पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 17 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार
पंतप्रधान सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा करणार शुभारंभ
पंतप्रधान जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण
पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार
ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन्सपैकी एक आहे
हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी ही गाडी शून्य कार्बन उत्सर्जन सुनिश्चित करते आणि यात जल बाष्प हे एकमेव उप-उत्पादन (बाय-प्रॉडक्ट) आहे
पंतप्रधान कुरुक्षेत्र येथे शीख गुरूंचा वारसा आणि शीख संस्कृतीला समर्पित असलेल्या शीख संग्रहालयाची पायाभरणी करणार
पंतप्रधान चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण
पंतप्रधान चंदीगड मधील पीजीआयएमईआर येथे 'प्रगत माता आणि शिशु केंद्र ' आणि 'प्रगत न्यूरोसायन्सेस सेंटर'चे करणार उद्घाटन
पंतप्रधान दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे 'प्रवेश -नियंत्रित ' असलेल्या पॅकेज 1 ते 6 चे करणार लोकार्पण
पंतप्रधान जालंधरमध्ये 5,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
पंतप्रधान 20 राज्यांमधील पुनर्विकसित 75 'अमृत भारत' रेल्वे स्थानकांचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै 2026 रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास, जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 च्या सुमारास, जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील .
त्यानंतर, पंतप्रधान चंदीगडला जातील, तिथे दुपारी 1:45 च्या सुमारास ते 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
त्यानंतर, पंतप्रधान जालंधरला भेट देतील, तिथे ते 5,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.
जिंदमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन-संचालित रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. भारतातच आरेखन आणि विकसित केलेली ही रेल्वेगाडी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली असून, ती प्रगत रेल्वे अभियांत्रिकीमधील देशाची वाढती क्षमता दर्शवते. या गाडीमुळे, हायड्रोजन-संचालित रेल्वेगाड्या कार्यान्वित असलेल्या मोजक्या देशांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे.
ही रेल्वेगाडी 'हायड्रोजन फ्युएल सेल' तंत्रज्ञानावर चालते, जे गाडीला गती देण्यासाठी हायड्रोजनचे रूपांतर विजेमध्ये करते. या प्रक्रियेत पाण्याची वाफ उप-उत्पादन म्हणून बाहेर पडते, परिणामी गाडीच्या संचालनादरम्यान कार्बनचे उत्सर्जन शून्य राहते. डिझेल गाड्यांच्या तुलनेत, या गाड्यांमुळे धुराद्वारे होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील तसेच त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होते, शिवाय त्या धावताना खूपच कमी आवाज करतात. पारंपरिक वीजेवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणे यांना सततच्या ओव्हरहेड वीजपुरवठ्यासाठीच्या वीजवाहिन्यांच्या पायाभूत सुविधांची गरज नसते, कारण यात हायड्रोजन फ्युएल सेल्सद्वारे गाडीमध्येच वीज निर्माण केली जाते. यामुळे हा एक स्वच्छ आणि कार्यक्षम पर्याय ठरतो. हरित हायड्रोजन'च्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पांमधून मिळणाऱ्या विजेवरील अवलंबित्वही कमी होते, ज्यामुळे भारताच्या शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे सुरु असलेल्या प्रवासाला मदत मिळते.
भारताच्या या हायड्रोजन ट्रेनमध्ये 10 डब्यांची रचना आहे, ज्यामुळे ती आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या सर्वात लांब हायड्रोजन-चालित प्रवासी गाड्यांपैकी एक ठरली आहे. तिला 3,200 अश्वशक्ती क्षमतेच्या प्रोपल्शन प्रणालीद्वारे चालवले जाते, ज्यामुळे ती कार्यरत असलेल्या सर्वात शक्तिशाली हायड्रोजन-चालित ट्रेनसेट्सपैकी एक बनली आहे.
पंतप्रधान हरियाणामध्ये 12,470 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीही करतील.
