संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्जन व्हाईस ॲडमिरल मनीष होनवाड, व्हीएसएम यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक आणि कमांडंट पदाचा स्वीकारला कार्यभार

Posted On: 01 SEP 2026 2:06PM by PIB Mumbai

पुणे, 1 सप्‍टेंबर 2026

 

सर्जन व्हाईस ॲडमिरल मनीष होनवाड, व्हीएसएम यांनी आज सकाळी पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक आणि कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्जन व्हाईस ॲडमिरल होनवाड यांनी 1989 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये त्याच महाविद्यालयातून भूलशास्त्र आणि अति दक्षता वैद्यकशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली. ते बंगळूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्सेस संस्था (निमहान्स) मधून न्यूरो-ॲनेस्थेशिओलॉजी विषयातील डब्ल्यूएचओ फेलो आहेत. ते नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी लोकप्रशासनात एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे.

37 वर्षांहून अधिक काळाच्या आपल्या अनुकरणीय कारकिर्दीत होनवाड यांनी, संचालक आणि कमांडंट एएफएमसी या पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी नौदल मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल), आयएनएचएस संजीवनी आणि आयएनएचएस अश्विनीचे कमांडिंग ऑफिसर यांसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय पदे भूषवली आहेत.

होनवाड हे अमेरिकेतील सोसायटी फॉर सिम्युलेशन इन हेल्थकेअर (एसएसआयएच) कडून प्रमाणित हेल्थकेअर सिम्युलेशन एज्युकेटर असून ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये हेल्थकेअर सिम्युलेशन विषयावरील आंतरराष्ट्रीय वक्ते म्हणून सहभागी झाले आहेत.

रुग्णसेवा आणि सेवेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची दखल घेऊन, फ्लॅग ऑफिसर होनवाड यांना 2025 मध्ये ‘विशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. त्यांना 2006 आणि 2013 मध्ये दोनदा चीफ ऑफ नेव्हल स्टाफ प्रशस्तीपत्र, तसेच 2007 मध्ये एफओसी-इन-सी (दक्षिण) प्रशस्तीपत्र आणि 2011 मध्ये एफओसी-इन-सी (पश्चिम) प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने डीजीएएफएमएस यांनी फ्लॅग ऑफिसर होनवाड यांना पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट म्हणून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

 

* * *

पीआयबी मुंबई | आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305410) अभ्यागत कक्ष : 12