आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन संदर्भातील दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा बैठक यशस्वीरीत्या पूर्ण ; केंद्र आणि राज्यांनी केला आरोग्य क्षेत्रातील सुधारणांच्या पुढील टप्प्यासाठी संयुक्त कृती आराखडा निश्चित
"आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन या भारताच्या आरोग्य सेवा व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून उदयास आल्या आहेत; आता डिजिटल आरोग्य उपक्रमांचा अधिक व्यापक स्वीकार आणि प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्याची गरज आहे.": केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव
Posted On:
18 JUL 2026 3:56PM by PIB Mumbai
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आज आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन यावरील दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा बैठक (चिंतन शिबिर) यशस्वीरीत्या पूर्ण केली. हे चिंतन शिबिर 17–18 जुलै 2026 दरम्यान नवी दिल्लीतील मध्य प्रदेश भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
या दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा बैठकीत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राज्य आरोग्य संस्था, विकास भागीदार तसेच इतर संबंधित हितधारकांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, अंमलबजावणीसंबंधी प्रमुख प्राधान्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील उत्कृष्ट कार्यपद्धतींचे सादरीकरण करण्यात आले आणि भारताच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांच्या पुढील टप्प्यासाठीचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला.

पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेच्या पुढील टप्प्यात, दुसऱ्या दिवशी बैठकीत आर्थिक शाश्वतता, सार्वजनिक आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आरोग्य विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तसेच संपूर्ण आरोग्य सेवा व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाला गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.
राष्ट्रीय आढावा बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन यांच्या अंमलबजावणीतील प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशांकांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा गौरव करण्यात आला. यासाठी एकूण 15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यापैकी आयुष्मान भारतबी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दोन कार्यप्रदर्शन श्रेणींमध्ये एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारोप सत्राला संबोधित करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी नमूद केले की एबी पीएम-जेएवाय आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) हे भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेचे आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी यावर भर दिला की, हे डिजिटल सार्वजनिक आरोग्य मंच जसजसे अधिक प्रगल्भ होत जातील, तसतसे संपूर्ण आरोग्य प्रणालीमध्ये त्यांचा व्यापक स्वीकार आणि प्रभावी वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डिजिटल आरोग्य सेवा आणि ॲप्लिकेशन्सचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करताना त्यांनी अधोरेखित केले की नागरिक, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि आरोग्य सुविधा या सर्वांनाच त्यांचा सारख्या प्रमाणात उपयोग व्हावा यादृष्टीने त्यांची रचना केली तर या उपक्रमांचे खरे मूल्य साध्य होईल. डिजिटल आरोग्य परिसंस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी डेटा गोपनीयता, सायबर सुरक्षा आणि आरोग्यविषयक डेटाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी जोर दिला.

एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम अंतर्गत वित्तीय व्यवस्थापनावरील चर्चेत निधीचा प्रभावी वापर करणे, आर्थिक नियोजन सुधारणे आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून अनुदानाचे वेळेवर वितरण व वापर सुनिश्चित करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारित अनुदान-सहाय्य मार्गदर्शक तत्त्वे, निधी व्यवस्थापन पद्धती आणि आर्थिक उत्तरदायित्व वाढवण्याच्या उपायांवर सहभागींनी विचारमंथन केले.

या बैठकीत सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या आरोग्यसेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावरही चर्चा झाली. यावेळी सर्वम या एआय टूलचा वैद्यकीय निर्णय प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी, आरोग्य प्रणालीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच अधिक नागरिक-केंद्रित आरोग्यसेवा देण्यासाठी उदयोन्मुख एआय-सक्षम उपाययोजना सादर केल्या. भारताची डिजिटल आरोग्य परिसंस्था मजबूत करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा जबाबदारीने, सुरक्षितपणे आणि मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याच्या महत्त्वावर सहभागींनी भर दिला.
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2286098)
अभ्यागत कक्ष : 67