वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी भारत - ब्राझील यांच्यातील आठव्या व्यापार देखरेख व्यवस्था बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले


भारत आणि ब्राझील यांनी व्यापार आणि आर्थिक बंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार; वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

भारत आणि मर्कोसुर (MERCOSUR) यांच्यातील कराराच्या संदर्भातील अटी आणि कार्यक्षेत्राचा घेतला आढावा, भारत आणि ब्राझील यांनी लवकरात लवकर या कराराला अंतिम स्वरूप देण्यास तसेच भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास वचनबद्धता व्यक्त केली

भारत आणि ब्राझील यांनी कृषी उत्पादनांची बाजारपेठ उपलब्ध करण्यासह व्यापार सुलभीकरणाला चालना देण्याच्या दिशेने प्रगती केली; ब्रिक्स , जी ट्वेन्टी आणि जागतिक व्यापार संघटना यांच्यामध्ये समन्वय कायम ठेवण्याचा पुनरुच्चार

भारत-ब्राझील उच्च स्तरीय व्यापार मेळाव्यात वाणिज्य सचिवांनी सुमारे 25 भारतीय उद्योगांचे नेतृत्त्व केले

Posted On: 31 AUG 2026 2:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेची आठवी बैठक ब्राझील मधील ब्राझीलिया येथे पार पडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल आणि ब्राझीलच्या विकास, उद्योग, वाणिज्य आणि सेवा मंत्रालयाच्या  परकीय व्यापार सचिव तातियाना लासेर्डा प्राझेरेस यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला डी सिल्वा यांच्यातील भक्कम राजनैतिक संबंधांच्या पायावर रचलेल्या या बैठकीत भारत आणि ब्राझील यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला आकार देणारी मजबूत संस्थात्मक चौकट प्रतिबिंबित झाली तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक बंध दृढ करण्याची सामायिक वचनबद्धता दिसून आली.

वाणिज्य सचिवांनी ब्राझील सरकारचे विकास, उद्योग, वाणिज्य आणि सेवा मंत्री,  मार्सिओ एलियास रोझा यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी तसेच प्राधान्य क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी चर्चा केली. भारत आणि ब्राझील यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात उल्लेखनीय वाढ झाली असून तो 2025–26 मध्ये 15.07 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही अर्थव्यवस्थांमधील परस्परपूरकता लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रांनी अधिक वैविध्यपूर्ण क्षेत्रांमधून संतुलित आणि शाश्वत भागीदारीच्या माध्यमातून विशेषतः औषधनिर्माण, रसायने, अभियांत्रिकी वस्तू आणि यंत्रे या क्षेत्रांमधील सहकार्यातून 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार  30 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.

या बैठकीदरम्यान दोन्ही राष्ट्रांनी भारत आणि  मर्कोसुर  (MERCOSUR) अर्थात दक्षिण अमेरिकन सामायिक बाजारपेठ (Southern Common Market) यांच्यातील कराराच्या संदर्भातील अटी आणि कार्यक्षेत्राचा आढावा घेतला. भारत आणि मर्कोसुर  (MERCOSUR) यांच्यातील प्राधान्य व्यापार करारामध्ये  विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी मोठी क्षमता आहे. 2025 मध्ये भारत आणि मर्कोसुर (MERCOSUR) यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 20.84 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला. या पार्श्वभूमीवर, दोन्ही बाजूंनी कराराच्या  संदर्भ अटींना लवकरच अंतिम स्वरूप देण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

याशिवाय भारतीय औषधनिर्माण क्षेत्रातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने देखील लक्षणीय प्रगती झाली आहे. भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आणि ब्राझिलियन हेल्थ रेग्युलेटरी एजन्सी (ANVISA) यांच्यात फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या कराराने, आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संस्थात्मक पाया उपलब्ध करुन दिला आहे. भारताने अधिक प्रभावी आणि सुसूत्र नियामक प्रक्रिया उपलब्ध करून देण्याची आणि बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्याची गरज अधोरेखित केली. भारत किफायतशीर, दर्जेदार औषधांच्या पुरवठ्यात योगदान देण्यास सक्षम असून अधिक सुलभ आरोग्यसेवा क्षेत्रासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवण्यास समर्थ आहे.

कृषी क्षेत्रातील चर्चेदरम्यान दोन्ही राष्ट्रांनी महत्त्वाच्या कृषी उत्पादनांसाठी वनस्पती आरोग्यासंबंधीच्या प्राधान्यक्रमाच्या  क्षेत्रांवर काम करण्याची तयारी दर्शवली तसेच शेतमालासंदर्भातील परस्पर व्यापारी सवलतींसाठी तांत्रिक बाबी हाताळण्याकरता एक स्पष्ट, कालबद्ध योजना आखली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक मूळ प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यतेवर आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, उद्योजकता आणि हस्तकला यांमधील सहकार्यावर झालेल्या उत्साहवर्धक प्रगतीचीही चर्चेत नोंद घेण्यात आली, आणि व्यवसाय-ते-व्यवसाय संबंधांमधील व्यापार सुलभता वाढवण्यासाठी आणि व्यापारातील अडथळे कमी करण्यासाठी ही पावले महत्त्वपूर्ण असल्याचे चर्चेत नमूद करण्यात आले.

एका मुक्त, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख बहुपक्षीय प्रणालीसाठी दोन्ही बाजुंनी ब्रिक्स, जी ट्वेन्टी, जागतिक व्यापार संघटने अंतर्गत असलेल्या  इतर बहुपक्षीय  क्षेत्रांमधील समन्वय दृढ करण्याचा पुनरुच्चार केला. भारताने ब्रिक्स आर्थिक भागीदारी 2030 जागतिक मूल्य साखळी कृती आराखडा 2026–2030 पुढे नेण्यासाठी ब्राझीलने घेतलेल्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. तर ब्राझीलने भारताने आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात सुरु केलेल्या ब्रिक्स स्टार्टअप नॉलेज हब आणि ब्रिक्स बिझनेस इन्क्युबेटर यांसारख्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.  

द्विपक्षीय बैठकीच्या अनुषंगाने ब्राझीलिया येथे भारत-ब्राझील यांच्यातील उच्चस्तरीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही देशांमधील आघाडीच्या उद्योग प्रतिनिधींसह संबंधितांनी सहभाग घेतला. वाणिज्य सचिवांनी सुमारे 25 भारतीय उद्योगांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले, यामध्ये किर्लोस्कर ग्रुप, यूपीएल, आदित्य बिर्ला ग्रुप, यांसारख्या उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या व्यापार मेळाव्यामुळे महत्त्वपूर्ण खनिजे, अक्षय ऊर्जा, कृषी व्यवसाय, पायाभूत सेवा, डिजिटल सेवा, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उप्तादकता इत्यादी क्षेत्रांमधील सहकार्याच्या नवनवीन पैलूंवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले. दोन्ही बाजूंनी नवी दिल्लीत एपेक्सब्राझील कार्यालयाच्या स्थापनेचे स्वागत केले, यामुळे व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध अधिक दृढ होतील आणि भारतात ब्राझीलच्या गुंतवणुकीचा ओघ वाढेल. भारत आणि ब्राझील यांच्यात प्रदीर्घ आणि घनिष्ठ नाते असून ते परस्पर विश्वास, लोकशाही मूल्ये आणि वृद्धिंगत होणाऱ्या आर्थिक उलाढालींमुळे अधिक दृढ होत आहे. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना मिळाली असून दोन्ही देशांनी एका  मजबूत आणि भविष्यकेंद्रीत आर्थिक भागीदारीच्या दिशेने सामायिक वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304921) अभ्यागत कक्ष : 19