दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल विभागाची पहिल्या तिमाहीत विक्रमी 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलाची नोंद, वर्षागणिक 22% वाढ - केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया
Posted On:
14 JUL 2026 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2026
नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात आज टपाल विभागाची 2026–27 या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीची व्यावसायिक आढावा बैठक पार पडली. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी टपाल विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला. भारतीय टपाल विभागाने 2026–27 या वित्तीय वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक दिशेने केली असल्याचे ते म्हणाले. टपाल विभागासाठी 19,803 कोटी रुपये इतक्या महत्त्वाकांक्षी वार्षिक महसुलाचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या तुलनेत, पहिल्याच तिमाहीत 4,009 कोटी रुपयांचा महसूल संकलित झाल्याचे त्यांनी सांगितले. 2025–26 या मागील वित्तीय वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या वित्तीय वर्षाच्या तिमाहीत वर्षागणिक 22% इतकी मोठी वाढ नोंदवली गेली असून, पहिल्या तिमाहीच्या उद्दिष्टापैकी 81% उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भारतीय टपाल विभागाशी संबंधीत सर्व सदस्यांच्या समर्पणाचे आणि दृढ वचनबद्धतेचे कौतुक केले. टपाल विभागाच्या सेवा वितरण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि या सातत्यपूर्ण प्रगतीत योगदान देण्यासाठी टपाल विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज टपाल व्यवस्थेच्या संकल्पनेअंतर्गत, टपाल विभागाने घडवून आणलेले आधुनिकीकरण, आपल्या व्यावसायिक कार्यपद्धतीत घडवून आणलेले परिवर्तन आणि विभागाच्या ग्राहक केंद्री सेवा वितरणाचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी टपाल विभागाच्या सर्व 6 व्यावसायिक क्षेत्रांनुसार विभागाच्या कामगिरीचा तपशीलवार आढावा घेतला. याअंतर्गत टपाल, पार्सल, टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा, टपाल कार्यालय बचत बँक, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक व्यवसाय तसेच नागरिक केंद्री सेवा या व्यावसायिक क्षेत्रांचा आढावा घेतला.
या सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी टपाल मंडळे आणि निर्धारीत उद्दिष्टाच्या तुलनेत त्यांच्या यशाची टक्केवारी खाली नमूद केली आहे.
या वेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी पहिल्या तिमाहीत साध्य केलेल्या या प्रगतीचे कौतुक केले. उर्वरित तिमाहींमध्ये पार्सल, टपाल आणि आंतरराष्ट्रीय संबंध तसेच जागतिक व्यवसाय या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करत उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी यांनीही टपाल विभागाच्या व्यावसायिक कामगिरीतील या लक्षणीय सुधारणेची प्रशंसा केली. नियमित आढावा बैठका, नियोजनबद्ध देखरेख आणि देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा यामुळेच हे यश साध्य झाले असल्याचे ते म्हणाले. ही भक्कम प्रगती दृढनिश्चयी नेतृत्व, जबाबदारीची जाणीव आणि सामूहिक प्रयत्नांमुळे साध्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2284625)
अभ्यागत कक्ष : 59