संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या कमांड रुग्णालयातील (सेंट्रल कमांड) लष्करी वैद्यकशास्त्र विभागाचे आभासी पद्धतीने उद्घाटन
हा विभाग देशासाठी एक महत्वाचे संशोधन आणि विकास केंद्र म्हणून, तसेच उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाची सज्जता वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल : राजनाथ सिंह
प्रविष्टि तिथि:
29 JUL 2026 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,29 जुलै 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, दि. 29 जुलै 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या कमांड रुग्णालयात (सेंट्रल कमांड) लष्करी वैद्यकशास्त्र विभागाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे लष्करी वैद्यकशास्त्रावर भर असलेल्या देशातील पहिल्या समर्पित शैक्षणिक आणि कार्यान्वयनविषयक विभागाच्या स्थापनेचे उद्दिष्टही साध्य झाले आहे. युद्धाच्या काळात वैद्यकीय सज्जता वाढवणे, संशोधनाला चालना देणे, स्वदेशी वैद्यकीय सिद्धांत विकसित करणे तसेच भविष्यातील युद्धभूमीवरील आणि आपत्कालीन परिस्थितीतील मानवतावादी सहकार्यासाठी विशेष तज्ज्ञतेची जडणघडण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. लष्कराच्या वैद्यकीय सेवा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाअंतर्गत या विभागाची स्थापना केली गेली आहे. या विभागाच्या स्थापनेमुळे सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांविषयक कार्यान्वयनातील वैद्यकीय सज्जतेला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. आर्थिक आणि सामाजिक विकास हे राष्ट्रउभारणीचे आवश्यक पैलू असतात, मात्र त्याचवेळी त्या त्या देशाच्या सैन्याची ताकद आणि त्यांची मानसिक क्षमता हाच कोणत्याही देशाचे सार्वभौमत्व आणि प्रगतीचा मूळ पाया असतो असे ते म्हणाले. या लष्करी वैद्यकशास्त्र विभागामुळे सैनिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळतील हे सुनिश्चित होईल, आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेलाही अधिक बळकटी मिळेल, यासोबतच गरजेच्या वेळी आपल्याला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार आणि पाठबळ मिळणार असल्याच्या जाणीवेने सैनिकांमधील विश्वासही उंचावेल असे ते म्हणाले.
या विभागाअंतर्गत लष्करी आघात आणि नुकसानीवरील नियंत्रण, युद्ध मानसशास्त्र आणि लवचिकता, पर्यावरणीय आणि कार्यान्वयनविषयक वैद्यकशास्त्र, लष्करी वैद्यकीय रसद पुरवठा व्यवस्थापन, रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी, आण्विक आणि स्फोटांच्या (CBRNe - Chemical, Biological, Radiological, Nuclear & Explosive) परिस्थितीतील वैद्यकीय प्रतिसाद, आणीबाणीच्या काळातील वैद्यकशास्त्र तसेच आपत्कालीन परिस्थितीतील अतिदक्षता, आपत्ती वैद्यकशास्त्र आणि मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारण, तसेच संशोधन, परीक्षण आणि माहितीसाठ्याचे विश्लेषण यांसारख्या प्रमुख विषयांवर भर दिला जाणार आहे. यासोबतच तंत्रज्ञानावर आधारित प्रत्यक्ष युद्धभूमीवरील औषधोपचार पद्धती, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण, दूरसंवादी वैद्यकीय उपचार (टेलिमेडिसिन), प्रत्यक्ष आपत्कालीन ठिकाणावरची दीर्घकालीन सेवा आणि वैद्यकीय निर्णयांसाठीचे पाठबळ या आणि अशा क्षेत्रांतील नवोन्मेषालाही या विभागामुळे मोठी चालना मिळणार आहे.

हा विभाग टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महत्वाच्या घटकांच्या स्थापनेदरम्यान शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यावर भर दिला जाईल. त्यानंतर मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी, आण्विक आणि स्फोट परिस्थितीविषयक वैद्यकशास्त्रातील उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. या सगळ्या माध्यमातून अंतिमतः टप्प्यात लष्करी वैद्यकशास्त्रासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त केंद्र म्हणून या विभागाला ओळख मिळवून दिली जाईल.
यावेळी राजनाथ सिंह यांनी लष्करी वैद्यकशास्त्राचे वाढते महत्त्वही अधोरेखित केले. ज्याप्रमाणे अंतराळ वैद्यकशास्त्राअंतर्गत हे पृथ्वीच्या कमी उंचीच्या कक्षेत वैमानिक आणि अंतराळवीरांना येणाऱ्या आव्हानांचा अभ्यास केला जातोत, त्याचप्रमाणे लष्करी वैद्यकशास्त्रातही युद्ध आणि युद्धासारख्या परिस्थितींमध्ये मानवी शरीराला सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक आणि मानसिक ताणाचा अभ्यास केला जाईल असे त्यांनी सांगितले. आपले सैनिक जगातील काही अत्यंत आव्हानात्मक भागांत आणि प्रतिकूल हवामानात तैनात असतात, तिथे त्यांना विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या नवीन विभागाच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या कार्यान्वयनात्मक परिस्थितीत उपयुक्त ठरतील अशी विशेष वैद्यकीय मानक नियमावली आणि कार्यपद्धती विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारंपरिक शस्त्रास्त्रांसोबतच आधुनिक काळात महासंहारक शस्त्रास्त्रांचा धोका कायम असल्याची बाबही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केली. अशा परिस्थितीत,एक संशोधन आणि विकास केंद्र म्हणून हा विभाग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे, तसेच तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने देशाची सज्जता वाढणार आहे असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291235)
आगंतुक पटल : 8