अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिसादात्मक कर प्रशासनासाठीच्या पाच आर ची मांडली रूपरेषा; नवी दिल्लीत 167 व्या प्राप्तिकर दिन समारंभात, व्यापक कर निश्चितता आणि खटले कमी करण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत आज केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयोजित केलेल्या 167 व्या प्राप्तिकर दिन समारंभात केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या.

प्राप्तिकर विभागाची भूमिका केवळ कर संकलनापुरती मर्यादित न राहता न्याय्य, कार्यक्षम, पारदर्शक आणि करदाता - केंद्री कर प्रशासन उभारण्याकडे विकसित झाली आहे, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. प्राप्तिकर अधिनियम, 2025 ची अंमलबजावणी ही एक ऐतिहासिक सुधारणा असल्याचे नमूद करत, या कायद्यामुळे कर कायदे अधिक सुलभ झाले असून अनुपालनाचा खर्च कमी झाला आहे आणि व्यवसाय सुलभता वाढली आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. तसेच, ई-फायलिंग पोर्टलची वाढलेली क्षमता, प्राप्तिकर विवरणपत्रांच्या प्रक्रियेत झालेली सुधारणा, तातडीने करण्यात येणारे परतावे आणि तक्रार निवारण व्यवस्थेतील लक्षणीय प्रगती यांचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र, केवळ तक्रारींचे निवारण करण्यापलीकडे जाऊन वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचे विश्लेषण करून प्रणालीगत सुधारणांद्वारे त्यांना प्रतिबंध करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

करदाता -केंद्री सेवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून त्यांनी प्रतिसादात्मक कर प्रशासनाच्या ‘पाच आर’ संकल्पनेची मांडणी केली. त्यामध्ये ओळख (Recognise), प्रतिसाद (Respond), निवारण (Redress), चिंतन (Reflect) आणि सुधारणा (Reform) या तत्त्वांचा समावेश आहे. प्रामाणिक करदात्यांना सुलभ सेवा, अनावधानाने झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याची संधी आणि अधिकाराचा विनम्रतेने वापर करणारे कर प्रशासन अनुभवायला मिळावे, यावर त्यांनी भर दिला. करदाते भारताच्या विकास प्रक्रियेतील भागीदार असल्याचे अधोरेखित करत, कर व्यवस्थेतील निश्चितता अधिक बळकट करून कर-संबंधित न्यायालयीन खटले कमी करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळात सातत्याने गुंतवणूक करत, कार्यप्रणालीची संस्थात्मक क्षमता वाढवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. प्राप्तिकर कार्यालये अत्याधुनिक करणे आणि कल्याणकारी सुविधा वाढवण्याचे कौतुक करत, त्यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, न्यायवैद्यक लेखापरीक्षण, आंतरराष्ट्रीय करप्रणाली, ट्रान्सफर प्राईसिंग, डिजिटल अॅसेट्स, सायबर सुरक्षा आणि नेतृत्व विकास अशा सगळ्या उदयोन्मुख क्षेत्रात क्षमता बांधणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यांनी प्राप्तिकर विभागाला स्वेच्छेने कर अनुपालन वाढवणे, करदात्यांचा अनुभव अधिक सुलभ करणे, कर व्यवस्थेतील निश्चितता अधिक बळकट करणे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे, संस्थात्मक उत्कृष्टता विकसित करणे, जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे आणि सातत्यपूर्ण सुधारणांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. प्राप्तिकर दिनाच्या 167 व्या वर्धापनदिनानिमित्त प्राप्तिकर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना, व्यवसाय सुलभता वाढवणे, करदात्यांचा विश्वास अधिक दृढ करणे आणि भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात प्राप्तिकर विभाग पुढेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***
सुषमा काणे/राधिका अघोर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2289255)
आगंतुक पटल : 10