पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 07 JUL 2026 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,7 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष   प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या जंगी स्वागताबद्दल भारतीय समुदायाचे आभार मानले. अध्यक्ष प्रबोवो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पंतप्रधानांनी त्यांचा उल्लेख एक महान नेते आणि भारताचे सच्चे मित्र असा केला. इंडोनेशियाच्या प्रगती आणि समृद्धीमधील योगदानाबद्दल तसेच दोन्ही देशांमधील मैत्रीचा जिवंत दुवा म्हणून काम केल्याबद्दल त्यांनी येथील भारतीय समुदायाचे कौतुक केले. परस्पर विश्वास, सामायिक वारसा आणि सागरी संबंधांवर आधारित इंडोनेशियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमधील प्राचीन सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, बाली यात्रा, वेसक (बुद्ध पौर्णिमा) यात्रा यांसारख्या परंपरा आणि नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण झालेले आधुनिक दुवे, येथील वैविध्यपूर्ण आणि लोकांमधील परस्पर चैतन्यपूर्ण संबंधांना सातत्याने बळ देत आहेत.

पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांत भारताने साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा उल्लेख केला. यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास, स्टार्टअप क्षेत्रातील क्रांती आणि सामाजिक विकास कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार यांचा समावेश असून, या प्रयत्नांमुळे 25 कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांनी नमूद केले की भारत गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि यामुळे देश जागतिक विकासाचा एक प्रमुख आधार   बनला आहे. भारतात होणारे बदल हे 1.4 अब्ज (140 कोटी) जनतेच्या गतिमान आकांक्षांचे रूप म्हणून पाहिले जावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला 'विकसित भारत 2047 आणि 'इंडोनेशिया एमास 2045' या दोन्ही देशांच्या सामायिक विकास दृष्टिकोनाची उद्दिष्टे साकार करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे नमूद केले की, इंडोनेशिया आणि आसियान  क्षेत्रात प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी भारत एक 'फोर्स मल्टिप्लायर' (शक्ती वृद्धिंगत करणारा घटक) म्हणून काम करण्यास कटिबद्ध आहे.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात दोन हजार वर्षांहून अधिक जुने  घनिष्ठ संस्कृती, वारसा आणि परस्पर लोकसंबंध आहेत. आज, इंडोनेशियामध्ये अंदाजे 150,000 भारतीय वंशाचे लोक  आणि सुमारे 15,000 अनिवासी भारतीय राहतात. भारतीय समुदाय इंडोनेशियाच्या आर्थिक विकासात आणि बहुसांस्कृतिक समाजात मोलाचे योगदान देत आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहे.

सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2282293) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil