विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
बीआरआयसी-टीएचएसटीआय द्वारे तिसऱ्या ‘एसवायएनसीएचएन 2026’ (SYNCHN 2026) उद्योग-संवाद कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिलची (बीआरआयसी) संस्था असलेल्या 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट' (टीएचएसटीआय) ने आज फरिदाबाद येथील 'एनसीआर बायोटेक सायन्स क्लस्टर' कॅम्पसमध्ये, एसवायएनसीएचएन 2026 (सिनर्जिस्टिक कोलॅबोरेशन इन हेल्थकेअर इनोव्हेशन) या तिसर्या वार्षिक उद्योग व्यवसाय बैठकीचे यशस्वीपणे आयोजन केले. समन्वयातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे रूपांतर रुग्णांसाठीच्या व्यावसायिक-स्तरावरील उपाययोजनांमध्ये करण्यासाठी, एक ठोस प्रक्रिया विकसित करण्याच्या उद्देशाने, या कार्यक्रमात जागतिक आरोग्य क्षेत्रातील धुरीण, जैवतंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्यम भांडवलदार, स्टार्टअप्स आणि धोरणकर्ते एकत्र आले.
प्रमुख पाहुण्या आणि बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. किरण मुझुमदार-शॉ यांनी दृकश्राव्य माध्यमातून भाषण केले आणि जागतिक आरोग्यसेवेचे स्वरूप बदलणाऱ्या महत्त्वपूर्ण तांत्रिक बदलांची रूपरेषा मांडली:
"माझा विश्वास आहे की 21 वे शतक हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखालील जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाचे युग असेल. भारताने जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संस्था उभारल्या असल्या, तरी आपल्यासमोरील आव्हान हे कधीच विज्ञानाचे नव्हते, तर ते विज्ञानाचे प्रत्यक्ष उपायांमध्ये रूपांतर करण्याचे होते. संशोधनाला, शोधापासून ते त्याच्या व्यापारीकरणापर्यंत घेऊन जाणारी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पाडणारी परिसंस्था उभारण्यामध्ये टीएचएसटीआय सारख्या प्रगत संस्था आणि एसवायएनसीएचएन सारख्या व्यासपीठांचे महत्त्व अधोरेखित होते. जेव्हा वैज्ञानिक उत्कृष्टता सीमापार विश्वास आणि सहकार्याद्वारे उपयुक्ततेमधील उत्कृष्टतेशी जुळते, तेव्हाच त्याला मोल मिळते."
प्रतिनिधींचे स्वागत करताना, टीएचएसटीआय चे कार्यकारी संचालक प्रा. गणेशन कार्तिकेयन यांनी या परिषदेच्या धोरणात्मक वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की, 2024 मधील ' एसवायएनसीएचएन' च्या पहिल्या कार्यक्रमात 'लेटर ऑफ इंटेंट' (इरादा पत्रे) वर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, तर 2025 मधील दुसऱ्या कार्यक्रमात 19 बंधनकारक धोरणात्मक करारांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. केवळ परिणाम नव्हे, तर परिणामांप्रति असलेल्या टीएचएसटीआय च्या उत्तरदायित्वाचा प्रा. कार्तिकेयन यांनी पुनरुच्चार केला, तसेच, व्यापारीकरणातील जोखीम कमी करण्यासाठी आणि शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील निरंतर संवादाला चालना देण्यासाठी संस्थेच्या अत्याधुनिक सुविधा आणि संशोधनातील नैपुण्य याचा उपयोग करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांनी टीएचएसटीआयची मजबूत उपयोगिता क्षमता, त्याचे पूर्णपणे कार्यरत वैद्यकीय संशोधन केंद्र (एमआरसी) आणि एक्सलरेटेड प्रॉडक्टायझेशन अँड एपिडेमिक प्रिपेयर्डनेस (एपेक्स) उपक्रम अधोरेखित केला. एमआरसी कडे सुरुवातीच्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी विभाग, प्रगत सीएआर-टी सेल संशोधन विभाग आणि भारतातील पहिली 'कंट्रोल्ड ह्युमन इन्फेक्शन स्टडीज' (सीएचआयएस) सुविधा उपलब्ध आहे. एपेक्स (APEX) हे राष्ट्रीय स्तरावरील प्रायोगिक उत्पादन प्लॅटफॉर्मचा वापर करते, जे प्रमाणित संशोधन निष्कर्ष आणि उत्पादनक्षम जैविक उत्पादने यांच्यातील विद्यमान दरी वेगाने कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
