संरक्षण मंत्रालय
भावी युद्धतंत्र या तिन्ही सैन्यदलांसाठीच्या अभ्यासक्रमाच्या चौथ्या आवृत्तीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन.एस.राजा सुब्रमणी यांनी केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2026 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
भावी युद्धतंत्र या तिन्ही सैन्यदलांसाठीच्या अभ्यासक्रमाच्या चौथ्या आवृत्तीला नवी दिल्लीतील माणेक शॉ केंद्रात 3 ऑगस्ट 2026 रोजी सुरुवात झाली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन.एस.राजा सुब्रमणी यांनी या कार्यक्रमाच्या उदघाटन सत्रात बीजभाषण केले.
युद्धतंत्राचे बदलते स्वरुप आणि लष्करी कारवायांवर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. भविष्यात येणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा आधीच अंदाज घेणे अतिशय आवश्यक असून अनेक आघाड्यांवर परिणामकारक प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
भविष्यातील संघर्षांना तोंड देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सज्ज क्षमता, स्वायत्त यंत्रणा, माहितीपूर्ण युद्धतंत्र, अंतराळ तंत्रज्ञान आणि डेटा चलित निर्णय घेणे या घटकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी सशस्त्र दल, उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि संशोधक समुदाय यांच्यात अधिक समन्वय, एकात्मता आणि सहकार्य असण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
मुख्यालय एकात्मिक संरक्षण दल (HQ IDS) द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार आठवड्यांच्या या कार्यक्रमात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी, तसेच शासकीय संस्था, शिक्षण संस्था, उद्योग आणि धोरणात्मक संस्थांमधील तज्ञ एकत्र आले आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेले प्रतिनिधी भु-राजकीय परिस्थिती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संज्ञानात्मक आणि सायबर युद्ध, बहु-आयामी लष्करी कारवाया, विविध संभाव्य परिस्थितींचे नियोजन आणि तंत्रज्ञान-सक्षम युद्ध इत्यादी विषयांवर विचारविनिमय करणार आहेत.

माधुरी पांगे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294118)
आगंतुक पटल : 8