संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दमण, दादरा आणि नगर हवेली तसेच दक्षिण गुजरातमधील व्यापक पूर मदत कार्यात भारतीय तटरक्षक दलाने केली 170 जणांची सुटका

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2026 12:13PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाने नागरी प्रशासनाच्या निकट समन्वयासह 22 जुलै 2026 च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या 11 बचाव मोहिमांद्वारे दमण, दादरा आणि नगर हवेली तसेच दक्षिण गुजरातच्या पूरग्रस्त भागांत अडकलेल्या 170 जणांची सुटका केली. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत प्रतिकूल हवामान अशा परिस्थितीत या मोहिमा राबवण्यात आल्या.

या बचाव कार्याची सुरुवात 22/23 जुलैच्या रात्री झाली. सुरुवातीला सिल्वासा येथील खानवेलमधून पाच जणांची सुटका करण्यात आली, त्यानंतर कडैया किनारपट्टीच्या भागात पूरग्रस्त नदीकाठावर अडकलेल्या तीन मच्छिमारांना बाहेर काढण्यात आले. सर्वात मोठ्या बचाव मोहिमांपैकी एका मोहिमेत 23/24 जुलैच्या रात्री पुरामुळे रस्ते संपर्क पूर्णपणे विस्कळीत झालेल्या वेल्सपन औद्योगिक क्षेत्रात अडकलेल्या 60 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर, एरो फायबर प्रा. लि. जवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधून सात जणांची सुटका, डोंगरीमधून दहा जणांना बाहेर काढणे, वलसाड-पर्डी परिसरातून अडकलेल्या चार जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज परिसरातून रातोरात आठ जणांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.

आणखी एका महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेत, तटरक्षक दलाने अवध सोसायटी परिसरातून दहा जणांना बाहेर काढले, यामध्ये नऊ महिन्यांची गर्भवती महिला आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या एका महिलेचा समावेश होता. या दोघींना वेळेत वैद्यकीय सेवा मिळेल, याचीही व्यवस्था करण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी 24 जुलै रोजी नवसारी जिल्ह्यातील मेंदर गावातून 33 अडकलेल्या व्यक्तींना यशस्वीरित्या बाहेर काढले. यात छातीत तीव्र वेदना होत असलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदतही पुरवण्यात आली.

मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि धोकादायक परिस्थिती असूनही, तटरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या दलाच्या 'वयम रक्षमः' (आम्ही रक्षण करतो) या ब्रीदवाक्याला जागत, बचाव कार्य अविरतपणे सुरू ठेवले.

भारतीय तटरक्षक दल नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे आणि सध्याच्या पूर परिस्थितीमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी उच्च पातळीवरील कार्यक्षम सज्जता कायम ठेवत आहे.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289339) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil