांनी भारतीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून सेशेल्समध्ये योगाचा प्रसार अधिक वाढवण्यासाठी भारताकडून सहकार्य देण्याची तयारी दर्शवली.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील सेशेल्स भेटीचा संदर्भ देत, बिर्ला यांनी पंतप्रधान मोदी आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष महामहिम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यातील घनिष्ठ आणि सौहार्दपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीच्या  विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले, याचा त्यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला.

बिर्ला यांनी नमूद केले की, पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक भाषणामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातील बहुआयामी संबंधांना नवी ऊर्जा आणि नवी गती मिळाली असून, यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक प्रगाढ आणि मजबूत झाली आहे.  संसदीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, बिर्ला यांनी दोन्ही देशांच्या विधिमंडळांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याचे आणि लोकशाही व लोकशाही संस्थांच्या सामायिक वारशाच्या आधारे सहकार्य  अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.

अर्नेस्टा यांच्या भारताशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधाचे स्मरण करत  बिर्ला यांनी नमूद केले की, त्यांनी 'संसदीय अध्ययन आणि प्रशिक्षण ब्यूरो' (BPST) - जे आता 'PRIDE' म्हणून ओळखले जाते - त्याद्वारे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला होता. भारताशी असलेल्या त्यांच्या या दीर्घकालीन संबंधांनी दोन्ही संसदांमधील चिरस्थायी बंध अधिक दृढ करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे बिर्ला म्हणाले. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांना भारताच्या संसदेला भेट देण्याचे निमंत्रण देताना बिर्ला म्हणाले की अशा देवाणघेवाणीमुळे भारताची समृद्ध आणि चैतन्यमय लोकशाही परंपरा जवळून अनुभवण्याची संधी मिळेल. त्यांनी संसदीय क्षमता बळकट करण्यात 'पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसीज' (PRIDE) च्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि माहिती दिली की सेशेल्समधील सदस्य आणि अधिकाऱ्यांसाठी कायदेविषयक मसुदा, संसदीय कार्यपद्धती आणि इतर कायदेविषयक प्रक्रियांवर विशेष कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.

संसदीय कामकाजातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी भूमिकेबद्दल बोलताना बिर्ला यांनी माहिती दिली की भारतीय संसदेने कागदविरहित संसदेची संकल्पना स्वीकारली आहे आणि संसदीय कामकाजाचे 22 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर केला जात आहे. त्यांनी पुढे डिजिटल संसदेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानातील भारताच्या मोठ्या गुंतवणुकीवर आणि देशभरातील विधिमंडळांना एका समान डिजिटल व्यासपीठावर आणण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी आरोग्य, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधा आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत-सेशेल्स सहकार्याच्या प्रचंड शक्यतांवर भर दिला. बिर्ला यांनी 'प्राइड'च्या माध्यमातून संसदीय क्षमता बांधणीमधील भारताचा समृद्ध अनुभव सामायिक करण्याची तयारी दर्शवली आणि असा प्रस्ताव मांडला की सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि अधिकारी 'प्राइड'च्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतील.

बिर्ला यांनी संस्कृती, शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारत-सेशेल्स यांच्यातील व्यक्ती -व्यक्ती संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी 'ग्लोबल साउथ'चा आवाज आणि आकांक्षा अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र काम करण्याच्या संधीवरही जोर दिला. सेशेल्स हा हिंद महासागर प्रदेशातील भारताचा एक विश्वासू आणि मौल्यवान भागीदार असल्याचे वर्णन करून बिर्ला यांनी 'व्हिजन महासागर'च्या संदर्भात त्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचांच्या माध्यमातून प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अधिक घनिष्ट सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.

या प्रसंगी बोलताना अझारेल अर्नेस्टा यांनी त्यांना आणि संसदीय शिष्टमंडळाला दिलेल्या हार्दिक आदरातिथ्याबद्दल बिर्ला यांचे आभार मानले. सीएसपीओसी दरम्यान भारतीय संसदेला दिलेल्या आपल्या पूर्वीच्या भेटीची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, “भारत माझ्या हृदयात आहे.” भारताला “लोकशाहीची जननी” असे संबोधून अर्नेस्टा यांनी भारतासोबतच्या आपल्या दीर्घकालीन संबंधांच्या प्रेमळ आठवणींना उजाळा दिला. त्यांनी नमूद केले की सेशेल्समध्ये सर्वात आधी स्थायिक झालेल्यांमध्ये भारतीयांचा समावेश होता आणि भारतीय संस्कृती या द्वीपराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत खोलवर रुजलेली आहे.

भारत आणि सेशेल्स केवळ एकच महासागर नव्हे, तर एक सामायिक इतिहास आणि चिरस्थायी नातेसंबंधही सामायिक करतात, असे नमूद करून अर्नेस्टा यांनी संसदेच्या डिजिटलायझेशनमध्ये भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल आणि तिच्या कामकाजातील तंत्रज्ञानाच्या व्यापक वापराविषयी कौतुक व्यक्त केले.

याप्रसंगी खासदार डॉ. डी. पुरंदेश्वरी; खासदार अपराजिता सारंगी; आणि खासदार हिमाद्री सिंग यादेखील उपस्थित होत्या.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306149) अभ्यागत कक्ष : 4