शिक्षण मंत्रालय
सरकारी शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल शिक्षण
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
'सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांमध्ये विविध महत्त्वाची कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता, डिझाइन थिंकिंग, सर्वसमावेशक आरोग्य, सेंद्रिय जीवनशैली, पर्यावरण शिक्षण, जागतिक नागरिकत्व शिक्षण यांसारख्या समकालीन विषयांचा समावेश करून एकात्मिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय उपक्रम हाती घेतले जातील', असे राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 मध्ये अधोरेखित केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 मध्ये असे अधोरेखित केले आहे की 'सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांमध्ये विविध महत्त्वाची कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), डिझाइन थिंकिंग (Design Thinking), सर्वसमावेशक आरोग्य (Holistic Health), सेंद्रिय जीवनशैली (Organic Living), पर्यावरण शिक्षण (Environmental Education), जागतिक नागरिकत्व शिक्षण (Global Citizenship Education - GCED) यांसारख्या समकालीन विषयांचा समावेश करून एकात्मिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय उपक्रम हाती घेतले जातील'.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या परिच्छेद क्रमांक 4.25 मध्ये अशीही शिफारस करण्यात आली आहे की, 'कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा सायन्स इत्यादींचा समावेश असणाऱ्या भविष्यातील अनेक नवोदित क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये भारताची भूमिका आणि नेतृत्व महत्त्वाचे असेल, ज्यासाठी गणित आणि गणितीय विचार अत्यंत आवश्यक ठरतील, ही गोष्ट मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत टप्प्यापासूनच शालेय शिक्षणाच्या सर्व वर्षांमध्ये विविध नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे गणित आणि संगणकीय विचारप्रणालीवर अधिक भर दिला जाईल. यामध्ये गणितीय विचार अधिक आनंददायी व आकर्षक बनवण्यासाठी कोडी आणि खेळांचा नियमित वापर समाविष्ट असेल. तसेच मध्य टप्प्यात कोडिंगशी संबंधित उपक्रमांची ओळख करून दिली जाईल'.
'विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी जागतिक स्तरावर गणितीय शिक्षणाला यापूर्वी कधीही इतके महत्त्व नव्हते, असे शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा' (NCF SE) 2023 मध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. गणित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता , मशिन लर्निंग, डेटा सायन्स, क्लायमेट मॉडेलिंग, पायाभूत सुविधांचा विकास आणि आज भारत तसेच जगभरातील इतर राष्ट्रांसमोर असलेल्या इतर अनेक संबंधित वैज्ञानिक मुद्यांमधील जवळचा संबंध गणिताला शालेय शिक्षणातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र बनवतो.
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि बिग डेटा ॲनालिटिक्स व व्हिज्युअलायझेशन यांसारख्या तंत्रज्ञानाचा उदय शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण अनुप्रयोगांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. अध्यापन-अध्ययन आणि मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षकांची पूर्वतयारी आणि व्यावसायिक विकासाला पाठबळ देण्यासाठी, शैक्षणिक पोहोच वाढवण्यासाठी तसेच शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन अधिक सुटसुटीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा सायन्स, तसेच इमर्सिव्ह (AR/VR/व्हर्च्युअल लॅब्ज), परस्परसंवादी आणि गेमिफाइड सामग्रीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अगणित शक्यता उपलब्ध आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता व्यक्तिगत अध्ययन, बुद्धिमान मूल्यमापन, ऍडाप्टिव्ह इन्स्ट्रक्शन आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला सक्षम करून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे 21 व्या शतकातील एक गतिमान आणि धोरणात्मक तंत्रज्ञान असल्याचे विचारात घेऊन, भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्या माध्यमातून संगणकीय विचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा शालेय शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यासाठी पावले उचलली आहेत.
त्यानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने(NCERT) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तिसरी ते आठवीच्या वर्गांसाठी संगणकीय विचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा एक विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. नववी ते बारावीच्या वर्गांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याच्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम तर्कशुद्ध विचार, नमुने ओळखणे, अल्गोरिदमची रचना आणि डेटा साक्षरता वाढवण्यावर भर देतो, तसेच जबाबदार व नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या महत्त्वावरही भर देतो. समस्या निवारण, सर्जनशीलता आणि नवकल्पना यांचा मेळ घालून हा आराखडा संगणकीय विचाराला पायाभूत क्षमता म्हणून स्थान देतो, ज्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण आधारित आहे; ज्यामुळे सर्व वर्गांमध्ये वयानुसार योग्य आणि अर्थपूर्ण प्रगती सुनिश्चित होते.
अध्यापन प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी, शिक्षक हस्तपुस्तिका आणि मार्गदर्शिका तयार करण्यात आल्या असून त्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (https://cbseacademic.nic.in/skilleducation.html) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा विचार केला तर, शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा स्पष्ट उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे आणि हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा पायाभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे शाळांसाठी बंधनकारक आहे. याशिवाय, मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना मंडळाच्या संलग्नता उपविधींनुसार डिजिटल पायाभूत सुविधा योग्य स्थितीत ठेवाव्या लागतात.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने 'सोअर' (Skilling for AI Readiness) हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये (इयत्ता 6 वी ते 12 वी) कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागरूकता व पायाभूत कौशल्ये निर्माण करणे आणि शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता वाढवणे हा आहे. 'सोअर' मध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांचे 15-15 तासांचे मॉड्यूल समाविष्ट आहेत—'एआय टू बी अवेअर', 'एआय टू ॲक्वायर' आणि 'एआय टू एस्पायर'—तसेच शिक्षकांसाठी 'एआय फॉर एज्युकेटर' नावाचे एक स्वतंत्र 45 तासांचे मॉड्यूल आहे. हा कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत माहिती, जनरेटिव्ह एआय, दैनंदिन जीवनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामिंगची मूलतत्त्वे, नीतीमूल्ये, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील करिअरच्या संधी यासारख्या संकल्पनांची ओळख करून देतो.
याशिवाय, शिक्षण हा संविधानाच्या समवर्ती सूचीतील विषय आहे आणि बहुतांश शाळा या राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अखत्यारित येतात. त्यानुसार, त्यांच्या अखत्यारीतील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रयोगशाळांची स्थापना करण्याची जबाबदारी संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारांची आहे.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295258)
आगंतुक पटल : 9