नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बारामती विमानतळावर सेस्ना C172 प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर जाण्याची घटना

Posted On: 09 AUG 2026 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2026

 

महाराष्ट्रातल्या बारामती विमानतळावर 09 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 12:25 वाजता अकादमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मान्यताप्राप्त उड्डाण प्रशिक्षण संस्थेद्वारे संचालित सेस्ना C172 प्रकारचे, नोंदणी क्रमांक VT-SEX असलेले प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर जाण्याची घटना घडली.

हे विमान ‘सर्किट अँड लँडिंग इमर्जन्सीज’ अर्थात आपत्कालीन परिस्थितीच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. या विमानाचे नेतृत्व उड्डाण प्रशिक्षक कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे करत होते, तर प्रशिक्षणार्थी अभिजीत जुंद्रे हे त्यांच्यासोबत होते.

हे विमान सुमारे  समन्वयित जागतिक वेळेनुसार 06.39 वाजता, म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 12 वाजून 09 मिनिटांनी नियोजित प्रशिक्षणासाठी बाहेर काढण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान विमान लिंक ब्राव्हो मार्गे धावपट्टीवर प्रवेश करून धावपट्टी 29 च्या सुरुवातीच्या बिंदूवर उभे करण्यात आले, तिथे ‘रिजेक्टेड टेक-ऑफ’ सराव करण्यात आला. त्यानंतर विमान धावपट्टी 11 च्या सुरुवातीच्या बिंदूवर नेऊन पुन्हा एकदा ‘रिजेक्टेड टेक-ऑफ’ सराव करण्यात आला.

या सरावादरम्यान विमान धावपट्टीवर पूर्णपणे थांबू शकले नाही आणि धावपट्टीच्या पक्क्या भागाच्या पुढे जाऊन उजव्या बाजूला वळले, त्यामुळे ते धावपट्टीबाहेर जाण्याची घटना घडली.

या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र विमानाच्या प्रोपेलर, इंजिन कव्हर (काउलिंग) आणि नोज लँडिंग गिअरला प्राथमिक स्वरूपाचे नुकसान झाले आहे. नुकसानाचे सविस्तर मूल्यांकन संबंधित प्राधिकरणांकडून करण्यात येणार आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा विमान सुरक्षा चमू घटनास्थळी पोहोचत असून प्राथमिक चौकशी करून या घटनेमागची कारणे आणि इतर घटकांचा तपास करणार आहे. पुढील माहिती तपासानंतर उपलब्ध झाल्यावर जाहीर करण्यात येईल.

 

* * *

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296899) अभ्यागत कक्ष : 69