रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
उत्तर प्रदेशात वरुणा नदीच्या काठावर 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि त्याचे रॅम्प/ वर्तुळाकार वळण रस्त्यांच्या विकासाला, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (Hybrid Annuity Model) अंतर्गत आणि एकूण भांडवली खर्चासह 10,998.32 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि वरुणा नदीच्या काठाने जाणारा वाराणसी रिंग रोड याना जोडणाऱी 43.218 किलोमीटर लांबीची मार्गिका विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने 6/4 पदरी उन्नत मार्गिकांचा समावेश असून, यात, मुख्य रस्ता, उड्डाणपूल, वळण मार्ग, रॅम्प आणि सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (HAM) अंतर्गत राबवण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 10,998.32 कोटी रुपये इतका असून, यामध्ये 4,565.33 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च आणि 934.91 कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाचा समावेश आहे.
ही मार्गिका वाराणसी वाहतूक कोंडी निवारण योजनेचा एक प्रमुख भाग आहे. या मार्गिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि काशी रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान सुरळीत वाहतूक शक्य होईल. त्याचबरोबर, वाराणसी वर्तुळ मार्ग, वाराणसी विमानतळ, काशी रेल्वे स्थानक, वाराणसी सिटी रेल्वे स्थानक, वाराणसी जंक्शन, दिन दयाल उपाध्याय जंक्शन, रामनगर पोर्ट, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसीचे घाट आणि लगतचा चंदौली परिसर या ठिकाणचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.
या मार्गिकेची रचना ताशी 80 ते 100 किलोमीटर या वेगाला साजेशी करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि काशी रेल्वे स्थानक यांच्यातील प्रवासाचा वेळ 40 मिनिटांवरून 20 मिनिटांपर्यंत कमी होईल, म्हणजेच त्यात जवळपास 50 टक्क्यांची घट होईल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होऊन, रस्ते सुरक्षिततेत वाढ होईल. तसेच, वाहनांच्या चलनाचा खर्च कमी होऊन, प्रवासी आणि मालवाहतुक अधिक वेगाने आणि सुरळीतपणे होण्यास मदत होईल.
या प्रकल्पामुळे प्रादेशिक संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल. कारण, हा प्रकल्प 'पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन'च्या अनुषंगाने एका आर्थिक केंद्रापर्यंत (चंदौली सामाजिक-आर्थिक क्षेत्र), एका सामाजिक केंद्रापर्यंत (चंदौली) आणि सहा प्रमुख साखळी-पुरवठा केंद्रांपर्यंत विस्तारला जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विविध वाहतूक साधनांमधील परस्पर समन्वय वाढवेल, ज्यायोगे कृषी उत्पादने, औद्योगिक माल, बांधकाम साहित्य आणि खनिजांची कार्यक्षम वाहतूक सुलभ होईल, पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होईल आणि संपूर्ण पूर्व उत्तर प्रदेशात शाश्वत आर्थिक विकासाला चालना मिळेल.
एकंदरित, या प्रकल्पामुळे शहरात एक आधुनिक आणि प्रवेश नियंत्रित वाहतूक मार्गिका निर्माण होईल; ज्यामुळे संपर्क-सुविधा आणि विविध वाहतूक साधनांमधील समन्वय अधिक मजबूत होईल, त्यायोगे पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि वाराणसीचे रहिवासी आणि या शहराला भेट देणारे यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
या मार्गिकेचा नकाशा:

शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284980)
आगंतुक पटल : 6