गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते चित्तोडगड इथे राजस्थानमधील 15 जिल्ह्यांसाठीच्या 5,755 कोटी रुपयांच्या 944 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
गृहमंत्र्यांच्या हस्ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण
देशाच्या स्वातंत्र्या प्राप्तीच्या 80 वर्षांमध्ये पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून आणि देशभरातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् गायले गेले - गृहमंत्री
मतपेढीच्या राजकारणामुळे मुख्य विरोधी पक्षाने अनेक दशके वंदे मातरम् कडे दुर्लक्ष केले, या गीताच्या 150 व्या वर्षात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून या अमर गीताला नवा आदर मिळवून दिला – अमित शाह
मतपेट्यांच्या लालसेने प्रेरित होऊन मुख्य विरोधी पक्ष वंदे मातरम् विसरला होता – अमित शाह यांची टीका
प्रमुख विरोधी पक्षाच्या मुख्यालयातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान, एका प्रमुख नेत्याने मध्येच गायन थांबवण्यास सांगून वंदे मातरम् चा अपमान केला, यासाठी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही – गृहमंत्री
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2026 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2026
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमधील चित्तोडगड इथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी केंद्रीय गृह मंत्र्यांनी राजस्थान राज्य सरकारच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही केले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या पवित्र भूमीवर उभारलेल्या वाजपेयी यांचा पुतळा 21 फूट उंचीचा असून, यासाठी 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असल्याची माहिती शाह यांनी दिली. त्याचवेळी आज 15 जिल्ह्यांमधील 5,755 कोटी रुपये खर्चाच्या 944 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; मात्र यावेळी त्यात एक महत्त्वपूर्ण बदल झाला. स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षांत प्रथमच लाल किल्ल्याच्या तटबंदीवर तसेच देशभरातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लाखो लोकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत फासावर जाणे स्वीकारले, गोळ्या आणि लाठीमार सहन केला तसेच अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. ‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या रचनेतील अमर शब्द आहेत. शाह म्हणाले की, मतपेढीच्या राजकारणाच्या हव्यासापोटी विरोधी पक्षांनी ‘वंदे मातरम्’ला विस्मृतीत जाऊ दिले; मात्र ‘वंदे मातरम्’च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होत असताना मोदीजींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यात नवचैतन्य निर्माण केले आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
प्रमुख विरोधी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या एका प्रमुख नेत्या यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन मध्येच थांबवण्यास सांगून त्याचा अपमान केला, असे सांगत, जनता त्यांना यासाठी कधीही क्षमा करणार नाही, अशी टीका त्यांनी केली. 80 वर्षांनंतर बंकिम बाबूंच्या अमर मंत्राला आणि अमर गीताला पुन्हा सन्मान मिळत असल्याचे विरोधकांना आवडत नाही, असा आरोप त्यांनी केला. मात्र, देशातील 140 कोटी जनता आपल्याकडे पाहत आहे. या देशातील जनता आपण केलेल्या या पापाबद्दल आपल्याला कधीही क्षमा करणार नाही, असे आपण विरोधी पक्षाला सांगू इछितो, असे गृहमंत्री म्हणाले. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणीही अपूर्ण ठेवण्याचे स्वप्न तरी कसे पाहू शकतो? अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आदिवासी कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांनी अनुसूचित जमाती घटकासाठीची तरतूद केवळ ₹25,000 कोटींवरून ₹1,25,000 कोटींपर्यंत वाढवली. त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, अशी माहितीही शाह यांनी यावेळी दिली.
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300206)
आगंतुक पटल : 12