युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रनिर्मितीचे प्रेरक व्हा; युवा अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2026 5:35PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाच्या चौथ्या प्रादेशिक चिंतन शिबिराचा आज लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे समारोप झाला. विकसित भारतासाठी विकसित युवा या विषयाअंतर्गत देशभर आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक सल्लामसलत मालिकेचाही यानिमित्ताने समारोप झाला. समाधान से संकल्प या संकल्पनेवर केंद्रित शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवसाच्या विचारमंथनातून समोर आलेल्या कल्पना आणि शिफारशींचे युवा-केंद्रित प्रशासन बळकट करण्यासाठी तसेच तळागाळातील अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी अंमलबजावणीयोग्य धोरणांमध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला.

युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या सक्रिय सहभागासाठी प्रेरित करून देशाचे भविष्य घडविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी युवा अधिकाऱ्यांवर आहे, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री खडसे यांनी या सत्राला संबोधित करताना सांगितले. तुम्ही तळागळात काम करत असल्यामुळे तेथील आव्हानांची अधिक चांगली जाण तुम्हाला आहे, तुम्ही योग्य प्रश्न उपस्थित करता आणि त्यावर व्यावहारिक उपायही शोधता. तुमची ही बांधिलकी प्रत्येक सादरीकरणातून स्पष्टपणे दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.
तळागळात कार्यरत अधिकाऱ्यांच्या समर्पणाचे कौतुक करताना खडसे म्हणाल्या की, माय भारत, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम, पंतप्रधान इंटर्नशिप योजना आणि फिट इंडिया या उपक्रमांवरील सादरीकरणांतून तळागळातील कार्याप्रति त्यांची बांधिलकी आणि स्थानिक पातळीवरील आव्हानांची व्यावहारिक समज स्पष्टपणे दिसून आली. हे केवळ कर्तव्य नसून जबाबदारी आहे. कारकीर्द घडविण्याबरोबरच आपल्या युवकांनी देशाला पुढे नेण्याचाही विचार केला पाहिजे, भारताचे भविष्य तेच घडविणार आहेत आणि युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होण्याची संधी तुमच्यापैकी प्रत्येकाला आहे, असे त्या म्हणाल्या.

माय भारत, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम , पंतप्रधान इंटर्नशिप योजना आणि 'फिट इंडिया' यांसारख्या उपक्रमांमुळे प्रादेशिक स्तरावरील प्रभावी अंमलबजावणीमुळे धोरणांचे अधिक चांगले परिणाम साध्य होत असल्याचेही सांगत त्यांनी झालेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.
विविध मंत्रालयांकडून माय भारत सोबत भागीदारी करण्याबाबत वाढत असलेली उत्सुकता, युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी हे व्यासपीठ एक महत्त्वाचे माध्यम म्हणून उदयास आले आहे, असे युवा व्यवहार विभागाचे सहसचिव शिव रतन म्हणाले. राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक भागधारक यांच्याशी अधिक सखोल सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. अशा भक्कम भागीदारीमुळे विभागाचा जनसंपर्क आणि प्रभाव आणखी बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक राज्यासमोर स्वतःची वेगळी आव्हाने आहेत आणि प्रत्येक आव्हानासाठी त्या राज्याला अनुरूप उपाययोजनांची आवश्यकता आहे. विकसित भारत या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत राहून स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय विकसित करून तळागाळातील संघटना अधिक सक्षम करण्यावर आपला भर असला पाहिजे, असे ते म्हणाले.
माय भारतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला यांनी चिंतन शिबिरादरम्यान संबोधित करतांना अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले आणि युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. स्वयंसेवा, नेतृत्व आणि सामूहिक सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून युवकांना सक्षम बनविण्यातच माय भारतच्या यशाचे रहस्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, विविध राज्यांतील सर्वोत्तम कार्यपद्धतींची प्रभावीपणे नोंद करून त्यांचा व्यापक स्तरावर विस्तार करण्यात यावा, यावरही त्यांनी भर दिला.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंतप्रधान इंटर्नशिप योजना आणि फिट इंडिया या उपक्रमांवरील तांत्रिक सत्रांनी झाली. या सत्रांमध्ये विविध विभागांमधील समन्वय आणि सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला. समारोपाच्या दिवशी विभागाच्या प्राधान्याच्या विषयांवर कार्यरत गटांनी तयार केलेल्या विषयनिहाय कृती आराखड्यांचे आणि विविध प्रकरणांवरील अभ्यासांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरले. या गटांनी नशामुक्त भारत, फिट इंडिया, लिंगसंवेदनशीलता, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम , समाजाचा सहभाग वाढविणे तसेच माय भारत आणि माय भारत-राष्ट्रीय सेवा योजना अधिक सक्षम करण्याबाबतच्या शिफारशी सादर केल्या.
दोन दिवसांच्या या चिंतन शिबिरातून, तळागळात अधिक व्यापक पोहोच, संस्थांमधील अधिक समन्वय आणि सहकार्यपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून युवकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रनिर्मितीसाठी माय भारत हे व्यासपीठ आणखी सक्षम करण्याचा विभागाचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. या विचारमंथनातून समाजाशी अधिक सखोल सहभाग, वर्तनपरिवर्तनासाठी जनजागृती, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक भागधारक यांच्याशी अधिक भक्कम भागीदारी, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागळात कार्यरत अधिकाऱ्यांची क्षमता सातत्याने वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याशिवाय, प्रमुख उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यनिहाय अंमलबजावणी धोरणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींची नियमित देवाणघेवाण आणि मंत्रालय तसेच विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण संवादाची आवश्यकता असण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.
समारोप सत्रात माय भारत अंतर्गत सर्वाधिक नोंदणी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून गौरविण्यात आले. युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक नोंदणीची टक्केवारी गाठल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचाही गौरव करण्यात आला. तळागाळात प्रभावी जनसहभाग आणि व्यापक जनसंपर्क साधण्यात या केंद्रशासित प्रदेशाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे यावरून दिसून आले. चिंतन शिबिरातून पुढे आलेल्या शिफारशी भविष्यातील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरतील तसेच, विकसित भारत 2047 चा पाया म्हणून विकसित युवा घडविण्याबाबत युवा व्यवहार विभागाच्या कटिबद्धतेला अधिक बळकट करतील.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286378)
आगंतुक पटल : 23