वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाने येत्या पाच ते सहा वर्षात 15 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवावे – केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन


युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून अस्तित्वात येईल; ईयु सोबतच्या कराराशी संबंधित कायदेशीर बाबी येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा : गोयल

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 9:40PM by PIB Mumbai

देशातील चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाने, येत्या पाच ते सहा वर्षात, किंवा शक्य असल्यास, त्या आधीही, आपली निर्यात 15 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. तसेच, नव्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घेत, आपल्या निर्यातीत, तिपटीने वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, विविध बाजारपेठांचा लाभ, तसेच आपली गुणवत्ता, डिझाईन, ब्रॅन्डीग, शाश्वत उत्पादन आणि व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

ते आज नवी दिल्लीत आयोजित चर्मोद्योग निर्यात परिषदेच्या, निर्यात उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2024-25 समारंभात बोलत होते. या क्षेत्राची सध्याची निर्यात, सुमारे 4-4.5 अब्ज डॉलर्स इतकी असून, त्यात आमूलाग्र परिवर्तन घडण्याची क्षमता आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.

भारताने गेल्या काही काळात केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे, 38 विकसित देशांच्या बाजारपेठा भारतासाठी खुल्या होणार आहेत, ज्यातून, चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगासाठी नव्या आणि महत्वाच्या संधीची दारे खुली होतील, असेही ते म्हणाले. येत्या 15 जुलैपासून युनायटेड किंगडम आणि भारत यांच्यातला मुक्त व्यापार करार अस्तित्वात येईल, असे त्यांनी सांगितले. युरोपीय महसंघासोबतच्या कराराचा संदर्भ देत, गेल्या रविवारी, ब्रसेल्स मधल्या युरोपीय महासंघाच्या नेत्यांशी अत्यंत फलदायी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजू, या कराराशी संबंधित कायदेशीर बाबी येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारताने गेल्या काही काळात अंतिम रूप दिलेल्या मुक्त व्यापार करारांचा तसेच या क्षेत्रासाठी विकसित देशांमध्ये खुल्या झालेल्या नव्या बाजारपेठांचा उद्योगाने जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

निर्यातीसाठीच्या बाजारपेठांमधे पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांत विविधता आणण्याचे आवाहन करत गोयल म्हणाले की, सध्या भारताच्या चर्मोद्योगातील सुमारे 77 टक्के निर्यात केवळ 15 देशांमध्ये होते. आता जगभरातील नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले. या क्षेत्रासाठी खुल्या झालेल्या 38 विकसित देशांच्या बाजारपेठांव्यतिरिक्त, भारताचे आसियान समूहातील 10 देश, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबतही मुक्त व्यापार करार आहेत. त्यामुळे अशा देशांची एकूण संख्या आता 50 झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या करारासाठी, भारताच्या कॅनडाशी देखील वाटाघाटी सुरू असून, या वर्षाअखेरीस, या वाटाघाटी यशस्वी होतील, आणि एफटीए असलेल्या देशांची संख्या 51 वर पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

चर्मोद्योगांनी केवळ, अमेरिका, युके, जर्मनी आणि इटली अशा मोठ्या बाजारपेठावर लक्ष केंद्रित करु नये, तर, त्या पलीकडे, जात छोट्या देशांमध्ये असलेल्या व्यापार आणि निर्यातीच्या संधीही शोधाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. अशा छोट्या देशांमधील ग्राहक पादत्राणे विकत घेतात, त्यात सतत बदल करतात, त्यामुळे डिझायनर ब्रॅंड ना तिथे बाजारपेठ मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. अशा देशात, भारतीय डिझायनर ब्रॅंडस् नी शिरकाव करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

या उद्योगात, केवळ पादत्राणे नाहीत, तर बॅग्स, वॉलेट्स, घोड्यांची खोगीरे, जॅकेट्स, कपडे आणि वस्त्र प्रावरणे अशा वस्तूंच्या व्यापाराच्या संधी आहेत, असेही गोयल म्हणाले.

भारतातील उद्योग आणि उत्पादने जगभरातील बाजारपेठांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सरकार आणि उद्योग यांनी एकत्रितपणे कशा प्रकारे काम करता येईल, याबाबत नाविन्यपूर्ण कल्पना आणि ठोस सूचना पुढे आणाव्यात, असे आवाहनही गोयल यांनी केले.

***

NitinFulluke / RadhikaAghor / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281956) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil