संरक्षण मंत्रालय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे संरक्षण धोरणात्मक संवादाची दुसरी फेरी
Posted On:
25 AUG 2026 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे 24 ऑगस्ट, 2026 रोजी संरक्षण धोरणात्मक संवादाची दुसरी फेरी झाली. संरक्षण सहसचिव अमिताभ प्रसाद आणि न्यूझीलंडचे संरक्षण उपसचिव रिचर्ड श्मिट यांच्या सहअध्यक्षतेखाली झालेली ही उच्चस्तरीय चर्चा, सागरी सुरक्षा, संयुक्त लष्करी प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक संरक्षण सहकार्य, यावर केंद्रित होती.

गेल्या महिन्यात झालेल्या शिखरस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या सामायिक आराखड्याच्या आधारे दोन्ही प्रतिनिधीमंडळांनी, नव्याने उच्च दर्जा दिलेली धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी सविस्तर चर्चा केली. भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी आराखडा 2030 मध्ये आखण्यात आलेल्या धोरणात्मक उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर चर्चेत मुख्य भर देण्यात आला.
दोन्ही देशांनी मुक्त, खुल्या आणि समावेशक हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. संयुक्त प्रशिक्षण सराव, विविध दलांमधल्या कर्मचाऱ्यांमधले आदान-प्रदान आणि संरक्षण कर्मचारी महाविद्यालयांमधील भागीदारी यांच्या माध्यमातून, नौदल, हवाईदल आणि थलसेनांमध्ये सहयोग अधिक वृद्धिंगत करण्याच्या पर्यायांचा प्रतिनिधीमंडळांनी सविस्तर आढावा घेतला.

यासोबतच, धोरणात्मक ताळमेळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्रालयातील आणि संरक्षण दलातील प्रमुख नेत्यांसोबत भारतीय प्रतिनिधीमंडळाच्या उच्चस्तरीय बैठका झाल्या. प्रतिनिधीमंडळाने संरक्षण दलाचे उपप्रमुख, न्यूझीलंड संयुक्त दलाचे कमांडर यांच्याशी फलदायी चर्चा केली. संयुक्त भांडवली खरेदीसंबंधी माहिती, एकमेकांचे परिचालन प्रारूप समजून घेणे आणि आगामी प्रकल्पांसाठी अविरत समन्वय सुनिश्चित करणे, हा या बैठकांचा उद्देश होता.
नियमित उच्चस्तरीय आणि मंत्रीस्तरीय भेटींबाबत परस्पर सहमती व्यक्त करण्यात येऊन बैठकीची सांगता झाली. संवादादरम्यान उचलण्यात आलेल्या पावलांमुळे संरक्षण आणि सुरक्षा समन्वय लक्षणीयरीत्या वृद्धिंगत होईल आणि तो द्विपक्षीय संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभ होईल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.
* * *
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303263)
अभ्यागत कक्ष : 11