कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला जागतिक पातळीवर प्रासंगिक राहण्यासाठी कौशल्यांइतकीच 'मन आणि विचारांची क्षमता बांधणी' देखील आवश्यक: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह


वेगाने निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी क्षमता बांधणीचे रुपांतर संपूर्ण समाजाच्या एकत्रित दृष्टिकोनात होण्याची गरज आहे: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 26 AUG 2026 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2026

 

भारताला जागतिक पातळीवर प्रासंगिक राहण्यासाठी कौशल्यांसोबतच मन आणि विचारांची क्षमता बांधणी तितकीच आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज केले. वेगाने बदलणाऱे तंत्रज्ञान आणि जागतिक पर्यावरणाला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी क्षमता बांधणीचे रुपांतर एका वैयक्तिक व कौशल्य-आधारित दृष्टीकोनाऐवजी संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नात झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

क्षमता बांधणीवरील गोलमेज परिषदेला ते आज  संबोधित करत होते. तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांचा वेग कमालीचा वाढला आहे, ज्यामुळे सतत शिकत राहणे अनिवार्य झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. आज आपण जे शिकतो, ते उद्या जुने किंवा कालबाह्य होऊ शकते. त्यामुळे व्यक्ती आणि संस्थांनी सातत्याने शिकत राहण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

नवीन आणि वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक क्षमता बांधणी ही अधिकाधिक महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संस्थांनी एकात्मिक पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटनात्मक मर्यादांच्या पलीकडे जाऊन समन्वय साधला पाहिजे. भारताने संस्थात्मक समन्वयासोबतच संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन समाविष्ट करणाऱ्या पद्धतीकडे वाटचाल केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, क्षमता बांधणी म्हणजे केवळ कौशल्ये विकसित करणे किंवा ठरवून दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी व्यक्तींना तयार करणे नव्हे. "मन आणि विचारांची क्षमता बांधणी" या संकल्पनेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, व्यक्ती आणि संस्थांनी स्वतःला बदलण्यासाठी, नवोन्मेष करण्यासाठी आणि प्रासंगिक राहण्यासाठी योग्य मानसिकता विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला जागतिक पातळीवर टिकून राहायचे असेल, तर जागतिक मानके आणि धोरणांचे अनुकरण केले पाहिजे.

शासनाकडूनच सर्व गोष्टी करण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही, त्यामुळे इतर भागधारकांचा यात मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

क्षमता बांधणीमध्ये सातत्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या मंचांच्या वाढत्या भूमिकेला त्यांनी अधोरेखित केले. 'iGOT' व्यासपीठावर 40 लाखांहून अधिक नोंदणीकृत व्यक्ती असून ते सरकारी अधिकाऱ्यांसाठी सतत शिकण्याचे एक उत्तम माध्यम ठरत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतामध्ये संशोधनामध्ये लोक कल्याणाची मजबूत संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन केले. आवश्यक परिसंस्था तयार करण्यासाठी भारताला सर्व मार्गांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, क्षमता बांधणी आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. 'ग्लोबल साउथमधील' देशांचा वाढता सहभाग लक्षात घेता, अशा उपक्रमांमुळे अधिक देश एकत्र येऊन ज्ञान, अनुभव आणि क्षमता बांधणीच्या पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यापक नेटवर्क तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

PHOTO: Union Minister Dr.Jitendra Singh speaking during “Roundtable on Capacity Building”, organised by Nalanda University, at India Habitat Centre, New Delhi on Wednesday

   

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303546) अभ्यागत कक्ष : 16