पंतप्रधान सुमारे 9,680 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या 157.92 किमी लांबीच्या, चार-पदरी आणि पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित असलेल्या दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेचे (पॅकेजेस 1 ते 5) लोकार्पण करतील. हा ग्रीनफील्ड कॉरिडॉर, 667 किमी लांबीच्या दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेचा एक भाग आहे. या एक्सप्रेसवेमुळे दिल्ली आणि कटरा यांच्यातील प्रवासाचा वेळ सुमारे 14 तासांवरून कमी होऊन जवळपास 6 तासांवर येईल, तसेच दिल्ली-अमृतसर प्रवासाचा वेळही सुमारे 8 तासांवरून 4 तासांवर येईल. या प्रकल्पामुळे एमएच – 44 (जीटी रोड) वरील वाहतुकीची कोंडी लक्षणीयरीत्या कमी होणे, श्री माता वैष्णो देवीकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या वाहतुकीला चालना मिळण्यासह या कॉरिडॉरच्या लगत औद्योगिक व मालवाहतूक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान एनएच -7 आणि एनएच - 344 वरील 33.81 किमी लांबीच्या, चार-पदरी आणि अंशतः प्रवेश नियंत्रित असलेल्या अंबाला-काला अंब महामार्गाचेही लोकार्पण करतील. हा महामार्ग अंबाला शहरी क्षेत्र आणि काला अंब औद्योगिक पट्टा यांच्यातील संपर्क व्यवस्था मजबूत करेल, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील रस्ते संपर्क सुधारेल, डोंगराळ भागांकडे पर्यटकांच्या प्रवास सुलभ करेल आणि काला अंब क्षेत्रातील उद्योगांसाठी मालवाहतुकीचा खर्च कमी करेल.
लोकार्पण केला जाणारा आणखी एक प्रमुख प्रकल्प म्हणजे एनएच – 352ए वरील 40.60 किमी लांबीचा जिंद-गोहाना ग्रीनफील्ड महामार्ग. या नवीन महामार्गामुळे जिंद आणि गोहाना दरम्यानचा प्रवास कालावधी सुमारे दोन तासांवरून केवळ 40 मिनिटांपर्यंत कमी होईल. याचा फायदा प्रवासी, मालवाहतूक आणि कृषीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिंद-गोहाना क्षेत्राला होईल, तसेच रोहतक, पानिपत आणि दिल्ली-एनसीआर शी असलेली संपर्क व्यवस्थाही सुधारेल.
पंतप्रधान 24.27 किमी लांबीच्या हांसी-बरवाला ब्राउनफील्ड महामार्ग प्रकल्पा'ची पायाभरणीही करतील, या प्रकल्पामध्ये सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचे पक्क्या शोल्डर्ससह (रस्त्याच्या कडेला असलेल्या पक्क्या पट्ट्यासह) 2 किंवा 4-लेनच्या मार्गात रूपांतर केले जाईल.
तसेच, पंतप्रधान कुरुक्षेत्र येथील उन्नत रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करतील. हा एक प्रमुख शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प असून, यामुळे शहरातील रेल्वे क्रॉसिंग्जवर होणारी दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी दूर होईल. या प्रकल्पामुळे वाहनांची ये-जा अधिक सुरळीत होईल, रस्ते सुरक्षा सुधारेल आणि रेल्वे व रस्ते अशा दोन्ही वाहतूक व्यवस्थांची कार्यक्षमता वाढेल.
पंतप्रधान प्रमुख वैद्यकीय संस्थाचे लोकार्पण करतील — पंडित नेकी राम शर्मा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भिवानी, महर्षी च्यवन वैद्यकीय महाविद्यालय आणि राव तुलाराम रुग्णालय, कोरिआवास, नारनौल. या संस्था हरयाणामध्ये दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देतील, एमबीबीएसच्या जागांच्या संख्येत वाढ होईल, आरोग्य सेवा तज्ज्ञ व्यावसायिकांमध्ये वाढ होईल आणि लोकांना त्यांच्या घराजवळ अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा मिळणे शक्य होईल, यामुळे राज्याची आरोग्य सेवा व्यवस्था अधिक बळकट होईल.
प्रदेशातील सांस्कृतिक पायाभूत सुविधांना अधिक समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान कुरुक्षेत्र इथे शीख वस्तूसंग्रहालयाची पायाभरणी करतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या संग्रहालयात शीख समुदायाचा इतिहास, शीख गुरुंची शिकवण, त्यांचे शौर्य, त्याग तसेच भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीमध्ये शीख समाजाचे अमूल्य योगदान प्रभावीरित्या मांडले जाणार आहे.
चंदीगढमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान 4,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. आरोग्य सेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रांशी संबंधित हे प्रकल्प आहेत.
पंतप्रधान ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (पीजीआयएमईआर), चंदीगढ इथे अत्याधुनिक माता व बाल केंद्र आणि न्यूरोसायन्सेस केंद्राचे उद्घाटन करतील.
अत्यंत जोखमीची गर्भधारणा, गंभीर आजारी नवजात शिशू तसेच विशेष उपचारांची आवश्यकता असलेल्या बालकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येईल अशी अत्याधुनिक माता व बाल केंद्राची रचना आहे. 300 खाटांची क्षमता आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र माता आणि बालकांसाठी आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात बळकट करेल. प्रदेशातील हजारो कुटुंबांना त्याचा लाभ घेता येईल.
