पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कोइंबतूर इथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची 29वी बैठक

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2026

तामिळनाडूतील कोइंबतूर येथे असलेल्या राज्य वनसेवा केंद्रीय प्रशिक्षण अकादमी इथे आज राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची 29 वी बैठक पार पडली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री तसेच प्राधिकरणाचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

या बैठकीत देशातल्या व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनाशी संबंधित धोरणात्मक, व्यवस्थापकीय आणि संस्थात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतातल्या व्याघ्र अधिवासांमध्ये संरक्षण अधिक बळकट करणे, व्यवस्थापन पद्धती सुधारणा करणे आणि संवर्धनाचे परिणाम अधिक प्रभावी करणे यावर विशेष भर देण्यात आला. गेल्या बैठकीतल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला, तसेच वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी पुढील उपाययोजनांवर विचार करण्यात आला.

या बैठकीदरम्यान मंत्र्यांच्या हस्ते प्राधिकरणाच्या दोन महत्त्वपूर्ण पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

प्राधिकरणाने 2024–25 या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल मंजूर केला, तसेच 28व्या बैठकीतल्या निर्णयांवरच्या कार्यवाही अहवालाचा आढावा घेतला. याशिवाय तांत्रिक समिती आणि प्रशासकीय समितीच्या शिफारसींवरही चर्चा करण्यात आली.

व्याघ्र संवर्धनासाठी आर्थिक संसाधने उभारण्यासाठी ‘व्याघ्र परिषद’ या राष्ट्रीय व्यासपीठाच्या आयोजनाचा प्रस्तावही विचारात घेण्यात आला. व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानांच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्था, परोपकारी संस्था आणि इतर भागधारकांच्या सहभागातून निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.

तसेच ‘व्याघ्र संशोधन, नवोपक्रम, धोरण, पर्यावरणशास्त्र आणि शाश्वतता परिसंवाद’ (स्ट्राइप्स) या राष्ट्रीय मंचाच्या आयोजनाबाबतही चर्चा झाली. या मंचाच्या माध्यमातून संशोधन निष्कर्षांचे प्रसारण, नाविन्यपूर्ण व्यवस्थापन पद्धतींची देवाणघेवाण आणि व्याघ्र राखीव क्षेत्रांमधले व्यवस्थापक, संशोधक आणि संवर्धन तज्ज्ञ यांच्यात ज्ञानविनिमय साधण्याचा उद्देश आहे. यामुळे पुराव्यावर आधारित व्यवस्थापन आणि यशस्वी संवर्धन उपाययोजनांची पुनरावृत्ती सुलभ होईल.

याशिवाय प्राधिकरणाने अलीकडे राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सदस्यांना देण्यात आली. व्याघ्र संवर्धन प्रशासन अधिक सक्षम करणे, वैज्ञानिक व्यवस्थापनाला चालना देणे आणि व्याघ्र अधिवासांचे दीर्घकालीन संरक्षण सुनिश्चित करणे यासंदर्भातील मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

 

निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283052) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam