संरक्षण मंत्रालय
आय एन एस निपुण जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल
Posted On:
31 AUG 2026 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
भारतीय नौदलाच्या निस्तार-श्रेणीतील दुसरे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) 'निपुण’ या जहाजाला 31 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आले. या विशेष जहाजाच्या समावेशामुळे नौदलाच्या खोल समुद्रातील डायव्हिंग तसेच पाण्याखालील साहाय्यक क्षमता आणि पाणबुडी बचाव क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्सयन यांच्या उपस्थितीत या जहाजाला नौदल सेवेत दाखल करण्याचा सोहळा झाला. तसेच वरिष्ठ नौदल अधिकारी, विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी सैनिक, मान्यवर पाहुणे आणि कमिशनिंग पथकातील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही या समारंभाला उपस्थित होते.
(1)_20260831164351_d617c1.jpeg)
विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने 'आयएनएस निपुण' या जहाजाची रचना आणि बांधणी केली असून यामुळे भारतीय नौदलाच्या विशेष पाणबुडी क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल. या जहाजाच्या नौदलातील समावेशामुळे, नौदल स्तरावरील तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या जहाजबांधणी आणि रचना या क्षेत्रातले भारताचे प्राबल्य दिसून येते. संरक्षण जहाजबांधणीतील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या स्वदेशी क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय जहाजबांधणी, देशांतर्गत उद्योग आणि संबंधित संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदानदेखील यातून प्रतिबिंबित होते.
आयएनएस निपुण हे खोल समुद्रातील डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमांना सहाय्य करण्यासाठी खास तयार करण्यात आलेले जहाज आहे. हे जहाज सॅच्युरेशन डायव्हिंग, एअर डायव्हिंग आणि हेलिऑक्स डायव्हिंगसाठी आवश्यक सहाय्य पुरवण्यास सक्षम आहे तसेच दूरवरच्या क्षेत्रातील पाण्याखालील मोहिमांमध्ये तपासणी आणि हस्तक्षेप करण्याच्या दृष्टीने सुसज्ज आहे. या जहाजाची विशेष डायव्हिंग प्रणाली, विशिष्ट स्थळी पोहोचण्याची गतिमान क्षमता, जीवन रक्षक प्रणाली आणि वैद्यकीय सेवा यामुळे सागरातील अतिशय गुंतागुंतीच्या मोहिमांसाठी ते परिपूर्ण आहे.
(1)_20260831164343_f20722.jpeg)
आयएनएस निपुण हे संकटात सापडलेल्या पाणबुडीला सहाय्य करण्यासाठीच्या अभियानासाठी सक्षम असून पाण्याखाली घडणाऱ्या आकस्मिक घटनांना तोंड देण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेत यामुळे वृद्धी होईल. निस्तार-श्रेणीतील आणखी एक जहाज आयएनएस निस्तार सोबत हे जहाज नौदलाची डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप, बचावकार्य यांसारख्या विशेष कार्यांमधील क्षमता लक्षणीयरीत्या वाढवते.
या जहाजाचे ध्वजचिन्ह आणि बोधवाक्य त्याच्या विशेष कार्याची तसेच समुद्राच्या अथांगतेत धाडसाने उतरणाऱ्या जवानांच्या शौर्याची भावना प्रतिबिंबित करतात. 'अथांग खोलात, मोजकेच धाडसी' हे या या जहाजाचे बोधवाक्य नौवहन परिसंस्थेतील एका अतिशय आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक निर्धार, कौशल्य आणि सहनशीलता यांचे दर्शन घडवते.
भारतीय नौदलातील आयएनएस निपुणच्या समावेशामुळे भारतीय नौदल, हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड आणि देशांतर्गत औद्योगिक संस्थांमधील मजबूत समन्वय दिसून येतो, असे नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यावेळी म्हणाले. सागरी चाचण्यांदरम्यान सर्व डायव्हिंग प्रणालींच्या कार्यक्षमतांची चाचणी घेऊन एकाच वेळी ती सिद्ध करणे हे देशाच्या तांत्रिक आत्मविश्वासाचे आणि अभियांत्रिकी प्रभुत्त्वाचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले.
(1)_20260831165026_0252ad.jpeg)
अतिशय संघर्षमय होत चाललेल्या नौवहन परिसंस्थेत आणि जागतिक सागरी मार्गांवरील वाढत्या धोक्यांमध्ये आपली लढाऊ सज्जता कायम राखण्याला भारतीय नौदलाचे सदैव प्राधान्य आहे, यावर नौदलप्रमुखांनी भर दिला. पश्चिम नौदल कमांड अंतर्गत पश्चिम किनाऱ्यावर तैनात असलेले आयएनएस निपुण हे पाण्याखालील विशेष मोहिमांमध्ये बहु-क्षेत्रीय परिचालनासाठी आवश्यक विशेष क्षमतेत एक सामर्थ्यशाली भर असेल, असे ते म्हणाले.
आयएनएस निपुणमधील विशिष्ट आणि तांत्रिक क्षमता या जागतिक स्तरावरील अतिशय कमी नौदलांकडे आहेत, या जहाजामुळे भारतीय नौदल आणि आपल्या भागीदार राष्ट्रांना आपत्कालीन स्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढली आहे, असे ते म्हणाले. या क्षमतेमुळे या क्षेत्रातील पाणबुडी संरक्षणातील प्राधान्यक्रम असलेला भागीदार म्हणून भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. तसेच पाण्याखालील संरक्षण मोहीम तसेच मानवीय सहकार्य आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये विशेष साहाय्य यामुळे पुरवता येईल, हे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यान्वयन पथकाला संबोधित करताना नौदलप्रमुखांनी सांगितले की, त्यांना केवळ अत्याधुनिक आणि अत्यंत प्रगत जहाज नाही, तर या जहाजाची ओळख घडवण्याची, तिच्या पोलादी संरचनेत जिद्द आणि जाज्वल्य भावना रुजवण्याची मोठी जबाबदारीही मिळाली आहे. ‘निश्चय, निर्भय, निपुण’ या जहाजाच्या ब्रीदवाक्यानुरूप कर्तव्य, सन्मान आणि शौर्य या नौदलाच्या मूळ मूल्यांप्रति दृढ राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
(1)_20260831164401_f0a1b0.jpeg)
कमिशनिंग ध्वज फडकवल्यानंतर, आयएनएस निपुण भारतीय नौदलात औपचारिकपणे सेवेत दाखल झाली असून, समुद्राखाली कार्यरत असलेल्यांच्या साहाय्यासाठी आणि भारताच्या सागरी हितसंबंधांच्या संरक्षणात योगदान देण्यासाठी हे जहाज सज्ज झाले आहे.
* * *
सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305168)
अभ्यागत कक्ष : 13