अत्याधुनिक न्यूरोसायन्सेस केंद्रामध्ये न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, न्यूरो-क्रिटिकल केअर आणि प्रगत निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे गुंतागुंतीच्या, गंभीर न्यूरोलॉजिकल आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर आणि जागतिक दर्जाचे उपचार देता येतील. तसेच, न्यूरोसायन्सेस क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा अधिक बळकट होतील.
पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर), चंदीगढ इथे प्रधान मंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-एबीएचआयएम) अंतर्गत 150 खाटांच्या अत्याधुनिक क्रिटिकल केअर ब्लॉकची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या सुविधेमुळे आपात्कालीन परिस्थितीसाठीची सज्जता, अतिदक्षता उपचार सेवा आणि आपत्ती प्रतिसाद क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. तसेच, प्रदेशातील एकूण आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होईल.
पंतप्रधान चंदीगढमधील शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील कुरुक्षेत्र मुलांचे वसतिगृह आणि खानावळ, तसेच शासकीय महाविद्यालय, सेक्टर 46 इथे वसतिगृह भागाचे उद्घाटन आणि पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी निवासी सुविधांमध्ये सुधारणा होईल, तसेच उच्च शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येईल.
पंतप्रधान या प्रदेशातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करणार आहेत.
यामध्ये मोहाली जिल्ह्यातील आयटी सिटी ते कुराली दरम्यान उभारण्यात आलेल्या सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. हा महामार्ग या प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जात आहे. या महामार्गामुळे मोहाली, खरड (खरार) आणि कुराली यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधील संपर्क व्यवस्थाही अधिक सुलभ आणि मजबूत होणार आहे.
याशिवाय, पंतप्रधान अंबाला–चंदीगड ग्रीनफिल्ड महामार्ग (एनएच-205ए) वरील पीआर-7 स्पर मार्गाच्या पायाभरणीचाही शुभारंभ करणार आहेत. 10.3 किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफिल्ड मार्ग झिरकपूर शहरातील वर्दळीच्या भागाला वळसा घालून लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल. तसेच यामुळे झिरकपूर बायपासला चंदीगडमधील एरोसिटीशी थेट जोडणारी सुविधा निर्माण होणार आहे.
जालंधरमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम
पंतप्रधान जालंधर येथे 5,470 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमुळे प्रदेशातील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होण्याबरोबरच प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होईल आणि आर्थिक विकासालाही गती मिळेल.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या 75 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, यामध्ये जालंधर कॅन्ट रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातील 20 राज्यांमधील 75 'अमृत स्थानकांचे' उद्घाटन हा या योजनेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी ही एक योजना मानली जाते.
सुमारे 1,570 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेली ही स्थानके आता आधुनिक आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा स्वरूपात विकसित करण्यात आली आहेत. ‘विरासत भी, विकास भी' या संकल्पनेला साकार करत या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, त्यामध्ये स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यशैलीचे प्रतिबिंब जपण्यात आले आहे.
याशिवाय, नानगल धरण–तलवाडा–मुकेरियां नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या दौलतपूर चौक–कर्तोली नवीन रेल्वे मार्गाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. सुमारे 830 कोटी रुपयांच्या खर्चातून हा रेल्वे मार्ग उभारण्यात आला आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, होशियारपूर आणि उना जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे श्री आनंदपूर साहिब आणि माता चिंतपूर्णी मंदिर यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपर्यंत रेल्वे संपर्क उपलब्ध होईल, दुर्गम भागांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल आणि प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे प्रवासाची सुविधा मिळेल.
पंतप्रधान कर्तोली–अंबाला रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार आहेत. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय, अमृतसर (छेहरटा)–वाराणसी रेल्वे सेवेचा ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतील. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून देशातील दोन अत्यंत पवित्र आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होणार आहे.
राज्यातील रस्ते पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, 3,070 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान दिल्ली–अमृतसर–कटरा चारपदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या 30.9 किलोमीटर लांबीच्या पॅकेज-6 चे उद्घाटन करणार आहेत. या मार्गामुळे, विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक अधिक सुलभ आणि जलद होईल, तसेच इंधनाची बचत होऊन वाहनांच्या संचालन खर्चातही घट होण्यास मदत मिळेल.
याशिवाय, पंतप्रधान 25.2 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड दक्षिण लुधियाना बायपासच्या विकासकामाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे लुधियाना आणि भटिंडा दरम्यानचे अंतर आणि प्रवासाचा वेळ कमी होणार असून, राज्यातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांशी संपर्क व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे.
शैलेश पाटील/सुषमा काणे/राजेश शिरभाते/रेश्मा बेडेकर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285186)
आगंतुक पटल : 10