विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आगामी औद्योगिक क्रांतीमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची असेल : डॉ. जितेंद्र सिंह


समर्पित जैवतंत्रज्ञान धोरण बायो ई-3, तसेच राष्ट्रीय क्वांटम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मिशन असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 09 AUG 2026 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2026

 

जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आगामी औद्योगिक क्रांतीमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. खाजगी प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसे पहिले तर, आधीच्या औद्योगिक तसेच माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीमध्ये  सहभागी होण्यास भारताला विलंबच  झाला होता, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. आता मात्र,  बायो-ई 3 या समर्पित जैवतंत्रज्ञान धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. आपल्याकडे राष्ट्रीय क्वांटम मिशन, इंडिया एआय मिशन देखील कार्यरत असून अवकाश आणि इतर अग्रेसर क्षेत्रात भारताने वेगाने प्रगती केली आहे. भारताची अवकाश अर्थव्यवस्था, जी पूर्वी नगण्य होती, ती आता वाढून सुमारे 9 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली असून येत्या आठ ते नऊ वर्षांत ती 40 ते 45 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान विकासक, उद्योग क्षेत्रातील नेते आणि इतर भागधारकांची उपस्थिती असलेल्या या परिषदेत, डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारताचे जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून उदयाला येणे, तंत्रज्ञानातील बदलांचा जलद वेग, नवोन्मेष, खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि अग्रेसर क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या संधी या विषयांवर या चर्चेत मुख्यत्वे भर देण्यात आला.  डिजिटल अप्लायन्स अवॉर्ड्सच्या विजेत्यांचे यावेळी सिंह यांनी अभिनंदन केले. भारताच्या तंत्रज्ञानविषयक वाटचालीत लक्षणीय परिवर्तन झाले असून, आता अनेक क्षेत्रांमध्ये देश जागतिक मानकांनुसार काम करत आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगतीचा संदर्भ देताना त्यांनी चांद्रयान मोहिमेने चंद्रावर पाण्याच्या रेणूंच्या अस्तित्वाचे पुरावे शोधल्याचा त्यांनी उल्लेख केला. हे भारताच्या जागतिक वैज्ञानिक ज्ञानातील योगदानाचे उदाहरण असून भारताकडे प्रतिभावान मनुष्यबळ किंवा वैज्ञानिक क्षमतांची कधीही कमतरता नव्हती, मात्र या क्षमतांचे परिणामांमध्ये रूपांतर करता येईल, असे धोरणात्मक वातावरण आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक अर्थव्यवस्था आता पारंपरिक उत्पादनासोबतच जैवतंत्रज्ञान, चक्राकार अर्थव्यवस्था, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानावर आधारित इतर नवोदित क्षेत्रांकडे हळूहळू वळताना दिसत आहे, असे सांगतानाच, औद्योगिक क्रांतीचा किंवा परिवर्तनाचा पुढचा टप्पा प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असण्याची मोठी शक्यता आहे, असेही ते म्हणाले. भारत आधीच या बदलाचा एक भाग बनला असून समर्पित जैवतंत्रज्ञान धोरण असलेल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, असे ते म्हणाले. सरकारचा बायो-ई3 हा उपक्रम जैवतंत्रज्ञान व्यवस्थेला बळकट करण्यासाठी उद्देशून तयार करण्यात आला आहे, जैवतंत्रज्ञानाचा प्रभाव वैद्यकीय शास्त्र, शेती आणि अन्न उत्पादनावर उत्तरोत्तर वाढत राहील, तसेच यामुळे आर्थिक वाढ आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

2020 मध्ये अवकाश क्षेत्र खासगी सहभागासाठी खुले करण्यात आल्याचा संदर्भ देताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, देशातील क्षमतांना वाव देण्यासाठी सक्षम धोरणात्मक चौकट किती प्रभावी ठरू शकते, हे या निर्णयातून दिसून येते. भारताची अवकाश अर्थव्यवस्था पूर्वी जवळपास नगण्य होती; मात्र, ती आता सुमारे 9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून वेगाने विस्तारत आहे. पुढील आठ ते नऊ वर्षांत ती 40 ते 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात अवकाश क्षेत्रातील स्टार्ट-अप कंपन्यांची झालेली वाढ हे या परिवर्तनाचे उदाहरण असल्याचे सिंह म्हणाले. काही कंपन्यांनी रॉकेट विकसित केले असून, त्यापैकी काही कंपन्यांनी अवघ्या काही वर्षांत युनिकॉर्नचा दर्जाही प्राप्त केला आहे. भारताकडे प्रतिभा आणि क्षमता  पूर्वीपासूनच आहे; मात्र, या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक असलेले सक्षम वातावरण आता निर्माण केले जात आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

 

* * *

राधिका अघोर/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296833) अभ्यागत कक्ष : 60