आयुष मंत्रालय
'सोवा-रिग्पा' ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि पुराव्यांच्या आधाराने सिद्ध आरोग्यसेवा प्रणाली म्हणून उदयास येणे आवश्यक: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा'च्या नियामक मंडळाची दुसरी बैठक
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2026 10:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा'च्या (एनआयएसआर) नियामक मंडळाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक उत्कृष्टता, संस्थात्मक विकास आणि भारतीय हिमालयीन क्षेत्रातील (आयएचआर) विस्ताराच्या माध्यमातून 'सोवा-रिग्पा' पद्धतीला बळकट करण्यासंबंधीची धोरणात्मक आराखड्याची रूपरेषाही मांडली.
आगामी काही वर्षांसाठी ठरवण्यात आलेली संस्थेची प्राधान्यक्षेत्रे स्पष्ट करताना, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विकासाच्या पुढील टप्प्यात वैज्ञानिक संशोधनाला बळ देणे, आंतरराष्ट्रीय मानके निश्चित करण्यास प्रोत्साहन देणे तसेच 'सोवा-रिग्पा' या पद्धतीचा तिच्या पारंपरिक भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे प्रसार करणे या गोष्टींवर लक्ष करण्याची गरज स्पष्ट केली.
नियामक मंडळाला संबोधित करताना प्रतापराव जाधव म्हणाले, " आता केवळ पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आपले उद्दिष्ट राहिलेले नसून 'सोवा-रिग्पा'ला भारतात आणि जगभरात आरोग्यसेवेच्या मुख्य प्रवाहातील प्रणाली म्हणून प्रस्थापित करणे हे आपले ध्येय आहे. वैद्यकीय विज्ञानाची एक 'पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेली' प्रणाली म्हणून ती जगासमोर आणण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण संशोधनविषयक धोरणांना गती देणे आवश्यक असून त्या अनुषंगाने स्वतंत्र संशोधन परिषद स्थापन करणे हे पहिले महत्त्वाचे पाऊल ठरेल. पुरावा-आधारित संशोधन, सक्षम शैक्षणिक संस्था आणि जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या मानकांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि वैज्ञानिक उत्कृष्टता यांचा मेळ साधणारी एक परिसंस्था आपल्याला निर्माण करावी लागेल."
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, " सोवा-रिग्पा राष्ट्रीय संस्था ही केवळ लडाखची संस्था नसून ती संपूर्ण भारतीय हिमालयीन प्रदेशाच्या वैद्यकीय वारशाची संरक्षक आहे, असे माझे ठाम मत आहे. आपण तिची दोन्ही प्रादेशिक मॉडेल्स अधिक बळकट करणे तसेच हिमालयीन भागात राहणाऱ्या समुदायांबरोबरचा आपला संबंध आणखी दृढ करणे आवश्यक आहे. स्थानिक समुदाय या अमूल्य ज्ञानप्रणालीचे जतन आणि संवर्धन करण्यात समान भागीदार व्हावेत यासाठी दुर्मिळ औषधी वनस्पतींची पर्यावरणपूरक पद्धतीने लागवड, जैव-शोधन, कृषी-वनीकरण आणि औषधी जैवविविधतेचे संवर्धन यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून या संस्थेला सर्वांगीण आरोग्यासाठीचे जागतिक केंद्र बनवूया."
'भोटी' भाषेतील ज्या शेकडो हस्तलिखितांमध्ये सामावलेल्या 'सोवा-रिग्पा'च्या अमूल्य ज्ञानाचा पारंपरिक ठेवा पद्धतशीर लिप्यंतरण आणि अनुवादाद्वारे जतन केला जावा, अशी सूचना जाधव यांनी केली. ज्ञानाचा हा समृद्ध साठा सामान्य जनतेला आणि संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी, सर्वप्रथम या हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि त्यानंतर त्यांचा अनुवाद करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.



शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2296427)
आगंतुक पटल : 3