निती आयोग
देशाच्या सेवा क्षेत्राविषयी नीती आयोगाचा अहवाल: व्यावसायिक सेवांमधील नियमनाविषयी माहिती
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2026 5:13PM by PIB Mumbai
नीती आयोगाचे उपाध्यक्ष, अशोक कुमार लाहिरी, यांनी 10 ऑगस्ट 2026 रोजी, सेवा संकल्पना मालिकेअंतर्गतचा तिसरा अहवाल, ‘शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता’ या विषयावरील, उच्चस्तरीय स्थायी समितीच्या मंचावर प्रकाशित केला. यावेळी, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, निधी छिब्बर आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग उपस्थित होते. उच्चस्तरीय समितीचे सदस्य असलेले विविध मंत्रालये तसेच विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी, उद्योग संघटनांचे पदाधिकारी तसेच तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते.
“भारतातील सेवा क्षेत्र: व्यावसायिक सेवांमधील नियामक व्यवस्थेबाबतची माहिती” अशा शीर्षकाच्या या अहवालात भारतातील व्यावसायिक सेवांसाठीच्या नियामक चौकटीचे वस्तुनिष्ठ आणि सखोल मूल्यमापन करण्यात आले आहे. तसेच भारताच्या नियामक व्यवस्थेची निवडक परदेशी देशांमधील नियामक व्यवस्थेशी तुलना करून त्याचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
विविध हितसंबंधियांशी झालेल्या व्यापक चर्चांच्या आधारे या अहवालात, सेवा क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हानेही अधोरेखित करण्यात आली आहेत. तसेच व्यावसायिक सेवा क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारतातील व्यावसायिक मनुष्यबळाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी पुढील वाटचालीची दिशाही मांडण्यात आली आहे.
भारताच्या सेवा आधारित अर्थव्यवस्थेत, व्यावसायिक सेवा, हा एक महत्वाचा घटक असून, भारताच्या एकूण सेवा निर्यातीत, त्याचा एक चतुर्थांश वाटा आहे. उच्च मूल्यवर्धित आणि ज्ञानाधारित स्वरूपाच्या या सेवांमुळे, संबंधित सेवा कार्यांची कार्यक्षम अंमलबजावणी होते, त्याशिवाय, त्या रोजगारनिर्मिती आणि परदेशातून येणाऱ्या चलनाला, प्रोत्साहन देतात. तसेच, या सेवा मूल्यसाखळीचा कणा आहेत. त्यामुळे या सेवांचे नियमन करणारी नियामक व्यवस्था समजून घेणे, या क्षेत्राच्या पुढील वाढीची क्षमता खुली करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या अहवालात, एक संतुलित दृष्टिकोन ठेवण्यात आला असून, सेवा-विशिष्ट माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय,व्यावसायिक सेवांची कार्यक्षमता आणि फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी, चतुष्कोणी धोरणही सांगण्यात आले आहे. ते म्हणजे, सेवा मूल्य साखळीत, नव्याने येणाऱ्या, उदयोन्मुख ट्रेंडसना सामावून घेणे, व्यावसायिक सेवांमधील सर्वोत्तम पद्धतींचा अंगीकार करणे आणि व्यावसायिकांसाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास करत राहणे.
आज ज्यावेळी भारत आपल्या लोकसांख्यिक रचनेच्या सर्वोच्च टप्प्याकडे वाटचाल करतो आहे, अशा वेळी व्यावसायिक सेवा क्षेत्रात उच्च-कुशल रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेषाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. सुयोग्य पद्धतीने तयार केलेली नियामक व्यवस्था सेवा निर्यातीला, व्यावसायिकांच्या सीमापार हालचालींना आणि व्यवसाय सुलभतेला आणखी बळकटी देऊ शकते.
हा अहवाल, व्यावसायिक सेवांच्या नियामक चौकटीचा पाया रचण्यासाठी सखोल तपासणी आणि भविष्यातील धोरणात्मक संवाद, यासाठी एक सूचक मार्ग प्रदान करतो. भारत, विकसित भारत @2047 च्या दिशेने वाटचाल करत असतांना, असे प्रयत्न, जागतिक दृष्ट्या स्पर्धात्मक, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज असे सेवा क्षेत्र तयार करण्यसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात.
संपूर्ण अहवाल इथे वाचा: https://www.niti.gov.in/sites/default/files/2026-08/India-Services-Sector-Insights-on-Regulatory-Regime-in-Professional-Services.pdf
***
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299566)
आगंतुक पटल : 7