रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गतिशक्ती विद्यापीठाचा 4 था दीक्षांत सोहळा संपन्न


बी.टेक. आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या 121 विद्यार्थ्यांना पूर्ण केला पदवी अभ्यासक्रम

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2026 8:56PM by PIB Mumbai

 

गतिशक्ती विद्यापीठाचा (GSV - Gati Shakti Vishwavidyalaya) 4 था दीक्षांत सोहळा आज दि. 17 जुलै 2026 रोजी पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. देशाचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन, वडोदराचे खासदार डॉ. हेमांग जोशी, बडोद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंग हे मान्यवर या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सोहळ्यात बी.टेक. आणि एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकूण 121 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विद्यापीठाच्या वतीने पहिल्यांदाच मेट्रो रेल्वे व्यवस्थापन या विषयातील एमबीए पदवी देखील प्रदान केली गेली. या निमित्ताने गति शक्ती विद्यापीठाने देशातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ई. श्रीधरन यांना आपली पहिलीवहिली  मानद डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D. - Doctor of Philosophy) पदवी प्रदान केली.

 

विविध अभ्यासक्रमांअंतर्गत शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विवेक यादव, संदीप पटेल, अभिनंदन गुप्ता, ऋषभ त्रिपाठी आणि सुरेश सेनगुंडरमुदलियार या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने  गौरवण्यात आले. 2026 या वर्षासाठीचा उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार दुर्गेश कुमार आणि संदीप पटेल यांना देण्यात आला, तर 2026 या वर्षासाठीचा सर्वोत्तम पदवीधर विद्यार्थी पुरस्कार विवेक कुमार याला प्रदान करण्यात आला.

किंजरापू राममोहन नायडू यांनी मुख्य अतिथी म्हणून दीक्षांत  भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी या तीन तत्वांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या थ्री एम अर्थात मूव्हमेंट, मुमेंटम आणि मिशन या तीन संकल्पनांची मांडणी केली. आपल्या भाषणातून त्यांनी देशातील वाहतूक क्षेत्रातील, विशेषतः विमान वाहतूक क्षेत्र, पीएम गति शक्ती उपक्रम याबाबतची प्रगती अधोरेखित केली. देशातील युवा वर्गासाठी संधी निर्माण करण्यात देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO - Maintenance, Repair and Overhaul) क्षेत्र कशा प्रकारची  भूमिका बजावू शकते याबाबतही त्यांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गति शक्ती विद्यापीठासोबत भागीदारी केल्यापासून अवघ्या 4 महिन्यांत तयार केलेल्या विमान देखभाल अभियांत्रिकी (एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून गति शक्ती विद्यापीठाला पूर्ण पाठबळ मिळत राहील असे आश्वासनही त्यांनी दिले. विद्यापीठाचा उद्योग क्षेत्र केंद्रित संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एक मूलभूत मापदंड प्रस्थापित करणारा दृष्टीकोन आहे अशा शब्दांत त्यांनी विद्यापीठाची प्रशंसा केली.

डॉ. ई. श्रीधरन यांनीही या सोहळ्याला संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी सातत्याने शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टिकोनासोबतच वक्तशीरपणा, नीतीमूल्ये आणि व्यावसायिक सक्षमता या मूल्यव्यवस्थेचा अंगिकार करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. युवा विद्यार्थ्यांनी समाज आणि देशाला काहीतरी परत द्यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. यासाठी प्रत्येकाकडे उत्तम चारित्र्य आणि आरोग्य असणे आवश्यक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.

राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला. पदवीधर विद्यार्थ्यांनी कायम मूल्यांशी जोडून राहायला हवे तसेच शाश्वत विकासाबाबत संवेदनशील असायला हवे असा सल्ला त्यांनी दिला. सुकरण सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चाचणी आणि परिक्षणाशी संबंधित भक्कम परिसंस्था (टेस्टिंग इकोसिस्टम) आणि त्याला अनुसरून नियमनाची गरज त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीने टाटा समूहाच्या हवाई अंतराळ क्षेत्र आणि संरक्षण उत्पादन उपक्रमांचा संदर्भही त्यांनी दिला. पदवीधर विद्यार्थ्यांनी आव्हानांचा स्वीकार करत तसेच नवोन्मेषाची कास धरत स्वतःला परिवर्तनाचे उदाहरण म्हणून घडवावे अशी प्रेरणाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2286405) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati