अणुऊर्जा विभाग
भारताच्या सर्व 4 विद्यार्थ्यांनी 58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (आयसीएचओ), ताश्कंद, उझबेकिस्तान येथे जिंकली सुवर्णपदके
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2026 1:35PM by PIB Mumbai
मुंबई, 19 जुलै 2026
उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे 10 ते 19 जुलै 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (आयसीएचओ) 2026 मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली असून, भारताच्या चारही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.
हे विद्यार्थी आहेत:
• भुवनेश्वर, ओडिशा येथील देबदत्त प्रियदर्शी (सुवर्ण)
• मंडी गोबिंदगड, पंजाब येथील हर्षित सिंगला ( सुवर्ण )
• दिल्ली येथील कबीर चिल्लर ( सुवर्ण )
• हैदराबाद, तेलंगणा येथील संदीप कुची ( सुवर्ण )
भारताकडून चार परीक्षक सदस्य सहभागी झाले होते: प्रा. सुभजित बंडोपाध्याय – मुख्य मार्गदर्शक,डॉ. इंद्राणी सेन (एचबीसीएसइ, मुंबई) – मार्गदर्शक, डॉ. अनुबेंदू अधिकारी (आयआयटी खरगपूर) आणि डॉ. जयश्री गोपालकृष्णन (एनईएस रत्नम कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई) – वैज्ञानिक निरीक्षक
देशनिहाय पदक क्रमवारीत भारत चीन, व्हिएतनाम आणि वैयक्तिक सहभागी गट ब (रशिया) यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. यावर्षीच्या आयसीएचओमध्ये 93 देशांतील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आयसीएचओ स्पर्धा ठरली. आयसीएचओ मधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी असून, प्रथमच भारताने सर्व सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम केला आहे.
या स्पर्धेत प्रायोगिक आणि सैद्धांतिक असे दोन्ही प्रकारचे घटक होते.
सैद्धांतिक परीक्षेत 9 प्रश्नांचा समावेश होता. यामध्ये वनस्पतींच्या अर्कांपासून तयार केलेल्या निळ्या द्रावणाची आणि कोळशाच्या खाणीतील पिवळ्या दगडाची (जो अविसेन्ना यांच्या प्रयोगशाळेतही आढळल्याचे सांगितले जाते) रचना ओळखणे; दोलायमान बीझेड अभिक्रियेचा गतिशास्त्रीय अभ्यास; विविध कार्यशील सेंद्रिय संयुगांच्या साहाय्याने छिद्रयुक्त संरचना सामग्री (सीओएफएस) तयार करणे; उर्टबुलक येथील नैसर्गिक वायूच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1966 मध्ये करण्यात आलेल्या ऐतिहासिक स्फोटात वापरण्यात आलेल्या युरेनियमच्या वस्तुमानाचा अंदाज लावणे; चार एकसारख्या मेदाम्ल अवशेषांचा समावेश असलेल्या चिरल कार्डिओलिपिनची (फॉस्फोएस्टरचा एक प्रकार, जो पेशींमधील पडद्याचा भाग असतो) रचना उलगडणे; मॅक्रोसायक्लिक धातू संकुलाच्या मदतीने नवीन कार्बन रूपे सायक्लोकार्बन्स स्थिर करून त्यांचा वापर नॅनो आकाराच्या आण्विक पट्ट्या तयार करण्यासाठी करणे; संक्रमण धातू उत्प्रेरकांच्या साहाय्याने अमोनिया उत्पादन केंद्रांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण; कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रकाशसंवेदी घटकांचा वापर करून वातावरणातील सीओटूचे उत्प्रेरकाद्वारे अपचयन; तसेच सायक्लोडेक्स्ट्रिनच्या कृत्रिम अनुरूप संयुगांच्या अभिक्रियांचा समावेश होता. या प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांची त्रिमितीय रासायनिक रचना आणि विशिष्ट स्थानिक रूपांतरणे समजून घेण्याची क्षमता तपासण्यात आली.
प्रायोगिक परीक्षेत 3 प्रश्नांचा समावेश होता:
(i) दिलेल्या (अज्ञात अभिक्रियाशील पदार्थांचा वापर करून) धातू संकुलाचे संश्लेषण करणे आणि गुणात्मक विश्लेषण व कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनद्वारे त्याची रचना तपासणे.
(ii) ग्लुकोज, युरिया, युरिक आम्ल, कोलेस्टेरॉलचे एस्टर आणि तेल यांसारख्या जैवरासायनिक पदार्थांच्या 20 मिश्रणांची दिलेल्या 5 एन्झाइम मिश्रणांच्या साहाय्याने सूक्ष्मस्तरीय चाचण्यांद्वारे ओळख करणे.
(iii) पीएच मेट्रिक टायट्रेशनद्वारे 3 आम्ल मिश्रणांची रचना ओळखणे आणि त्यानंतर पीएच मेट्रीच्या साहाय्याने दोन निर्देशक द्रावणांचे विश्लेषण करणे. यामध्ये एक नैसर्गिक निर्देशक लाल कोबीपासून तयार केलेला होता आणि दुसरा दोन निर्देशकांचे मिश्रण होता.
विद्यार्थी आणि संपूर्ण प्रतिनिधी मंडळाचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. एचबीसीएसईच्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाड कक्षाचे तसेच एचबीसीएसई येथे आयोजित अभिमुखता आणि प्रस्थानपूर्व शिबिरांमध्ये संघाची उत्तम तयारी करून घेणाऱ्या बाह्य शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या समूहाचे विशेष कौतुक करावे लागेल.
आयसीएचओ स्पर्धेतील भारताचा हा 27 वा सहभाग होता. या सर्व वर्षांमध्ये भारताच्या 32% विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, 51% विद्यार्थ्यांनी रौप्यपदके आणि 17% विद्यार्थ्यांनी कांस्यपदके मिळवली आहेत. मागील 10 सहभागांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांचे प्रमाण अनुक्रमे 43% आणि 53% राहिले आहे.
ऑलिम्पियाड कार्यक्रमाला सातत्याने भक्कम पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड संचालन समिती, शिक्षक संघटना आणि भारत सरकारच्या निधी पुरवणाऱ्या संस्था (डीएई, डीएसटी आणि एमओई) यांचे आम्ही आभार मानतो. या कार्यक्रमामुळे भारतीय प्रतिभेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी मिळते.
सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक 20 जुलै 2026 रोजी सोमवार सकाळी 11:30 वाजता एचबीसीएसई येथील व्ही. जी. कुलकर्णी सभागृहामध्ये अनौपचारिक संवादासाठी उपलब्ध असतील.

***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286348)
आगंतुक पटल : 31