संरक्षण मंत्रालय
लखनौ कॅन्टोनमेंट येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले 100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 14 विकास प्रकल्पांचे भूमिपूजन
राजनाथ सिंह यांनी सुमारे 4,000 नागरिकांसोबत ऐकला पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम
विकसित भारत म्हणजे मुलांसाठी दर्जेदार शिक्षण, प्रत्येक घरासाठी स्वच्छ पाणी, तरुणांसाठी संधी आणि एक सर्वसमावेशक समाज: संरक्षण मंत्री
Posted On:
30 AUG 2026 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 30 ऑगस्ट 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ कॅन्टोनमेंट येथे 100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 14 विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यात राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या 2 प्रकल्पांचा समावेश आहे.
संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुमारे 4,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही ऐकला.

हे उपक्रम छावणीमधील नागरी सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शहरी पायाभूत सुविधा सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत, असे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. “लखनौ कॅन्टोनमेंटचा विकास हा लखनौच्या प्रगतीशी जवळून जोडलेला आहे. केंद्र आणि राज्याच्या समन्वित प्रयत्नांमुळे विकास आणि सुशासनाला गती मिळू शकते,” असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला श्रेय देत, संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, देश 2047 पर्यंत 'विकसित भारत' बनण्याच्या निर्धाराने पुढे वाटचाल करत आहे. विकसित भारत म्हणजे केवळ भव्य प्रकल्प आणि आधुनिक इमारती नव्हेत; तर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचणे, तरुणांना खेळण्याची आणि आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणे, आणि दिव्यांग मुलाला समाजाने आपल्याला कधीही मागे टाकल्यासारखे वाटू नये, हे देखील विकसित भारताचे महत्त्वाचे पैलू आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. विकासामुळे नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा थेट सुधारेल, यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

लखनौ कॅन्टोनमेंटमधील अनेक बाजारांची नावे बदलण्यात आल्याचा संदर्भ देत संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, ब्रिटिश काळाशी संबंधित नावे बदलून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रीय जीवनातील प्रमुख व्यक्तिमत्त्वांची नावे ठेवण्यात आली आहेत. रॉयल आर्टिलरी बाजारचे नाव बदलून एकता बाजार, ब्रिटिश कॅव्हलरी बाजारचे नाव बदलून उदा देवी बाजार, ब्रिटिश इन्फंट्री बाजारचे नाव बदलून मातादीन वाल्मिकी बाजार आणि दुसऱ्या एका ब्रिटिश इन्फंट्री बाजारचे नाव बदलून मंगल पांडे बाजार असे ठेवण्यात आले आहे, तर कनेडी मार्केटचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी मार्केट असे ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश भावी पिढ्यांना भारताच्या वारशाशी जोडणे आणि राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणे हा आहे, असे ते म्हणाले.


* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304676)
अभ्यागत कक्ष : 10