शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणासंबंधीचे ‘अखिल भारतीय सर्वेक्षण: 2022-23 आणि 2023-24 चे अहवाल केले प्रसिद्ध
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2026
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वर्ष 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी उच्च शिक्षणासंबंधीचे अखिल भारतीय सर्वेक्षणाचे अहवाल आज प्रसिद्ध केले. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाव्दारे देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांकडून वेब-आधारित डेटा कॅप्चर फॉरमॅट (डीसीएफ) द्वारे सविस्तर माहिती गोळा केली जाते. या संस्था विद्यार्थ्यांची पटनोंदणी, प्राध्यापक आणि कर्मचारी, पायाभूत सुविधा, परीक्षेचे निकाल इत्यादींचा डेटा ‘एआयएसएचई’ पोर्टलवर अपलोड करतात. ‘एआयएसएचई’ भारतातल्या उच्च शिक्षणासंबंधी अधिकृत आकडेवारीचा प्राथमिक स्रोत म्हणून काम करते आणि धोरण निर्मिती, नियोजन आणि या क्षेत्राच्या संनियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करते.
दोन्ही वर्षांमध्ये उच्च शिक्षण संस्थांनी ‘एआयएसएचई’ मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 2022-23 मध्ये नोंदणीकृत 60,380 पैकी 56,180 संस्थांनी तर 2023-24 मध्ये नोंदणीकृत 64,756 पैकी 59,533 संस्थांनी यात भाग घेतला. दोन्ही सर्वेक्षणांसाठी, सहभागाचे प्रमाण 90% पेक्षा जास्त आहे.
सर्वेक्षणातील ठळक मुद्दे:
एकूण पटनोंदणी प्रमाण
2011 च्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार 18-23 वर्षे वयोगटातली एकूण लोकसंख्या आणि विद्यार्थ्यांची पटनोंदणी यांचे गुणोत्तर म्हणून एकूण पटनोंदणी प्रमाण काढले जाते. 2014-15 मध्ये 23.7 असलेले एकूण पटनोंदणी प्रमाण सातत्याने वाढत असून 2022-23 मध्ये ते 29.5 आणि 2023-24 मध्ये 30 वर पोहोचले आहे. महिलांचा प्रमाण 2014-15 मधल्या 22.9 आणि 2022-23 मधील 30.2 वरून 2023-24 मध्ये 31.2 पर्यंत वाढले आहे.


लिंग समानता निर्देशांक
महिला आणि पुरुष यांचे एकूण पटनोंदणी प्रमाण आणि गुणोत्तर लिंग समानता निर्देशांक म्हणून काढले जाते, ते पुरुष आणि महिलांच्या सापेक्ष शिक्षणप्रवेशाचे मोजमाप दर्शवते. 2023-24 साठी लिंग समानता निर्देशांक 1.08 इतका आहे. सलग सात वर्षे लिंग समानता निर्देशांक 1.0 च्या वर राहिला आहे, त्यातून उच्च शिक्षणामध्ये महिलांचा सातत्याने वाढता सहभाग दिसून येतो.
प्रवेश
उच्च शिक्षणातील प्रवेश संख्या 2014-15 मधील 3.42 कोटींवरून 2022-23 मध्ये 4.46 कोटी आणि 2023-24 मध्ये 4.50 कोटींपर्यंत सातत्याने वाढत आहे (म्हणजेच 2014-15 पासून 31.5% वाढ). वास्तविक, उच्च शिक्षणातील महिला प्रवेशात 2014-15 मधील 1.57 कोटींवरून 2022-23 मध्ये 2.18 कोटी आणि 2023-24 मध्ये 2.24 कोटींपर्यंत प्रशंसनीय वाढ झाली आहे (म्हणजेच 2014-15 पासून 42.2% वाढ).


अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2014-15 मधील 46.07 लाखांवरून 2023-24 मध्ये 69.72 लाख झाली आहे (2014-15 पासून 51.4% वाढ). अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2014-15 मधील 16.41 लाखांवरून 2023-24 मध्ये 28.83 लाख झाली आहे (2014-15 पासून 75.7% वाढ).
त्याचप्रमाणे, इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची नोंदणी 2014-15मधील 1.13 कोटींवरून 2023-24 मध्ये 1.80 कोटींपर्यंत वाढली आहे (60.2% वाढ).
‘स्टेम’ प्रवेश
गेल्या दशकात ‘स्टेम’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयांच्या प्रवेशात लक्षणीय वाढ झाली आहे, 2014-15 मध्ये जो 91.5 लाख होता तो 2023-24 मध्ये 1.02 कोटी झाला आहे. हे देशातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणावर वाढता भर दिला जात असल्याचे द्योतक आहे.
‘स्टेम’ प्रवेशांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण सुधारणा दिसून आली आहे, जे 2014-15 मधील 38.4% वरून 2023-24 मध्ये 44% पर्यंत वाढले आहे आणि हे देशातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणामध्ये वाढत्या लैंगिक समान समावेशकतेचे द्योतक आहे.

2023-24 मध्ये शिक्षकांची एकूण संख्या 17.32 लाख झाली असून त्यांपैकी 55.1% पुरुष आणि 44.9% महिला आहेत. महिला शिक्षकांची संख्या 2014-15 मधील 5.69 लाखांवरून 2022-23 मध्ये 7.37 लाखांपर्यंत आणि 2023-24 मध्ये 7.78 लाखांपर्यंत वाढली आहे.
सर्वेक्षण नोंद
‘एआयएसएचई’ मधील सहभाग ऐच्छिक आहे आणि उच्च शिक्षण संस्था ‘एआयएसएचई’ वेब पोर्टलद्वारे स्वतःहून डेटा सादर करतात. जरी मंत्रालय अंगभूत पडताळणी आणि छाननी प्रक्रियेद्वारे आवश्यक ती खबरदारी घेत असले, तरी माहितीच्या गुणवत्तेची जबाबदारी प्रामुख्याने संबंधित उच्च शिक्षण संस्थांचीच असते. शिवाय, ‘एआयएसएचई’ हा एक सर्वेक्षण उपक्रम असल्याने मोठ्या प्रमाणावरील सर्वेक्षणांमध्ये आढळणाऱ्या स्वाभाविक मर्यादांचा परिणाम ‘एआयएसएचई’ च्या निष्कर्षांवर काही प्रमाणात होऊ शकतो.
सविस्तर अहवाल खालील लिंकवर उपलब्ध आहे:
https://www.dohe-education.gov.in/documents/reports/aishe-report-MzN1EjMtQWa?pageTitle=AISHE-Report
* * *
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282592)
आगंतुक पटल : 22