ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद: बंगळुरूमध्ये मानक संस्थांच्या दोन दिवसीय बैठकीला प्रारंभ
मानकीकरणातील सहकार्यासाठीच्या सामंजस्य करारावर एकमत
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2026 4:30PM by PIB Mumbai
जागतिक आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत भारताने आज बंगळुरू येथे आपल्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मानक संस्थांच्या (एनएसबी) प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन केले. ही उच्चस्तरीय बैठक उदयोन्मुख बाजारपेठांच्या गुणवत्ता पायाभूत सुविधांमध्ये सुसंवाद साधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यायोगे मानकीकरणातील सहकार्यासाठी एका नवीन सामंजस्य करारावर (एमओयू) एकमत झाले आहे.

प्रतिनिधी मंडळाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी’ या व्यापक संकल्पनेअंतर्गत ‘जागतिक हितासाठी’ भारताची कटीबद्धता असल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले, “सर्व देशांच्या विविध गरजा आणि विकासात्मक प्राधान्यक्रम विचारात घेऊन सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सहमती-आधारित प्रक्रियेद्वारे मानके विकसित केली जावीत, असा भारताचा ठाम विश्वास आहे.” त्यांनी भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) मजबूत संस्थात्मक पायाची प्रशंसा केली आणि नमूद केले की भारताचे वाढते नैपुण्य देशाला आंतरराष्ट्रीय ज्ञान वाटपामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम करीत आहे. जागतिक व्यापार आणि शाश्वतता यातील मानकीकरणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुनरुच्चार केला.
मैलाचा दगड ठरलेला यशाचा टप्पा: मानकीकरण सामंजस्य करारावर एकमत
दिवसाच्या कामकाजातील एक प्रमुख यश म्हणजे ब्रिक्स राष्ट्रीय मानक संस्थांमध्ये मानकीकरण क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराच्या मसुद्यावर झालेली एकमताची सहमती. प्रतिनिधींनी या कराराला एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून मान्यता दिली, ज्यामुळे गुणवत्ता पायाभूत सुविधा मजबूत होतील, ग्राहक संरक्षण वाढेल, व्यापारातील तांत्रिक अडथळे कमी होतील आणि आयएसओ व आयईसी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत गटाचा सामूहिक सहभाग अधिक दृढ होईल.
मानकीकरण क्षेत्रातील सहकार्यासाठी आपली सामूहिक वचनबद्धता दर्शवत बहुसंख्य ब्रिक्स सदस्य देशांच्या राष्ट्रीय मानकीकरण मंडळांनी (एन एस बी) बैठकीदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उर्वरित राष्ट्रीय मानकीकरण मंडळांनी आवश्यक राष्ट्रीय-स्तरीय मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
ब्रिक्स आता जगातील आघाडीच्या उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांना एकत्र आणते, जे जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे 49.5%, जागतिक जीडीपीच्या 40% आणि जागतिक व्यापाराच्या 26% प्रमाणाचे प्रतिनिधित्व करतात. या गटातील मानकांचे सुसूत्रीकरण जागतिक स्तरावरील परिवर्तनकारी आर्थिक लाभांचे आश्वासन देते.

पुढील वाटचाल: एआय मानकांचे भविष्य
ब्रिक्स राष्ट्रीय मानक संस्थांच्या प्रमुखांची बैठक 17 जुलै, 2026 रोजीही सुरू राहील, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेतील (एआय) मानकीकरणावरील बहुप्रतिक्षित विषयात्मक कार्यशाळेचा समावेश असेल.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285562)
आगंतुक पटल : 9