वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या अध्यक्षतेखाली जयपूर इथे ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 10 व्या बैठकीचा यशस्वी समारोप


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), फोटोव्होल्टेइक्स, स्टार्टअप्स आणि वितरण या क्षेत्रांमधल्या वाढीव सहकार्याद्वारे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स उद्योग मंत्र्यांकडून संयुक्त जाहीरनामा मंजूर

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

भारताच्या अध्यक्षतेखाली आज राजस्थानमधल्या जयपूर इथे 2026 च्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 10 व्या बैठकीचा यशस्वी समारोप झाला. 'नवीन औद्योगिक क्रांतीवरील ब्रिक्स भागीदारी' (PartNIR) अंतर्गत मंत्रिस्तरीय सहभागाला मूर्त रूप देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे उद्योग मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते.

'लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता' ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या बैठकीने सदस्य देशांना औद्योगिक क्षमता बळकट करण्यासाठी, तांत्रिक परिवर्तनाचा उपयोग आणि सहकार्यात्मक कृतीसाठी मोठ्या संधी निर्माण करण्यावर विचारमंथन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या बैठकीला संबोधित करताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जयपूरमध्ये प्रतिनिधींचे स्वागत केले आणि शतकानुशतके चालत आलेली हस्तकला आणि आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या आकांक्षा यांचा सुरेख मेळ घालणारे शहर म्हणून जयपूरचे वर्णन केले.

वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत आकांक्षांचे रूपांतर व्यावहारिक नवकल्पना आणि सहकार्यामध्ये होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. ब्रिक्स देशांनी लवचिक उद्योगांची उभारणी करण्यासाठी त्यांच्या पूरक ताकदीचा उपयोग केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला आणि या सहकार्यासाठी 'पार्टएनआयआर' (PartNIR) ही मुख्य यंत्रणा म्हणून विकसित झाली असल्याचे स्पष्ट केले.

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अधिक मजबूत औद्योगिक भागीदारी वाढवण्याच्या भारताच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आणि लवचिक व सर्वसमावेशक औद्योगिक भविष्य घडवण्यात सहकार्य, नवोन्मेष आणि परस्पर विश्वासाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

 ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या दहाव्या बैठकीचा संयुक्त जाहीरनामा स्वीकारणे, हा या बैठकीचा एक प्रमुख निष्कर्ष होता. हा जाहीरनामा केवळ संवादाच्या पलीकडे जाऊन उद्योग बळकट करणाऱ्या आणि जीवनमान उंचावणाऱ्या सहकार्यात्मक व्यावहारिक साधनांच्या अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या सदस्य देशांच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

या बैठकीदरम्यान, ब्रिक्स सदस्य देशांचे उद्योग मंत्री आणि शिष्टमंडळाच्या प्रमुखांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठीचे प्रमुख धोरणात्मक उपक्रम, प्राधान्यक्रम आणि उपलब्धी यांवर प्रकाश टाकत आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सामायिक केले. औद्योगिक क्षमता बळकट करणे, डिजिटल आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देणे, लवचिक व सर्वसमावेशक औद्योगिक परिसंस्था जोपासणे आणि सामायिक विकास आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य वाढवणे याविषयीची सामूहिक वचनबद्धता या निवेदनांमधून अधोरेखित करण्यात आली. ब्रिक्स सदस्यांमध्ये व्यावहारिक सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता निर्माण आणि औद्योगिक नवोन्मेष पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून 'पार्टएनआयआर'च्या (PartNIR) महत्त्व सदस्य देशांनी अधोरेखित केले.

राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2295787) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी