प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण नवोन्मेष आणि तंत्रज्ञान हस्तांतरण बळकट करण्यासाठी नाबार्डने विकसित केलेल्या आरएसव्हीसी-अमृत मंचाचा भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या हस्ते शुभारंभ

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 4:30PM by PIB Mumbai

 

भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी, आरएसव्हीसी अमृत या मंचाचा शुभारंभ केला. तंत्रज्ञानाधारित ग्रामीण विकासाला बळकटी देण्याच्या दिशेने उचलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या सहकार्याने नाबार्डने विकसित केलेला 'अमृत' हा मंच रुटॅगे स्मार्ट व्हिलेज सेंटर (आरएसव्हीसी) परिसंस्थेचा डिजिटल कणा म्हणून काम करणार असून, ग्रामीण नवोन्मेष आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला यामुळे मदत होणार होईल, तसेच ग्रामीण भागात योग्य तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार शक्य होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. यांच्यासह विविध संस्था आणि हितधारक गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अमृत हा मंच आरएसव्हीसीच्या संपूर्ण कार्यचक्राला सहाय्य करणारी व्यापक डिजिटल परिसंस्था म्हणून तयार करण्यात आला आहे असे डॉ. सूद यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तंत्रज्ञानाचा शोध आणि प्रमाणीकरणापासून, ते त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सहकार्य, देखरेख आणि ज्ञान व्यवस्थापनापर्यंतच्या सर्व बाबींना हे व्यासपीठ सहाय्य करेल. या माध्यमातून नवोन्मेषक, तंत्रज्ञान पुरवठादार, नवउद्योग, प्रमाणीकरण संस्था, गतीवर्धक संस्था, अंमलबजावणी भागीदार, निधी पुरवणाऱ्या संस्था, शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण समुदाय यांना एका सामायिक व्यासपीठावर टप्प्याटप्प्याने एकत्र आणले जाईल, असे त्यांनी सांगितले. या हितधारकांना एकमेकांशी जोडल्यामुळे सहकार्य अधिक मजबूत होईल आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होण्यास मदत होईल. त्यातून तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

या व्यासपीठाची गरज अधोरेखित करताना डॉ. कृष्णन यांनी सांगितले की, भारताकडे वैज्ञानिक संस्था, नवोन्मेषक, नवउद्योग आणि तंत्रज्ञान पुरवठादारांची समृद्ध परिसंस्था असली, तरी ग्रामीण गरजांशी योग्य तंत्रज्ञान जोडणे हे अद्याप एक आव्हान आहे. अमृत ग्रामीण भागातल्या गरजा आणि नवोन्मेष, संस्था तसेच अंमलबजावणीच्या यंत्रणा यांच्यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तंत्रज्ञानाचा प्रसार आणि तळागाळातला स्वीकार अधिक बळकट होईल. सध्या 8 आरएसव्हीसींना दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त, देशभरातील अशा उपक्रमांना पाठबळ देण्याच्या नाबार्डच्या बांधिलकीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आरएसव्हीसी उपक्रमामार्फत संशोधन संस्था, नवोन्मेषक आणि नवउद्योग यांनी विकसित केलेले योग्य आणि परवडणारे तंत्रज्ञान ग्रामस्तरीय तंत्रज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण समुदायांपर्यंत पोहोचवले जाते. या उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात शेती, ग्रामीण उद्योग, अक्षय ऊर्जा, शिक्षण, सहाय्यक तंत्रज्ञान, पाणी व स्वच्छता आणि नागरिक सेवा यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. अमृत या भौतिक स्तरावरच्या संपर्कव्यवस्थेला परिसंस्थेच्या डिजिटल स्तराशी जोडतो. नाबार्डच्या मते, हे व्यासपीठ पुढे ग्रामीण नवोन्मेष, तंत्रज्ञान, सर्वोत्तम कार्यपद्धती आणि सहकार्याच्या संधींचे राष्ट्रीय भांडार म्हणून विकसित होऊ शकते. यामुळे तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार व्हायला आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला चालना मिळायला मदत होईल.

https://www.youtube.com/live/PXitjx7p8eY?si=wBipNND88Czxfv-6

***

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2300076) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati