कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मातांचे सक्षमीकरण झाल्यास बालकांमधील दिव्यंगत्वाचे लवकर निदान शक्य : डॉ. जितेंद्र सिंह


टाळता येण्याजोगे दिव्यंगत्व रोखण्यासाठी महिलांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आवाहन

Posted On: 29 AUG 2026 6:38PM by PIB Mumbai

 

मातांचे सक्षमीकरण झाल्यास बालकांमधील दिव्यंगत्वाचे लवकर निदान शक्य आहे असे प्रतिपादन, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज केले. 

टाळता येण्याजोग्या दिव्यंगत्वाला आळा घालणे आणि दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण याविषयी महिलांमध्ये शिक्षण आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी 'सक्षम' (SAKSHAM) संस्थेने आयोजित केलेल्या प्रबुद्ध "मातृ शक्ती संमेलन" या उपक्रमाची प्रशंसा करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, मुलाच्या विकासात्मक किंवा आरोग्यविषयक समस्यांबद्दल सर्वात आधी मातेलाच माहित होते. त्यामुळे महिलांमधील जागरूकता हा 'दिव्यांग सेवा' आणि सक्षमीकरणाच्या व्यापक मोहिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतो. गर्भावस्थेदरम्यान योग्य जागरूकता, नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या आणि शिफारस केलेल्या चाचण्या केल्यास काही विकारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होऊ शकते. त्यामुळे वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळण्यास मदत होते आणि टाळता येण्याजोगे धोके कमी करता येतात, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले

शिक्षित, जागरूक आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार महिलांना दिव्यांग सेवा, सक्षमीकरण आणि टाळता येण्याजोग्या दिव्यंगत्वाच्या प्रतिबंधाच्या मोहिमेत सक्रिय भागीदार बनवण्याच्या उद्देशाने प्रबुद्ध 'मातृ शक्ती संमेलन' आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम विशेषतः माता, शिक्षिका, आरोग्य कर्मचारी आणि समाजातील प्रमुख व्यक्ती यांच्या भूमिकेवर भर देतो. मुलांच्या आणि कुटुंबांच्या आरोग्य, विकास आणि कल्याणाशी या सर्वांचा थेट संबंध असतो.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, टाळता येण्याजोगे दिव्यंगत्व रोखण्याचे प्रयत्न शक्य तितक्या लवकर, म्हणजेच मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच सुरू होणे आवश्यक आहे. मातांचे आरोग्य, पुरेसे पोषण, प्रसूतीपूर्व काळजी, संसर्गापासून बचाव, औषधांचा सुरक्षित वापर, नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा वेळेवर सल्ला याबाबतची जागरूकता कुटुंबांना गर्भावस्था आणि बालपणाच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. गर्भावस्थेतच एखाद्या समस्येचे निदान झाल्यास, वेळेवर वैद्यकीय उपचार आणि योग्य काळजी घेतल्याने त्याचे गांभीर्य कमी करण्यास तसेच बालकाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते.

या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना अधिक सुविधा आणि सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच्या दृष्टीने अधिक संधी निर्माण करण्यासाठी सरकारने गेल्या दशकभरात अनेक उपाययोजना केल्या आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा सुविधा आणि विशेष पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. 

दिव्यांग मुलांना लवकर उपचार मिळावेत आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.

दिव्यांग मुले असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष सवलती आणि सुविधांचाही डॉ. जितेंद्र सिंह यांनी उल्लेख केला. या सवलती आणि सुविधांचा उद्देश आपल्या मुलांच्या विशेष गरजा पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना अधिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे.

***

निलिमा चितळे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304586) अभ्यागत कक्ष : 14