अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम अणुऊर्जा परिसंस्था उभारण्याबाबत सरकारचा मार्गदर्शक आराखडा लोकसभेत केला सादर

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

प्रगत अणुभट्टी तंत्रज्ञान, 'स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स', देशांतर्गत उत्पादन क्षमता, खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि देशातील विपुल थोरियम साठ्यांचा दीर्घकालीन वापर यांवर लक्ष केंद्रित करून भारत आपली स्वदेशी अणुऊर्जा परिसंस्था सातत्याने बळकट करत आहे, असे कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताचे दीर्घकालीन अणुऊर्जा धोरण हे देशाच्या 'तीन-टप्प्यांतील अणुऊर्जा कार्यक्रमा'द्वारे संचालित केले जात आहे. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी देशातील थोरियमच्या विपुल  साठ्यांचा शाश्वत वापर करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश  आहे.

केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षमता वाढीला गती देण्यासाठी दोन सूत्री दृष्टिकोन स्वीकारला आहे. यामध्ये नवीन ठिकाणी (ग्रीनफिल्ड साइट्स) 700 मेगावॅट क्षमतेच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स (PHWRs) आणि प्रगत रिॲक्टर डिझाइन्ससारख्या मोठ्या स्वदेशी अणुभट्ट्यांची तैनाती, तसेच बंद होणारे जीवाश्म-इंधन आधारित वीज प्रकल्प, ऊर्जा-केंद्रित उद्योगांसाठीचे कॅप्टिव्ह प्रकल्प आणि दुर्गम भागांतील ऑफ-ग्रिड वापरांसारख्या ब्राउनफिल्ड ठिकाणी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सचा विकास आणि उभारणी यांचा समावेश आहे.

अणुऊर्जा अभियानांतर्गत 2033 पर्यंत किमान पाच स्वदेशी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स विकसित करून ते कार्यान्वित करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी 'इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च' (IGCAR) द्वारे सुरू असलेले कार्य अधोरेखित केले.

अणुऊर्जा विभाग नवीन 'एसएमआर' तंत्रज्ञानासाठी ज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाद्वारे भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देत आहे; त्याचबरोबर, देशांतर्गत अणुऊर्जा क्षेत्रातील पुरवठादारांचा विकास आणि खाजगी क्षेत्रातील संशोधन व विकास  परिसंस्थेला बळकट करण्याचे कामही करत आहे.

थोरियम संदर्भात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, युरेनियम संसाधनांचा इष्टतम वापर करण्यासाठी आणि थोरियमच्या विपुल साठ्याचा टप्प्याटप्प्याने उपयोग करून घेण्यासाठी भारत "वापरण्यात आलेल्या इंधनाचे पुनर्चक्रीकरण" (closed fuel cycle) आधारित आपला 'तीन-टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम' राबवत आहे.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत अशी अणुऊर्जा परिसंस्था उभारण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.

भारताची ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता बळकट करण्याच्या व्यापक उद्देशाने, सरकारचा दृष्टिकोन हा स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, अणुऊर्जा क्षमतेचा विस्तार, उद्योगांचा अधिक सहभाग, प्रगत अणुभट्टीविषयक संशोधन आणि अणुइंधन चक्रातील  निरंतर गुंतवणूक यांची सांगड  घालणारा आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298412) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu