संरक्षण मंत्रालय
भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीच्या पहिल्या बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन
Posted On:
28 AUG 2026 5:10PM by PIB Mumbai
भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीच्या (जेडीसी) पहिल्या बैठकीचे आज 28 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले. दोन्ही देशांनी प्रशिक्षण, लष्करी सराव, लष्करी वैद्यक , दोन्ही दलांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा (स्टाफ टॉक्स), संरक्षण उद्योग आणि संशोधन व विकास यांसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर सहमती दर्शवली.
डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्यादरम्यान भारत आणि कुवेत यांच्यात झालेल्या संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारातील उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने संयुक्त संरक्षण समितीची ही पहिली बैठक एक महत्त्वाचे पाऊल ठरली.
संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि पाच सदस्यांच्या कुवेती शिष्टमंडळाचे ब्रिगेडियर जनरल राएद अलसक्रान यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारतीय शिष्टमंडळात तिन्ही सैन्यदलांचे प्रतिनिधी, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था सशस्त्र बल वैद्यकीय सेवा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी समाविष्ट होते.

संयुक्त संरक्षण समितीच्या बैठकीपूर्वी, ब्रिगेडियर जनरल राएद अलसक्रान यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. कुवेती शिष्टमंडळाने त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नवी दिल्लीतील डीपीएसयू भवनला भेट दिली, जिथे परस्पर सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कुवेती शिष्टमंडळासोबत उद्योग क्षेत्राचा एक संवाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
भारत आणि कुवेत दरम्यान पारंपरिक घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ज्यांची मुळे काळाच्या कसोट्यांवर उतरलेल्या ऐतिहासिक संबंधांमध्ये रुजलेली आहेत. दोन्ही देशांमध्ये 1962 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्यादरम्यान या संबंधांचा स्तर उंचावून त्यांचे रुपांतर ' संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीत' झाले. भौगोलिक स्थानानुसार या देशांमधील जवळीक, ऐतिहासिक व्यापारी संबंध, सांस्कृतिक जवळीक आणि कुवेतमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समुदायाची उपस्थिती यामुळे या दोन देशांमधील बहुआयामी आणि दीर्घकालीन संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहेत आणि त्यांची जोपासना होत आहे.

***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304392)
अभ्यागत कक्ष : 4