वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टोकियो येथे जपानी उद्योग महासंघाला केले संबोधित
Posted On:
24 AUG 2026 7:41PM by PIB Mumbai
भारत-जपान भागीदारी पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन आर्थिक सुरक्षा, संरक्षण, पुरवठा साखळीची लवचिकता, तंत्रज्ञान, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा आणि लोकांमधील परस्पर देवाणघेवाण यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत विस्तारली आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. टोकियो इथे जपानच्या प्रमुख आर्थिक संघटना केइदानरेन (जपानी उद्योग समूह) सोबत आयोजित गोलमेज परिषदेला ते संबोधित करत होते. केइदानरेन ही जपानमधील 1,500 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च आर्थिक संघटना आहे.
दोन्ही देशांमध्ये व्यवसाय-ते-व्यवसाय भागीदारी अधिक दृढ करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. भारतातील व्यवसाय सुलभतेत होत असलेली सुधारणा आणि देशाच्या वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या संधींवर गोयल यांनी प्रकाश टाकला. जपानी गुंतवणूकदारांनी भारताप्रती आपली वचनबद्धता वाढवावी आणि देशात कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट करावी, असे आवाहन गोयल यांनी केले. भारतात कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांची संख्या "या दशकात सध्याच्या पातळीवरून दुप्पट झाली पाहिजे," असेही ते म्हणाले. भारत आणि जपानने 2026 हे वर्ष ‘भारत-जपान सामायिक क्षितिजाचे वर्ष’ म्हणून घोषित केले असून याच वर्षी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
गोयल यांनी सुमितोमो कॉर्पोरेशन, मेइजी सेइका फार्मा, मित्सुबिशी कॉर्पोरेशन, टोकियो इलेक्ट्रॉन आणि माइनबियामित्सुमी या कंपन्यांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत व्यावसायिक बैठका घेतल्या. त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार करण्याच्या संधी आणि भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
त्यानंतर गोयल यांनी भांडवली वस्तू, यंत्रसामग्री आणि वाहन उद्योग या विषयांवरील गोलमेज परिषदेत भाग घेतला. या परिषदेत जपानी उद्योग आणि भारताची श्रेणी-2 व श्रेणी-3 पुरवठादार व्यवस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी तसेच औद्योगिक सहकार्य आणि तंत्रज्ञान भागीदारीसाठी नवीन मार्ग निश्चित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मंत्र्यांनी भांडवली वस्तू, यंत्रसामग्री, वाहन आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींवर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना या क्षेत्रांमध्ये भारतात आपली उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी गोयल यांनी आमंत्रित केले.
या चर्चेत जपानी कंपन्यांना भारताच्या उत्पादन परिसंस्थेशी आपला सहभाग अधिक दृढ करण्याच्या तसेच अधिक मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळ्यांमध्ये योगदान देण्याच्या संधींचाही शोध घेण्यात आला.
***
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2302907)
अभ्यागत कक्ष : 48