या परिषदेत राष्ट्रीय आरोग्य प्रशासकांकडून महत्त्वपूर्ण धोरणात्मक अद्ययावत उपायही सादर करण्यात आले. डॉ. राजीव सिंह रघुवंशी (ड्रग्स कंट्रोलर जनरल इंडिया, सीडीएससीओ) म्हणाले की, सीडीएससीओ जैविक औषधांसाठी सक्रियपणे एक नवीन नियामक प्रणाली तयार करत असून, ती राष्ट्रीय धोरण आणि कार्यप्रणालीतील प्रवाहात बदल करण्यासाठी बिगर-सरकारी उद्योग तज्ञांना एकत्र आणते. प्रा. एम. श्रीनिवास (सदस्य, नीती आयोग) यांनी वैज्ञानिक शोधांचे रूपांतर परवडणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर अमलात आणण्यायोग्य आणि प्रत्यक्ष व्यवहारातील आरोग्यसेवा उपाययोजनांमध्ये करण्यावर भर दिला, तसेच त्यांनी प्रमुख वैद्यकीय केंद्रे आणि मुख्य संशोधन केंद्रे यांच्यात अधिक दृढ सहकार्य-साखळी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.
डीप-टेक वित्तीय क्षेत्रावर भाष्य करताना, डॉ. मनीष दिवाण यांनी स्टार्टअप्स, उद्योग आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांसाठी लाइफसायकल फंडिंगमधील अंतर भरून काढण्याला चालना देणारा प्रमुख घटक म्हणून नव्याने कार्यान्वित केलेल्या बीआयआरएसी रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन (आरडीआय) फंडवर प्रकाश टाकला. याला एका आश्वासक व्यापक आर्थिक वातावरणाची साथ लाभली आहे. अमित पांडे (आयव्हीसीए) यांनी नमूद केल्यानुसार, भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेने वार्षिक 18% इतकी उल्लेखनीय वाढ कायम राखली आहे.
एसवायएनसीएचएन 2026 मध्ये पुढील महत्वाची पॅनेल सत्रे आयोजित करण्यात आली:
|
पॅनेल / सत्र
|
महत्वाचे मुद्दे
|
|
पूर्ण अधिवेशन सत्र: जागतिक आरोग्य – विज्ञान, उत्पादन आणि भागीदारी
|
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य आणि एकात्मिक संशोधन परिसंस्था बळकट करून जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यातील भारताचा वाढता प्रभाव या चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आला. स्पर्धाक्षम उत्पादन क्षमता उभारणे, नियामक बाबी समजून घेणे, मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि लवचिक संशोधन परिसंस्था विकसित करणे यांवर भर देण्यात आला.
|
|
पॅनेल 2: सुरुवातीच्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रान्सलेशनला गती देणे – संशोधनापासून मानवावरील पहिल्या प्रयोगापर्यंत
|
शैक्षणिक यश अधिक वेगाने मानवावरील पहिल्या चाचण्यांमध्ये रूपांतरित करण्याचे मार्ग सुव्यवस्थित करणे आणि वास्तविक जगातील प्रमाणीकरणासाठी महत्त्वपूर्ण सक्षम घटक म्हणून एकात्मिक क्लिनिकल संशोधन प्लॅटफॉर्मचा उपयोग करणे.
|
|
पॅनेल 3: सेतूची उभारणी – ट्रान्सलेशनल प्लॅटफॉर्म्सची कार्यक्षमता वाढवणे
|
या चर्चा सत्रात बायोटेक स्टार्टअप्सचा विस्तार करण्यासाठी नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि ॲक्सलरेटर्स यांना एकत्र आणून व्यापारीकरणाच्या मार्गातील दरी भरून काढण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
|
दिवसाची सांगता खुल्या आणि परस्परसंवादी चर्चासत्रांनी झाली. या व्यासपीठाने उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना टीएचएसटीआय च्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली. तसेच संस्थेच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्मच्या मार्गदर्शित भेटींचे आयोजन करण्यात आले.

6CTQ.jpeg)

आशिष सांगळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284785)
आगंतुक पटल : 9