गृह मंत्रालय
नवी दिल्ली भारत आणि म्यानमार यांच्यातील 23 वी राष्ट्रीय पातळीवरील बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2026
भारत आणि म्यानमार यांच्यातील 23 व्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीचे 07 आणि 08 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली इथे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले, तर म्यानमारच्या गृह मंत्रालयाचे उपमंत्री मेजर जनरल मिन थू यांनी म्यानमारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

या बैठकीच्या आयोजनातून दोन्ही देशांमधील प्रदीर्घ काळापासूनचे मैत्रीपूर्ण संबंध आणि घनिष्ठ भागीदारीचे महत्त्व अधोरेखित झाले. यासोबतच परस्पर हिताच्या दृष्टीने परस्परांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या सामायिक वचनबद्धताही या बैठकीत पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आली. भारताच्या शेजारी प्रथम, अॅक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांअंतर्गत म्यानमारला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याची बाब भारताच्या प्रतिनिधींनी या बैठकीत अधोरेखित केली.
या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याच्या मुद्यावर सर्वंकष आणि सकारात्मक चर्चा केली. यासोबतच द्विपक्षीय संवाद यंत्रणेअंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. याअंतर्गत दहशतवाद, बंडखोरी, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची अवैध वाहतूक, मानवी तस्करी, वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हेगारी आणि इतर संघटित गुन्ह्यांसह सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांविरोधात लढा देण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याच्या मुद्यावर व्यापक चर्चा केली गेली. सुरक्षाविषयक परस्पर सामायिक आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गुप्त माहितीची देवाणघेवाण तसेच प्रत्यक्ष मोहिमांमधील समन्वय वृद्धींगत करणे आणि क्षमता बांधणीसाठीचे उपक्रम हाती घेणे यांसारख्या महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सहमती व्यक्त केली.

या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील सध्याच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. या सीमाभागात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा राखण्याचे महत्वही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. आपल्या सार्वभौम भूमीचा वापर परस्परांच्या सुरक्षा विषयक हितसंबंधांना बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांसाठी होऊ न देण्याच्या महत्त्वाचा मुद्याही दोन्ही देशांनी अधोरेखित केला. भारताच्या सुरक्षा विषयक हितसंबंधांच्या विरोधात म्यानमारच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही, अशी ग्वाही म्यानमारच्या शिष्टमंडळाने या बैठकीत दिली.
यासोबतच, कलादान बहुपर्यायी वाहतूक प्रकल्प (Kaladan Multi-Modal Transit Transport project) तसेच भारत, म्यानमार आणि थायलंड दरम्यानच्या त्रिपक्षीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मत दोन्ही देशांनी सामायिक केले.

यावेळी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीच्या फलनिष्पत्तीबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यमान द्विपक्षीय यंत्रणा, नियमित देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि परस्पर सहमतीने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यांवर घनिष्ठ देवाणघेवाण आणि सहकार्य कायम ठेवण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282662)
आगंतुक पटल : 9