गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज अलवर इथे राजस्थानच्या 17 जिल्ह्यांमधील 6,453 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन


आपल्या सरकारने आज एकाच मंचावरून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, पशुपालकांसाठी 500 कोटी रुपयांचा दुग्ध पायाभूत सुविधा उपक्रम, युवा वर्गासाठी नोकऱ्या आणि माता भगिनींच्या कल्याणासाठी सरस डेअरीचा विस्तार अशा अनेक योजनांचा लाभ दिला - अमित शाह

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर आपल्याला युवा वर्ग, गरीब, शेतकरी आणि महिला या चार स्तंभांचे सक्षमीकरण करावे लागेल याच संकल्पाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार काम करत आहे

प्रविष्टि तिथि: 16 AUG 2026 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमधील अलवर इथे राजस्थान सरकारच्या 6,453 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह म्हणाले की, जर भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित राष्ट्र बनायचे असेल, तर युवक, गरीब, अन्नदाता  आणि महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. आज येथे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी मिळत आहे; पशुपालकांसाठी 500 कोटी रुपयांची दुग्धव्यवसायविषयक पायाभूत सुविधा उभारली जात आहे; तरुणांना रोजगार दिला जात आहे; तसेच माता-भगिनींसाठी सरस डेअरीच्या विस्ताराची कामे हाती घेतली जात आहेत.

अमित शाह यांनी सांगितले की, आज अलवरमध्ये 3 लाख लिटर क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाची क्षमता लवकरच 5 लाख लिटरपर्यंत वाढवली जाईल. जेव्हा गरीब पशुपालकांकडून दररोज 5 लाख लिटर दूध डेअरीला पुरवले जाईल आणि त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे नशीब उजळेल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची, गरीब पशुपालकांचे जीवनमान उंचावण्याची आणि त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्याची प्रचंड क्षमता सहकार आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात आहे.

आपण राजस्थानमधील अलवरसह प्रत्येक घराघरात जास्त दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींच्या उच्च प्रजाती पोहचवू इच्छितो. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी पशुधनाचा विमा उतरवण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या असल्याचे, गृहमंत्री शाह यांनी सांगितले. तसेच येत्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीच्या नव्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजस्थानमध्ये सध्या 44,000 सहकारी संस्था कार्यरत आहेत. राज्यातील एकही गाव सहकारापासून वंचित राहू नये, हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. 2026-27 या वर्षात 50 नवीन गोदामे बांधली जाणार आहेत; तर 100 मेट्रिक टन क्षमतेची 62 गोदामे आणि 500 मेट्रिक टन क्षमतेची 100 गोदामे आधीच पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींचे ध्येय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव समृद्ध करण्याचे आहे, असे गृहमंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या 'सहकारातून समृद्धी' या मंत्राला प्रत्यक्ष रूपात आणून, आपण राज्यातील प्रत्येक गाव समृद्ध करू, असे ते म्हणाले. 

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/राजेश शिरभाते/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300258) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati