आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुश्रुत जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील ‘एआयआयए’ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 'सौश्रुतम् 2026' चे उद्घाटन


‘एआयआयए’च्यावतीने 'सौश्रुतम् 2026' अंतर्गत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

'सौश्रुतम् 2026' मध्ये ‘एनसीआयएसएम’च्या अभ्यासाचे प्रकाशन; अत्याधुनिक एमआरआय सुविधेचा होणार प्रारंभ

आयुर्वेद आणि आधुनिक शल्यचिकित्सा शास्त्र यांच्या एकत्रीकरणाविषयी जागतिक तज्ज्ञांकडून चर्चा

प्रविष्टि तिथि: 13 JUL 2026 11:39PM by PIB Mumbai

आयुष मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (एआयआयए) च्यावतीने  15 ते 17 जुलै 2026 या कालावधीत आयोजित 'सौश्रुतम् 2026' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे  उद्घाटन  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्‍यात येणार आहे. या चर्चासत्रापूर्वी 14  जुलै रोजी (आज)  एका पूर्व-चर्चासत्र कार्यशाळेचेही आयोजन केले  आहे. 'शल्यचिकित्सेचे जनक' मानले जाणारे आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी साजरी केली जाते.  'सुश्रुत जयंती'चे औचित्य साधून या आंतरराष्‍ट्रीय  चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

उद्घाटन समारंभाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव; दिल्लीचे नायब राज्यपाल  तरणजित सिंग संधू; लोकसभेचे खासदार रामवीर सिंग बिधुरी आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘एआयआयए’ चे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती यांनी सांगितले की, 'सौश्रुतम् 2026'  हे आचार्य सुश्रुत यांची कालातीत तत्त्वे आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील नवकल्पना यांचा संगम घडवून, पुराव्यावर आधारित आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला चालना देणारे एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरेल. ते पुढे म्हणाले की, या परिसंवादामुळे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्य बळकट होईल, उच्च दर्जाच्या संशोधनास प्रोत्साहन मिळेल आणि शस्त्रक्रियाविषयक शिक्षणातील उत्कृष्टतेस चालना मिळेल. भारत आणि परदेशातील आघाडीचे शल्यचिकित्सक, संशोधक, धोरणकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहभागातून, हा कार्यक्रम भारताचा समृद्ध शस्त्रक्रिया वारसा जतन आणि विकसित करण्यातील नेतृत्व पुन्हा अधोरेखित करेल.

‘एआयआयए’ चे अध्यक्ष आणि वैद्यकीय अधीक्षक प्रा. (डॉ.) योगेश बडवे चर्चासत्राचे आयोजक आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, या परिसंवादात मुख्य व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि वैज्ञानिक शोधनिबंधांचे सादरीकरण यांचा समावेश केला आहे.  तसेच, यामध्ये प्रोक्टोलॉजी म्हणजे गुदविकार शास्त्र, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, सर्वंकष कर्करोग उपचार, वैद्यकीय-कायदेशीर बाबी आणि शस्त्रक्रियेतील बौद्धिक संपदा या विषयांवर विशेष सत्रांचे  आयोजन केले आहे.

वैज्ञानिक सत्रांमध्ये आचार्य सुश्रुत यांची शस्त्रक्रियेबाबतची शाश्वत तत्त्वांवर भर देण्‍यात येणार आहे. यामध्‍ये  जखमेचे व्यवस्थापन, अग्निकर्म, क्षारसूत्र आणि मर्म चिकित्सा - यांचा आढावा घेतला जाईल. त्याचबरोबर शल्य तंत्र आणि एकात्मिक शस्त्रक्रिया सेवांमधील नवीन संशोधनाचे सादरीकरण केले जाईल. आरोग्यसेवेसमोरील समकालीन आव्हाने पेलण्यासाठी पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाची निरंतर उपयुक्तता या चर्चांमधून अधोरेखित केली जाईल.

आयोजक समितीचे  सचिव डॉ. व्यासदेव महंत यांनी सांगितले की, परिसंवादाचा समारोप एका बहुविद्याशाखीय समूह चर्चेने होईल. या चर्चेचा उद्देश पुराव्यावर आधारित संवाद बळकट करणे, नवकल्पनांना चालना देणे आणि आयुर्वेदिक शस्त्रक्रियेतील शिक्षण आणि  वैद्यकीय सेवा अधिक समृद्ध करण्यासाठी सहयोगात्मक संशोधनाचा विस्तार करणे असा असणार आहे.

'सौश्रुतम् 2026' दरम्यान, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन' (एनसीआयएसएम) द्वारे करण्यात आलेल्या "आयुर्वेद महिला पदवीधरांच्या व्यावसायिक कारकिर्दीचे मूल्यमापन – एक निरीक्षण-आधारित अन्वेषणात्मक अभ्यास" (Evaluation of Professional Career of Ayurveda Female Graduates – An Observational Exploratory Study) या राष्ट्रीय संशोधन अभ्यासाचे प्रकाशन केले जाईल. हा अभ्यास आयुर्वेद क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणि त्यांच्या कारकिर्दीतील प्रगती यांबाबतची महत्त्वाची माहिती समोर आणेल. याच कार्यक्रमामध्‍ये  14.5  कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक '3 टेस्ला हाय-फील्ड एमआरआय'  प्रणालीचे उद्घाटन केले जाईल. या प्रणालीमध्ये प्रगत एआय-सक्षम कार्यप्रवाह, बायोमॅट्रिक्स तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक इमेजिंग क्षमतांचा समावेश आहे.

या परिसंवादामध्ये थायलंड, इस्रायल, ऑस्ट्रिया, युनायटेड किंगडम, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, ग्रीस आणि भारत येथील प्रख्यात शल्यचिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक एकत्र येतील. यामध्‍ये  पद्मश्री प्रा. एम. साहू आणि पद्मश्री प्रा. के. के. ठकराल यांच्यासह 30  हून अधिक प्रतिष्ठित राष्ट्रीय  तज्ज्ञ, तसेच ‘एआयआयए’, आयएमएस-बीएचयू, एनआयए - जयपूर आणि आयटीआरए- जामनगर यांसारख्या अग्रगण्य संस्थांमधील प्राध्यापक सहभागी होतील. एआयआयएमएस,  एसएसजीपीजीआय- लखनौ, जीएमसी-आगरतळा आणि सर गंगाराम हॉस्पिटल (नवी दिल्ली) येथील आधुनिक शल्यचिकित्सेतील (सर्जरी) प्रमुख तज्ज्ञही या विचारमंथनात सहभागी होणार आहेत.  आयुर्वेद आणि समकालीन शल्यचिकित्सा शास्त्रे या विषयांवर  सक्रीय संवाद चर्चासत्रात होईल.  

***

AmbadasYadav / SuvarnaBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284362) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी