कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्रालय परिवार पंतप्रधान मोदी यांच्या ‘शक्ती की सप्तधारा’ संकल्पनेला पाठींबा देण्यासाठी एकत्र : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

प्रविष्टि तिथि: 18 AUG 2026 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन जाहीर केलेल्या ‘शक्ती की सप्तधारा’ या संकल्पनेला वास्तवात साकार करण्याच्या दिशेने कृती करत, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकारासह आज पुसा येथील सी.सुब्रमण्यम सभागारात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास या मंत्रालयांतील विभागांचा एक कटिबद्धता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकारी, कर्मचारी, वैज्ञानिक, शेतकरी,लखपती दीदी, अन्न प्रक्रियाकर्ते, निर्यातदार तसेच शेतकरी उत्पादक संघटनांचे (एफपीओज) प्रतिनिधी या सर्वांना विकसित, समृध्द, आत्मनिर्भर आणि सक्षम भारताच्या उभारणीसाठी योगदान देण्याची सामुहिक शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि डॉ. चंद्रशेखर पेम्मसानी यांच्यासह चारही विभागांचे सचिव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शक्ती की सप्तधारा’ या संकल्पनेद्वारे विकसित भारताच्या उभारणीसाठी सुस्पष्ट आराखडा सादर केला आहे. कृषी आणि अन्न प्रकिया हे या संकल्पनेचे महत्वाचे स्तंभ आहेत. ते म्हणाले की भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सशक्त उपस्थिती नोंदवता यावी म्हणून भारताने केवळ कृषी उत्पादन वाढवण्यावरच नव्हे तर गुणवत्ता, सुरक्षितता आणि जागतिक मानकांची पूर्तता सुनिश्चित करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की आजचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक औपचारिक आयोजन नसून संपूर्ण कृषी आणि ग्राम विकास परिसंस्थेची सामूहिक कटिबद्धता आहे. या प्रयत्नामध्ये शेतकरी, वैज्ञानिक, अधिकारी, कर्मचारी, प्रक्रियाकर्ते, निर्यातदार, स्वयंसहाय्यता बचत गटांशी (एसएचजीज) जोडल्या गेलेल्या महिला तसेच शेतकरी उत्पादक संघटना हे सर्व समान भागीदार आहेत. प्रत्येक व्यक्तीवर महत्त्वाची जबाबदारी आहे आणि पंतप्रधानांची संकल्पना वास्तवात साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला अधिक प्राधान्य देण्याचे आणि कर्तव्याला स्वतःच्या जीवनाचे निर्णायक तत्व बनवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा ही देश आणि देशवासीयांची सेवा करण्याची बांधिलकी आहे. शेतकरी, गरीब व्यक्ती, माता आणि भगिनी तसेच ग्रामीण समुदाय यांची सेवा करणे हे भारतमातेची सेवा करण्यासारखेच आहे. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने स्वतःची कर्तव्ये पार पाडणे हीच खरी देशभक्ती आहे. चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेली वचने पूर्ण करण्याची पहिली जबाबदारी मंत्री, अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांची आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या संबंधित विभागांसाठी सुस्पष्ट उद्दिष्टे निश्चित करावी, ठोस आराखडे तयार करावेत आणि समर्पितवृत्ती, सचोटी आणि परिश्रम यांच्यासह ते अंमलात आणावेत असे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधानांनी दिलेली वचने जेव्हा आपण आपली स्वतःची वचने म्हणून स्वीकारून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तेव्हाच ती वचने पूर्ण होऊ शकतील असे मत केंद्रीय मंत्री चौहान यांनी व्यक्त केले.

 

 

शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2301027) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Tamil