गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'एल निनो'मुळे देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाच्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून आढावा

प्रविष्टि तिथि: 03 JUL 2026 7:42PM by PIB Mumbai

 

देशातील काही भागांमध्ये ‘एल निनो’मुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एल निनोमुळे निर्माण झालेली अपुऱ्या पावसाची परिस्थिती आणि देशातील काही भागांतील संभाव्य दुष्काळाच्या सावटावर सरकारचे बारीक लक्ष असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले.  त्यांनी कृषी मंत्रालय आणि संबंधित इतर सर्व मंत्रालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना केल्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणीपातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच चारा, भरड धान्ये आणि कडधान्ये यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांवर अधिक भर देण्याची गरजही शाह यांनी अधोरेखित केली.

वीज पुरवठा सुरळीत आणि पुरेसा राहील याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांना दिले.

देशात तांदूळ आणि गव्हासारख्या जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, इतर आवश्यक वस्तूंचे भावही नियंत्रणात असल्याची माहिती यावेळी  गृहमंत्र्यांना देण्यात आली.

याशिवाय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये अलीकडेच झालेला मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी गृह मंत्रालयाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाला पाठवण्याचे आदेशही अमित शाह यांनी दिले.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2280928) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam