आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुर्वेदाला मोठी चालना: केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद आणि भारतीय मानक ब्युरो एकत्रितपणे जागतिक गुणवत्ता मानके करणार निर्धारित

Posted On: 07 AUG 2026 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च संशोधन संस्था म्हणजे केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद आणि भारतीय राष्ट्रीय मानक संस्था असलेल्या भारतीय मानक ब्युरो यांनी आयुष क्षेत्रासाठी गुणवत्ता मानके, अनुरूपता मूल्यांकन, वैज्ञानिक संशोधन आणि क्षमता उभारणीला  संयुक्तपणे चालना देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार केला.

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक वैद्य रबिनारायण आचार्य आणि भारतीय मानक ब्युरोचे उपमहासंचालक संजय पंत, (मानकीकरण-II),  यांनी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केली. आयुर्वेद क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे गुणवत्ता मापदंड प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे सुरक्षित, शास्त्रोक्त पद्धतीने प्रमाणित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादने, पद्धती आणि संशोधन यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

या भागीदारीमुळे आयुर्वेद क्षेत्रातील आणि आयुष पद्धतींमधील मानकांच्या विकासात सहयोग वाढीला लागेल, प्रयोगशाळांची गुणवत्ता आणि अनुरूपता मूल्यांकन यंत्रणा बळकट होईल, पारंपरिक ज्ञानाच्या वैज्ञानिक प्रमाणीकरणाला प्रोत्साहन मिळेल आणि आंतरराष्ट्रीय मानकीकरण उपक्रमांमध्ये भारताचे योगदान वाढेल.

गुणवत्ता हा विश्वासार्हतेचा पाया असून विश्वासार्हता ही जागतिक स्वीकृतीची गुरुकिल्ली असते, असे वैद्य राजेश कोटेचा यावेळी म्हणाले. या दोन संस्थांमधील भागीदारी ही एक चैतन्यशील आणि विज्ञानाधिष्ठित मानके निर्माण करण्याच्या दृष्टीने एक परिवर्तनकारी पाऊल असून त्यामुळे लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास वाढीला लागेल, नवोन्मेषाला चालना मिळेल आणि जगभरात अनुभवांवर आधारित पारंपरिक औषधनिर्मितीमधील भारताचे  नेतृत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होईल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतींचा अंगीकार करुन आपली संशोधन परिसंस्था बळकट केली आहे, परिषदेच्या अनेक संस्था आणि प्रयोगशाळांना आधीच एनएबीएल आणि आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे, असे प्रा. (वैद्य)  रबिनारायण आचार्य म्हणाले. बीआयएस  सोबतचे हे सहकार्य संशोधनाची गुणवत्ता अधिक उंचावणे, प्रयोगशाळांतील कार्यपद्धतींचे मानकीकरण करणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित निकष विकसित करणे यांना अधिक चालना देईल असे सांगून याचा लाभ संशोधक, उद्योगक्षेत्र आणि अंतिमतः सर्वसामान्यांना होईल नागरिकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना बीआयएसचे उपमहासंचालक (मानकीकरण-2) संजय पंत म्हणाले, "हा सामंजस्य करार बीआयएससाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण हा 100 वा सामंजस्य करार असून आयुष संस्थेसोबत स्वाक्षरी केलेला हा पहिलाच करार आहे. बीआयएसने देशभरातील शंभरहून अधिक प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसोबत यशस्वी भागीदारी निर्माण केली आहे. या महाजालामध्ये सीसीआरएएसचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. सीसीआरएएसच्या शास्त्रज्ञांच्या कौशल्यामुळे मानकांची विकास प्रक्रिया मोठ्या प्रमाणात समृद्ध होईल आणि प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांची भूमिका आयुर्वेदासाठीच्या मजबूत भारतीय मानकांच्या निर्मितीला गती देईल.”

बीआयएसच्या आयुर्वेद विभागीय समितीचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी निरीक्षण नोंदवले की "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर आयुर्वेदावरील विश्वास वाढवण्यासाठी वैज्ञानिक मानकीकरण आवश्यक आहे. ही भागीदारी आयुष क्षेत्रातील गुणवत्ता हमीसाठी एक मजबूत आणि चिरस्थायी चौकट तयार करण्याकरिता संशोधनातील उत्कृष्टता आणि मानकीकरणातील कौशल्य यांना एकत्र आणते.”

मानकांच्या विकासात झालेल्या प्रगतीची माहिती देताना बीआयएसच्या आयुष विभागाचे डॉ. राघवेंद्र नाईक यांनी सांगितले की सध्या 128 भारतीय मानके आयुर्वेद विभागीय समितीच्या अखत्यारीत आहेत, तर गेल्या तीन वर्षांत आयुषच्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेली 243 मानके विकसित करण्यात आली आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की "सीसीआरएएससोबतच्या सहकार्यामुळे पुराव्यावर आधारित तसेच जागतिक स्तरावरील सुसंगत मानकांच्या विकासाला लक्षणीय गती मिळेल, ज्यामुळे आयुर्वेदाची गुणवत्ता परिसंस्था अधिक मजबूत होईल.”

बीआयएसच्या आयुष विभाग प्रमुख आणि वैज्ञानिक 'ई' सृष्टी दीक्षित; डॉ. एन. श्रीकांत, डीडीजी, सीसीआरएएस; डॉ. राघवेंद्र नाईक, संशोधन अधिकारी, आयुष विभाग, बीआयएस, यांच्यासह दोन्ही संस्थांचे अधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते. सीसीआरएएसच्या सर्व 30 संलग्न संस्था आणि केंद्रांमधील शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी हा ऐतिहासिक कार्यक्रम आभासी पद्धतीने पाहिला.

हा सामंजस्य करार भारताची प्रमुख आयुर्वेद संशोधन संस्था आणि देशाची राष्ट्रीय मानक संस्था यांच्यातील धोरणात्मक संगम दर्शवतो. वैज्ञानिक संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या मानकीकरण पद्धतींशी जोडणाऱ्या या भागीदारीमुळे गुणवत्ता हमी वाढवणे, प्रयोगशाळेची क्षमता बळकट करणे, पुराव्यावर आधारित संशोधनाला प्रोत्साहन देणे, आयुष उद्योगाला पाठिंबा देणे तसेच आयुर्वेदासाठी जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या मानकांच्या विकासात योगदान देणे अपेक्षित आहे.

 

माधुरी पांगे/भक्‍ती सोनटक्के/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2296411) अभ्यागत कक्ष : 29