राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित ‘प्रारंभ’ या दोन दिवसीय अभिमुखता कार्यशाळेत केले समारोपाचे भाषण
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2026 7:24PM by PIB Mumbai
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी रविवार 26 जुलै 2026 रोजी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय ‘प्रारंभ’ या अभिमुखता कार्यशाळेत समारोपाचे भाषण केले. राज्यसभेच्या नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांसाठी आयोजित केलेला हा दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम, सदस्यांना सभागृहाचे नियम, कार्यपद्धती, संकेत आणि परंपरा यांची ओळख करून देण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आला होता, असे हरिवंश यांनी सांगितले. या कार्यक्रमातील मार्गदर्शनामुळे नवनिर्वाचित सदस्य सभागृहात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी सक्षम बनतील, असेही ते म्हणाले.
अभिमुखता कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी समारोपाचे भाषण करताना हरिवंश यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमाने नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय कामकाजातील बारकावे आणि राज्यसभा सचिवालयाच्या विविध पैलूंशी परिचित होण्यास मदत केली आहे, असेही ते म्हणाले.
सदस्यांना कार्यपद्धतीचे नियम आणि सचिवालयाच्या कामकाजाची सखोल माहिती मिळावी याकरिता हा कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता, असे ते म्हणाले. वरिष्ठ सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या सादरीकरणातून संसदीय कार्यपद्धतीची माहिती वस्तुनिष्ठ आणि वास्तविक जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आली असून या अनुभवाचा सदस्यांना निःसंशयपणे फायदा झाला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
संसदीय कामकाजावर झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीच्या प्रभावावर प्रकाश टाकताना हरिवंश म्हणाले की, मोठ्या प्रमाणावरील डिजिटायझेशनमुळे सभागृह अधिकाधिक कागदविरहित आणि कार्यक्षम बनले आहे. सर्व सदस्यांना डिजिटल उपकरणे पुरवण्यात आली आहेत. ही उपकरणे सायबर हल्ले आणि अनधिकृत प्रवेशापासून संरक्षित केली पाहिजेत आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स ही सभागृहाची मालमत्ता असून, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येक सदस्याची आहे, असेही त्यांनी नमूद केले. अभिमुखता कार्यक्रमाने सदस्यांचे शिक्षण संपत नाही आणि हा कार्यक्रम म्हणजे आत्म-सुधारणेच्या निरंतर प्रक्रियेची केवळ सुरुवात आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी सदस्यांना मागील संसदीय कार्यपद्धतींचा अभ्यास करण्याचे, उल्लेखनीय वादविवाद वाचण्याचे यासोबतच अटलबिहारी वाजपेयी, अरुण जेटली आणि चंद्रशेखर यांसारख्या नामवंत खासदारांच्या ध्वनिमुद्रित मुलाखती पाहण्याचे आणि इतर देशांतील संसदीय परंपरांचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले.


***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289697)
आगंतुक पटल : 12