दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्वाल्हेरमधील दूरसंचार उत्पादन क्षेत्रासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याकरिता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत गुंतवणूकदार मेळाव्याचे करणार आयोजन


भारतातील पहिले टीएमझेड 10,000 कोटी रुपये मूल्याच्या गुंतवणुकीच्या शोधात, मुंबईतील गुंतवणूकदार मेळावा गुंतवणुकीला गती देण्यास सज्ज

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 8:03PM by PIB Mumbai

मुंबई, 3 ऑगस्ट 2026 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे भारताच्या पहिल्या दूरसंचार उत्पादन क्षेत्राच्या (टीएमझेड) शुभारंभाला मिळालेल्या गतीचा फायदा घेत केंद्रीय संचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य माधवराव शिंदे हे 4 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल आणि मध्य प्रदेश सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई यांच्यासमवेत 'दूरसंचार उत्पादन क्षेत्र गुंतवणूकदार मेळाव्या'चे आयोजन करणार आहेत. भारत सरकारचा दूरसंचार विभाग आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात 30 जुलै 2026 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून ग्वाल्हेरमध्ये भारताच्या पहिल्या टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन (टीएमझेड) चा ऐतिहासिक शुभारंभ झाल्यानंतर लगेचच मुंबईत हा पहिला रोडशो आणि गुंतवणूकदार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

टीएमझेडच्या शुभारंभापाठोपाठ राष्ट्रीय राजधानीत पहिली गुंतवणूकदार गोलमेज परिषद पार पडली. मंत्री शिंदे यांनी घोषणा केली की 3,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची हमी मिळाली असून यातून रोजगाराच्या जवळपास 14,000 संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून भारताच्या वाढत्या दूरसंचार उत्पादन परिसंस्थेवरील उद्योग जगताचा प्रबळ विश्वास दिसून येतो. मुंबई गुंतवणूकदार मेळावा आणि रोडशो म्हणजे भारताच्या पहिल्या दूरसंचार उत्पादन क्षेत्रासाठी अधिक औद्योगिक सहभाग आणि गुंतवणूक एकत्रित करण्याच्या राष्ट्रीय उपक्रमाचा पुढील टप्पा आहे. देशात जागतिक दर्जाची दूरसंचार उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने यात आघाडीचे दूरसंचार उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या, पायाभूत सुविधा पुरवठादार, घटक उत्पादक आणि गुंतवणूकदार एकत्र येतील. भारताच्या पहिल्या दूरसंचार उत्पादन क्षेत्रातील अपेक्षित गुंतवणूक 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल, अशी अपेक्षा आहे.

भारताच्या पहिल्या दूरसंचार उत्पादन क्षेत्राची स्थापना म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत'ची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उत्पादन, संशोधन आणि विकास, आरेखन, चाचणी आणि नवोन्मेष यासाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करून देशांतर्गत मूल्य साखळी मजबूत करणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे, निर्यातीला चालना देणे तसेच भारताला दूरसंचार उत्पादने व अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी एक विश्वसनीय जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे, हे या टीएमझेडचे उद्दिष्ट आहे.

उद्घाटनपर गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत उद्योगाकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादाने या उपक्रमाची परिवर्तनकारी क्षमता अधोरेखित केली. आघाडीच्या कंपन्या आणि दूरसंचार उद्योगातील अनेक नेत्यांनी या प्रकल्पासाठी भरीव गुंतवणुकीची वचनबद्धता दर्शवली, ज्यामुळे भारताच्या धोरणात्मक चौकटीवरील आणि उत्पादन क्षमतेवरील त्यांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला.

मुंबई गुंतवणूकदार मेळाव्यामुळे औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होण्याची तसेच नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दूरसंचार उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या आणि भारताला दूरसंचार उत्पादन व नवोपक्रमासाठी एक प्रमुख जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल.

या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योगपती, गुंतवणूकदार आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हितसंबंधी एकत्र येणार आहेत.

माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(रिलीज़ आईडी: 2294030) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी