सहकार मंत्रालय
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुजरातच्या आणंद येथे ‘त्रिभुवन’ सहकार विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाचे भूषवले अध्यक्षस्थान
येत्या काही वर्षांत सहकार क्षेत्राला 17 लाखांहून अधिक प्रशिक्षित तरुणांची आवश्यकता असेल: मुरलीधर मोहोळ
सहकारी संस्था आणि कृषी उद्योगांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल व्यासपीठ आणि नवोन्मेषाचा वापर करावा: मुरलीधर मोहोळ
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2026
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज गुजरातच्या आणंद येथील ‘त्रिभुवन’ सहकार विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. याप्रसंगी, विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर तुकडीतील 302 विद्यार्थ्यांना पदवी आणि 2 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
दीक्षांत समारंभाला शिक्षणाचा पूर्ण विराम मानू नये, असे दीक्षांत समारंभाला संबोधित करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले. दीक्षांत समारंभ म्हणजे शिक्षण संपले असे नव्हे; तर, तो एका नव्या उपक्रमाची आणि नव्या संकल्पाची सुरुवात आहे. आज विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण पूर्ण होत असले तरी, कार्यक्षेत्रातील वास्तविक जगाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे, असे ते म्हणाले.
सहकार क्षेत्रासाठी प्रशिक्षित, कुशल आणि समर्पित मनुष्यबळ विकसित करण्याच्या उद्देशाने ‘त्रिभुवन’ सहकार विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. हे विद्यापीठ असे नेते, संशोधक आणि व्यावसायिक व्यवस्थापक तयार करेल, जे सहकाराला आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाशी जोडून भारताच्या सहकार चळवळीला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज देशात 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था असून, 32 कोटींहून अधिक सदस्य आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. याचा अर्थ असा की, देशाची जवळपास निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार क्षेत्राशी जोडलेली आहे, असे त्यांनी नमूद केले. दुग्धव्यवसाय, बँकिंग, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये शेतकरी, महिला, कारागीर आणि ग्रामीण उद्योजकांना सक्षम करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून सहकार क्षेत्र उदयास आले आहे, असे ते म्हणाले.
‘चालक हाच मालक’ या संकल्पनेवर आधारित भारत टॅक्सीने सहकार अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन आदर्श घालून दिला आहे, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री म्हणाले. प्लॅटफॉर्म-आधारित अर्थव्यवस्थेतील सेवा पुरवठादारांना केवळ कामगार म्हणून नव्हे, तर संस्थेचे भागीदार आणि मालक म्हणून वागणूक देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
2002 नंतर देशात प्रथमच तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय सहकार धोरणाचा उद्देश सहकार क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, जबाबदार आणि सक्षम बनवणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखाने आता केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; तर ते इथेनॉल, बायोगॅस आणि सेंद्रिय खतापर्यंत विस्तारणारी एक संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यात योगदान देत असल्याचे ते म्हणाले.
येत्या काही वर्षांत सहकार क्षेत्राला 17 लाखांहून अधिक प्रशिक्षित तरुणांची आवश्यकता भासेल, असे मंत्र्यांनी नमूद केले. सहकार क्षेत्रासाठी व्यावसायिक नेतृत्व, संशोधन क्षमता आणि आधुनिक व्यवस्थापन कौशल्यांनी सुसज्ज मनुष्यबळ विकसित करून ही गरज पूर्ण करण्यात ‘त्रिभुवन’ सहकार विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284613)
आगंतुक पटल : 12