संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील 16 संरक्षण उपक्रमांच्या वार्षिक कामगिरीचा घेतला आढावा; विक्रमी उत्पादनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे केले कौतुक

Posted On: 01 SEP 2026 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 1 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे  सार्वजनिक क्षेत्रातील 16 संरक्षण उपक्रमांच्या  वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीदरम्यान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हेही उपस्थित होते. संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आणि संबंधित उपक्रमांचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक यांनी संरक्षण मंत्र्यांना, त्यांच्या कामगिरीची, प्रमुख यशांची आणि भविष्यातील कार्ययोजनेची माहिती दिली. संरक्षण मंत्र्यांनी स्वदेशी उत्पादन आणि निर्मिती क्षमता वाढवणे, प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास, संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत वाढ, पुरवठा साखळी बळकट करणे आणि प्रमुख प्रकल्पांची अंमलबजावणी या क्षेत्रांत या उपक्रमांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

   

आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था बळकट करण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने तसेच एक मजबूत संरक्षण औद्योगिक पाया उभारण्यासाठी या उपक्रमांनी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, सर्व 16 उपक्रम विविध क्षेत्रांत आपली कामगिरी सिद्ध करत आहेत. त्यांनी या संस्थांनी दिलेले सातत्यपूर्ण समर्पण आणि  उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  अधोरेखित केले की, 2025-26 या वर्षात भारताने सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन साध्य केले. त्यांनी हे यश 'आत्मनिर्भर संरक्षण औद्योगिक पाया' उभारण्याच्या दिशेने देशाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले.

राजनाथ सिंह यांनी या उपक्रमांना वेळेवर पुरवठा करणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, संशोधन आणि विकासाचे तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वात रूपांतर करणे, संरक्षण निर्यातीला नव्या उंचीवर नेणे, भांडवली खर्चातील  विस्ताराद्वारे उत्पादकता वाढवणे, स्टार्ट-अप्स आणि ‘एमएसएमई’ ना अधिक पाठिंबा देणे आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता साध्य करणे; यासाठी प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

संरक्षण मंत्र्यांनी या उपक्रमांना आपल्या उत्पादनांचा दर्जा जागतिक स्तरापर्यंत उंचावण्यावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' म्हणजेच भारतात बनवावे, जगासाठी बनवावे, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, आपण सर्व संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जागतिक स्तरावरील बलाढ्य कंपन्यांमध्ये  रूपांतर करण्याचा संकल्प केला पाहिजे," असेही  ते यावेळी म्हणाले.

   

 

* * *

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305677) अभ्यागत कक्ष : 14